Foreigners Died Suspiciously In Goa: देअर लास्ट ट्रीप! गोव्यात रहस्यमय पद्धतीने मृत झालेले विदेशी पर्यटक: भाग 1

गोव्यात 2005 पासून दहा परदेशी पर्यटकांचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Foreigners Died Suspiciously In Goa
Foreigners Died Suspiciously In GoaDainik Gomantak

Foreigners Died Suspiciously In Goa: 'गोवा' नेहमीच जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. वर्षातील बारा महिने गोव्यात देशी - विदेशी पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. राज्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आणि येथील निसर्गसंपन्न वातावरणात निवांत वेळ घालवायला अनेकजण गोव्यात येत असतात.

पर्यटनाव्यतिरिक्त गोवा विविध कारणांनी चर्चेत असतो. मग, त्यात येथील खाण व्यवसाय असो, गुन्हेगारी घटना असो किंवा अमली पदार्थांबाबत घडणाऱ्या विविध घटना, नेहमीच राष्ट्रीय पातळीवर बातम्यांचा विषय ठरतात. त्यातच एक म्हणजे गोव्यात परदेशी नागरिकांचे संशयास्पद पद्धतीने झालेले मृत्यू अद्यापपर्यंत एक गूढ बनून राहिले आहेत.

2005 पासून गोव्यात दहा परदेशी पर्यटकांचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जवळपास सर्वच प्रकरणांत पुरेशा पुराव्यांअभावी त्यांच्या मृत्यूबाबतच्या तपासातून ठोस माहिती समोर आली नाही. दुसरीकडे या परदेशी नागरिकांच्या नातेवाईकांकडून नैसर्गिक मृत्यू नव्हे त्यांचे खून झाले असल्याचे आरोप करण्यात आले. अशाच काही चर्चेतील रहस्यमय मृत्यूच्या घटनांची माहिती आपण येत्या दोन लेखातून घेणार आहोत.

जोनाथन रे बुरबँक (वय 27, रा. अमेरिका) (Jonathan Ray Burbank)

अमेरिकेतील एक तरूण योगा शिक्षक गोव्यात आला असता हणजूण येथील एका रेस्टॉरंटमध्ये अचानक कोसळला. कोसळल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले.

28 जुलै 1977 रोजी जन्मलेल्या बुरबँक याचे 28 मे 2005 रोजी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बुरबँक भारतातील सहारा इंडिया कमर्शियल कॉर्पोरेशनसाठी काम करायचा अशी माहिती आहे.

अमेरिकेत बुरबँक याचे शव पाठवण्यात आले त्यावेळी त्याच्या शरिरातील अनेक अवयव गायब असल्याने, तेथे शवविच्छेदन करताना अनेक अडचणी आल्या. तसेच, बुरबँक यांना विष दिल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.

Foreigners Died Suspiciously In Goa
सुशेगाद पात्रांव: देवा प्रसादाची आज्ञा करा!

स्टीफन बेनेट (वय 40, रा. युके) (Stephen Bennett)

बेनेट 2006 रोजी गोव्यात असताना गोवा पोलिसांनी त्याचे अपहरण करून त्याला धमकावत, अमली पदार्थ दिले. त्यानंतर त्याला महाराष्ट्रात घेऊन गेले. येथून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, शिवाय घरी फोन करून त्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. मात्र, त्याला पुन्हा पकडून आंब्याच्या झाडावर त्याला फास दिला. असे बेनेट याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

रायगड जिल्ह्यातील म्हाळसाई येथे डिसेंबर 2008 मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी सुरूवातीला आत्महत्येची नोंद केली. बेनेटच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलेल्या संशयित स्थानिकांची नंतर सुटका करण्यात आली. पुढे न्यायालयात देखील हे प्रकरण जास्त काळ तग धरू शकले नाही.

मायकल हार्वे (वय 34, रा. युके) (Michael Harvey)

युके येथील हौशी छायाचित्रकार मायकल हार्वे याचा मृतदेह 01 मार्च 2010 रोजी आश्वे येथील एका बीच गेस्टहाऊसमध्ये संशयास्पद पद्धतीने आढळून आला. मेंदू आणि फुफ्फुसांमधील द्रवपदार्थामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याच्या मृत्यू खरं कारण कधीच समोर आले नाही.

धक्कादायक बाब म्हणजे त्याचा चाचणी अहवाल मिळवण्यासाठी हार्वे यांच्या कुटुंबियांना पाच वर्षे झगडावे लागले. पण, त्यातून देखील ठोस काही माहिती समोर आली नाही. तसेच, त्याच्या शरिरावर अनेक घाव आढळून आले, प्रामुख्याने मारहाण झाल्यानंतर असे घाव असतात. असे त्याच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.

हार्वे यांचा मोबाईल, त्यांचे चित्रपट यासह अनेक महागड्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. हार्वे याच्या मृत्यूप्रकरणी योग्य तपास झाला नसल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

डेनिस स्वीनी ( वय 34, रा. युके) (Denyse Sweeney)

युकेच्या रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्त्या डेनिस स्वीनी 16 एप्रिल 2010 रोजी, वागातोर येथील एका नाईट क्लबमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यांना उपचारासाठी एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान स्वीनी यांचा मृत्यू झाला.

अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले. दरम्यान, ब्रिटिश कुटुंबाच्या तीव्र दबावानंतर हणजूण पोलिसांनी 2012 मध्ये हे प्रकरण पुन्हा उघडले आणि खूनाची नोंद करून प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तब्बल सहा वर्षांनंतर, सप्टेंबर 2016 मध्ये यासंबधी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. मृत्यूबाबत प्राणघातक हल्ला किंवा हत्येबाबत कोणताही पुरावा सापडला नाही. असे सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, स्वीनी सोबत राहणाऱ्या व तिच्या संपर्कात असणाऱ्या लोकांची ओळख पटवून त्यांची योग्य चौकशी केली नाही असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. मृत्यू होण्यापूर्वी तिच्यासोबत काय झाले याचा योग्य तपास झाला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Foreigners Died Suspiciously In Goa
सुशेगाद पात्रांव: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...!

फेलिक्स दहल (वय 22, रा. स्वीडन) (Felix Dahl)

फेलिक्स दहल या 22 वर्षीय स्वीडिश तरूणाचा 28 जानेवारी 2015 रोजी पाटणे काणकोण येथे मृतदेह सापडला होता. काणकोण पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. परंतु दहलच्या कुटुंबीयांनी फेलिक्सचा खून झाल्याचा आरोप केला.

एप्रिल 2018 मध्ये काणकोण पोलिसांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला, त्याविरोधात दहल कुटुंबाने उच्च न्यायालयात धाव घेतली.

उच्च न्यायालयाने याप्रकरणाचा तपास करण्याचे सीबीआयला आदेश दिले. दरम्यान, पुराव्यांचा अभाव असल्याचे म्हणत सीबीआयने याप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला.

या गूढ मृत्यूप्रकरणाचा तपास करण्याची जाबाबदारी सीबीआयकडे सोपविण्यात आली मात्र, सीबीआय देखील पुरावे गोळा करू शकली नाही. आता काणकोण जेएमएफसी कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सीबीआयने हे प्रकरण बंद करण्याबाबत फिनलंडच्या दूतावासाला देखील कळवले आहे.

26 जानेवारी 2015 रोजी फेलिक्सचा एका स्थानिक व्यक्तीसोबत वाद झाला आणि 28 जानेवारी 2015 रोजी फेलिक्सचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. असे दहल याच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.

(पूर्वार्ध)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com