मुरगाव (Margao) येथील वासनाकांड प्रकरणाचे पर्यावसान नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांच्या राजीनाम्यात झाले आहे. काँग्रेसचे (Congress) संकल्प आमोणकर यांनी काही ध्वनिफिती, चित्रफिती व व्हॉट्सॲप संदेशांच्या पुराव्यांसह मंत्री नाईक (Milind Naik) यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली. यानंतर विलक्षण गतीने राजकीय चक्रे फिरू लागली.
गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांच्या आरोपानंतर विरोधक हवेत गोळीबार करत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी केली होती. तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी अत्याचारग्रस्त महिलेची तक्रार किंवा आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिल्याशिवाय कारवाई करणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र, नाव समोर आल्यानंतर मिलिंद नाईकांना मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. हे प्रकरण आता भाजपसाठी नामुष्की ठरले आहे.
या प्रकरणातील पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये संकल्प आमोणकर यांच्यासह पाच जणांविरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती. मंत्र्याने लैंगिक शोषण केले नाही तर कठीण काळात मदत केली. मात्र, संशयितांनी खंडणी वसुलीसाठी या मंत्र्याविरोधात ऑडिओ व व्हिडिओ करण्यास भाग पाडल्याचा दावा केला होता. ही तक्रार मुरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे व संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे आमोणकर यांनी आज मंत्री मिलिंद नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून पीडित महिला व मंत्री नाईक यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट, ऑडिओ, व्हिडिओ पुरावे म्हणून जोडले आहेत.
गिरीश चोडणकर यांनी केली कमिटमेंट पूर्ण
सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेला ‘तो’ मंत्री कोण, याबाबत अनेक दिवसांपासून राज्यात बरीच चर्चा रंगली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हा मुद्दा उचलून धरत भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारला कारवाईसाठी त्यांनी 15 दिवसांची मुदत दिली होती. शिवाय मंगळवारी त्यांनी राज्यपालांची भेट घेत तोंडी नावही सांगितले. त्यानंतर काल बुधवारी मुदत संपल्याने नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांचे नाव जाहीर करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिली.
हा घ्या पुरावा!
मिलिंद नाईक यांचे नाव समोर येताच राज्यातील राजकीय पटलावर भूकंप झाला. चोडणकरांनी खुलासा केल्यानंतर काही वेळातच काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी येथील महिला पोलिसांत नाईक यांच्याविरोधात अत्याचार
प्रकरणाची तक्रार दाखल केली. तक्रारीसोबत पीडित महिलेचे दोन मोबाईल्स दिले. ज्यामध्ये मंत्री व तिच्यातील व्हॉट्सअॅप चॅट, ऑडिओ व व्हिडिओ संभाषण आहे. सुमारे 8 हजारांहून अधिक मेसेज आहेत तर सुमारे 35 हून अधिक ऑडिओ क्लिप्स आहेत.
स्वच्छंदी ‘मिलिंद’मुळे ‘प्रमोद’ हरवणार?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेक्स स्कँडलचा आरोप झालेल्या मंत्र्याला भाजप सरकारकडून अभय मिळत असल्याचे चित्र दिसत होते. दुसरीकडे भाजपने राज्यातील अनेक मोठे नेते गळाला लावत पक्षाला घेतले. त्यातच पंतप्रधान मोदी 19 तारखेला गोव्यात येत असल्याने पक्षात आनंदीआनंद होता. पण आता 'मिलिंद'सारख्या भ्रमराला बि'हारा'तील फुलाचा मोह अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे भाजपची नाचक्की होऊन पक्षात निर्माण झालेला 'प्रमोद' हरवणार अशी चिन्हे दिसत आहेत.
ही तर फक्त सुरवात
हा गोमंतकीय जनतेचा विजय आहे. अशा प्रकारचे लोक राजकारणातून गेले पाहिजेत. हे सत्तेचा गैरवापर करत आहेत. ही तर फक्त सुरवात आहे. यानंतर अनेक प्रकरणे घेऊन आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहोत.
