शिवोली: गोवा मुक्तीनंतर राज्यात अनेक सरकारे आली अन् गेली. परंतु बार्देशातील शापोरा जेटीच्या समस्यांकडे आतापर्यंत कुणीच गंभीरपणे लक्ष दिले नसल्याने सध्या येथील जेटीची दुरवस्था झाल्याचे शापोरा बोट असोसिएशनचे अध्यक्ष बलभीम मालवणकर यांनी दै. ‘गोमंतक’शी बोलताना सांगितले.
शापोरा जेटीची दुरवस्था आणि सँडबारप्रश्नी तोडग्यासाठी नव्या मत्स्योद्योग मंत्र्यांना आपण स्वखुशीने साकडे घालणार आहे,असेही मालवणकर म्हणाले.
दरम्यान, जागोजागी तडे गेलेल्या येथील जेटीचा पाया दिवसेंदिवस खचत चालला असून सरकारकडून युद्धपातळीवर जेटीच्या दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास जेटीला जलसमाधी मिळेल,अशी भीती मालवणकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी अनेकदा जेटीची पाहणी करून दुरुस्ती केली होती. याभागात भव्य मत्स्य प्रकल्प उभारणीसाठी त्यांनी पायाभरणीही केली होती. परंतु राज्यात सत्ताबदल होताच प्रकल्पाचे काम रखडले. 2017 नंतर राज्यात सत्तेत आलेल्या भाजप तसेच गोवा फॉरवर्ड युती सरकारातील तत्कालीन मंत्री विनोद पालयेकर यांनी मंत्रिपदाचा ताबा घेताच शापोरातील प्रलंबित मत्स्य प्रकल्प युद्धपातळीवर उभारण्याचे आश्वासन दिले होते. तसेच दुसऱ्यांदा पायाभरणीही केली होती. मात्र, अडीच वर्षानंतर मंत्रिपदावरुन पायउतार होताच त्यांनाही प्रकल्पाचा विसर पडल्याचे मालवणकर यांनी सांगितले.
दरम्यान, शापोरा बोट असोशिएशनच्या वतीने मत्स्योद्योग खात्याकडे संबंधित जेटीची दुरुस्ती करण्यासंबंधात वारंवार केलेली मागणी धूळ खात पडल्याने आपण स्थानिक बोट असोशिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचे निश्चित केलेले होते, परंतु स्थानिक मच्छीमारांना सरकारी योजनांचा लाभ करून देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपण अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला,असे मालवणकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.