
काँग्रेसमध्ये असताना २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिगंबर कामत यांनी राज्यभर प्रचारसभांत भाषणे केली. त्यावेळची कामत यांच्या भाषणाचे व्हिडिओ क्लीप सध्या समाजमाध्यमांतून व्हायरल होताहेत. भाजप सरकारवर त्यांनी केलेल्या टीकेचा काही भाग क्लीपद्वारे त्यांच्या विरोधकांकडून समाजमाध्यमांत व्हायरल होऊ लागलाय, असे आता दिसू लागले आहे. विशेष बाब म्हणजे नेटकरीही या क्लिपवर व्यक्त होत आहेत. बहुतांश प्रतिक्रिया या पक्षांतराच्या भूमिकेवर सडेतोड मत व्यक्त असणाऱ्या आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाखतीचा एक भागही व्हायरल झालेला आहे. दिगंबर कामत यांनी भाजप सोडले, ती आपणास दुखावणारी घटना होती, असे पर्रीकर सांगतात. यावरून सध्या नेटकऱ्यांनाही जुन्या घटनांचा उजाळा देताना आनंद मिळत असल्याचेच दिसते. ∙∙∙
दिगंबर कामत आणि रमेश तवडकर या दोन नवनियुक्त मंत्र्यांचा गेल्या गुरुवारी शपथविधी झाला. पण, सलग तिसऱ्या दिवशीही ते बिन खात्याचेच मंत्री राहिले. प्रदेशाध्यक्ष दामूंनी या दोघांना सोमवारी खात्यांचे वाटप केलं जाईल, असं सांगितलं. पण, याआधी मुख्यमंत्री राहिलेल्या कामत यांना नेमकी कोणती खाती द्यायची, यावर मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अडकित्यात सापडलेत. मुख्यमंत्री असताना आपण अर्थ आणि गृह खाते घेतले नव्हते, असे म्हणत कामतांनी अप्रत्यक्षरित्या या खात्यांवर दावाही केला. पण, मुख्यमंत्री डॉ. सावंत कोणत्याही स्थितीत ही खाती कामतांना देतील असे वाटत नाही,असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. काब्रालना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांच्याकडचे बांधकाम खाते आपल्याकडे ठेवून इतर खाती मुख्यमंत्र्यांनी सिक्वेरांना दिली होती. पण, आता ‘पीडब्ल्यूडी’त दोन खाती असल्यामुळे ही ‘तगडी’ खाती कामतांना द्यायची की, शिक्षण खाते देऊन त्यांना गप्प करायचे, यावर मुख्यमंत्र्यांकडून सखोल अभ्यास सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. ∙∙∙
‘आप’ने रस्त्यांची दुर्दशा सरकारला दाखवण्यासाठी पर्वरीतील खापरेश्वर मंदिर ते म्हापसा अशी ‘बाईक राईड’ काढली. चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते, वाहन चालविण्यासाठी योग्य असतील,अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. हेल्मेटसोबत आता ‘आरटीओ’ने सेंटर गार्डही अनिवार्य करावे. कारण, या रस्त्यांवरून प्रवास करताना कोणालाही गंभीर दुखापत होऊ शकते, अशी उपहासात्मक टीकाही आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी सरकारवर केली. चतुर्थीच्या आधी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा जरी त्यांनी व्यक्त केली असली, तरी रस्त्यांची स्थिती सुधारेल का? हे तो बाप्पा जाणे! ∙∙∙
फातोर्डा मतदारसंघात दामू व विजय यांचे शाब्दिक द्वंद्व जवळ जवळ एका दशकाहून अधिक काळ चालू असल्याचे पहायला मिळते. शुक्रवारी विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री कार्यक्षम आहेत पण ‘ओव्हरलोडेड’ आहेत असे म्हटले होते. सरकारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने पत्रकारांनी दामूबाबाला या संदर्भात विचारले. त्यावर आपण भाष्य करीत नाही, असे त्यांनी सांगितले. वरून आपल्या चतुर्थीच्या शुभेच्छा त्यांना कळवा, असे सांगितले. विचारलेल्या प्रश्नालाचा व त्यांच्या उत्तराचा सुतराम संबंध नव्हता. पण हीच संधी साधून दामू बाबाने विजयला चतुर्थीच्या शुभेच्छा देण्याची संधी साधली. वाह रे वाह दामूबाब! ∙∙∙
मंत्री रमेश तवडकर हे बोलतात छान. शनिवारी त्यांनी ‘श्रमधाम’ कार्यकर्त्यांचा जाहीर वर्ग घेतला. संवेदनशील माणसाला जगण्याची भाषा कशी समजली पाहिजे यावरचे ते बौद्धिक होते. अर्धफोंड येथील हरिश्चंद्र नाईक यांच्या घराच्या उभारणीपासून सुरू झालेला ‘श्रमधाम’चा प्रवास त्यांनी प्रवाही पद्धतीने उलगडला. गावात पूर्वी कोणी आजारी असला तर त्याच्या वाटेचे शेतीकाम इतर कसे करायचे, पाहुणे आले असताना साखर, चहापावडर नसेल तर वाटीभर शेजाऱ्यांच्या घरातून मागील दाराने आणून कशी गरज भागवली जात, असे तसेच तांदळाची उसनवारी कशी होत असे, याची उदाहरणे त्यांनी दिली. त्यांच्या संकल्पनेतील गोवा प्रत्यक्षात साकारला तर गोव्याची वेगळी ओळख जगभर होण्यास लागणार नाही, पण खरेच तसे होईल का हा खरा प्रश्न असल्याची चर्चा आहे.∙∙∙
राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा सुरू झाल्यापासून इतर सात जणांसोबत काँग्रेसमधून भाजपात आलेल्या संकल्प आमोणकरांच्या नावाची वारंवार चर्चा होत होती. संकल्प त्यावेळी काँग्रेसमध्येच राहिले असते, तर विरोधी पक्षनेतेपदाची माळ निश्चितच त्यांच्या गळ्यात पडली असती. मंत्रिपदाच्या आशेने त्यांनी भाजपात उडी घेतली. पण, अजून तरी त्यांना कोणताही लाभ झालेला नाही. याआधी भाजपने त्यांना बालभवनचे अध्यक्षपद दिले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांवर ‘प्रचंड’ विश्वास असल्याने त्यांनी बालभवनचे अध्यक्षपद नाकारत आपण मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांना नकळत जाणवून दिले होते. आताही मंत्रिपद न मिळाल्याने आमोणकर किती नाराज झाले आहेत, हे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना नक्कीच माहीत आहे. त्यामुळे ‘ईडीसी’ किंवा ‘जीटीडीसी’ पैकी एक महामंडळ त्यांना देण्याच्या तयारीत भाजप आहे. पण, संकल्प आता भाजपची ही ऑफर स्वीकारणार की ‘मतदारसंघाच्या विकासा’साठीच झटणार, असा प्रश्न त्यांच्या मतदारांनाही पडला असेल!. ∙∙∙
नवनियुक्त मंत्री दिगंबर कामत यांना काँग्रेस सोडण्याचे नवे कारण सापडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पक्षात ज्येष्ठ असूनही त्यांना म्हणे पक्षाने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले नव्हते. हा त्यांचा अपमान होता. गंमत म्हणजे, त्यांनी पाच वर्षे स्थिर सरकार दिले! हे त्यांनी काँग्रेसवर केलेले ‘उपकार’ होते. या पाच वर्षांत गोव्यात जी अंदाधुंदी झाली, खाण खात्यात जे गफले झाले त्याची गणतीच नाही़! यालाच जर स्थिर सरकार म्हणतात व तेच जर काँग्रेसवर ‘उपकार’ होते, तर मग त्यानंतर ते काँग्रेसचे सरकार का आणू शकले नाहीत? त्याहून पुढे जाऊन बोलायचे म्हणजे, तो पक्ष सोडून कामत भाजपामध्ये आले तेथे त्यांची काय बडदास्त ठेवली? दोन वर्षे त्यांना अक्षरशः ‘लाचार’ बनविले होते... पक्षाच्या कार्यक्रमातही त्यांना मागच्या रांगेत बसविले जात होते...कधीकाळी भाजपा सोडली तर त्यांना हे ‘कारण’ त्यावेळी देता येईल... ∙∙∙
कामत व तवडकर यांना मंत्रिमंडळात घेतल्यानंतर ‘आणखी मोठे बदल’ अपेक्षित आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. परंतु सरकारचे टीकाकार म्हणतात की, काब्राल व गावडे यांच्या जागी मंत्री घ्यायलाच अनेक महिने लागतात तेथे ‘नवे फेरबदल’ करायला केवढा अवधी लागू शकतो. आम्ही वर्षभर कामत व तवडकर यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल, अशा वार्ता ऐकत होते, परंतु त्याची पूर्तता होत नव्हती व हा निर्णय कोणाही स्थानिक नेत्याच्या हातात नव्हता. सारे दिल्लीने आपल्या हातात ठेवले असल्याने ‘आणखी बदल होणार’ अशी जी वक्तव्ये सावंत-दामू नाईक व्दयी करतात, त्याकडे राजकीय निरीक्षक संशयानेच पाहातात. परंतु मोठे बदल व्हावेत, कार्यक्षम मंत्री घ्यावेत ही मायबाय जनतेची मागणी आहे, हे तेवढेच खरे! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.