गिरीश चोडणकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
मिलिंद नाईक यांनी पीडितेशी केलेला अश्लील व्यवहार ऑडिओद्वारे उघड केला आहे. हिंमत असेल तर नाईक यांनी माझ्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करावा.
- संकल्प आमोणकर,काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व तक्रारदार
...म्हणून मदतीसाठी आली
मिलिंद नाईक यांनीच सध्या पीडित महिलेला लपवून ठेवले आहे. तसेच आपल्याविरोधात तक्रार करण्यास भाग पाडले आहे. असे असले तरी तिच्या मोबाईलमधून सत्य बाहेर येईलच. पीडित महिला पाटणा (बिहार) येथे गेली तेव्हा त्या मंत्र्यानेच तिला विमानाची तिकिटे काढून दिली व गोव्यात बोलावून घेतले. तसेच तिच्यावर अत्याचार करून घर देण्याचे तसेच अन्य सुविधा देण्याचे आमिष दाखवले. ती गरोदर राहिल्यावर तिला गर्भपात करण्यासाठीही अनेक आमिषे दाखवली व गर्भपातानंतर दूर लोटले. त्यामुळेच ती मदतीसाठी आपल्याकडे आली होती, असे आमोणकर यांनी सांगितले.
पतीचा अपघात की घातपात?
पीडित महिला ही पाटणा (बिहार) येथील एका गरीब कुटुंबातील आहे. तिचा पती मुरगाव पालिकेत मजूर होता. अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. हा अपघात की घातपात हासुद्धा तपासाचा मुद्दा आहे, असे आमोणकर म्हणाले. निवडणूक ओळखपत्र तसेच रेशनकार्ड यासाठी पीडित महिला मिलिंद नाईक यांच्या संपर्कात आली होती. नाईक यांनी हीच संधी साधली व तिला वारंवार बोलावून अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी तिला ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. परिणामी ती मंत्र्याच्या अधीन गेली.
गोमंतकीयांसाठी हे लज्जास्पद
सेक्स स्कँडल प्रकरण निवडणुकीत भाजपला महागात पडणार आहे. मिलिंद नाईक यांच्याविरोधात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांनंतर आता ते आपल्या मतदारसंघातील महिलांना कसे तोंड दाखवू शकतात? मला माझ्या या सहकाऱ्याबद्दल लाज वाटते. गोव्यातील एक मंत्री सेक्स स्कँडलमध्ये गुंतल्याचे उघड झाले आहे. गोमंतकीयांसाठी हे लज्जास्पद आहे अशी प्रतिक्रिया वास्कोचे भाजप आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिली.
गर्भपात केल्यानंतर संबंध तोडले
पीडित महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडल्यानंतर मिलिंद नाईक यांनी तिच्याशी संबंध तोडले होते. त्यानंतर आपले दोन कार्यकर्ते तिला मदतीसाठी आपल्याकडे घेऊन आले होते. फेब्रुवारी 2019 मध्ये तिची ओळख झाली. माझ्या घरी माझ्या पत्नीच्या उपस्थितीत तिने आपली कर्मकहाणी सांगितली. तसेच स्वतःचे मोबाईल्सही पुरावे म्हणून तक्रार दाखल करण्यासाठी दिले होते. मात्र, काही दिवसांतच ती मंत्र्यांच्या भीतीने गायब झाली. पाच महिन्यांपूर्वी ती गोव्यात परत आली व आपले मोबाईल्स मागू लागली. तिच्यावर दबाव आणून हे मोबाईल्स परत घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र, या मंत्र्याचा पर्दाफाश करण्याबरोबरच असे प्रकार अन्य महिलांच्या बाबतीत घडू नयेत म्हणून आपण पुढे सरसावलो. पीडित महिला तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने अडचणी येत होत्या. अखेर तिनेच आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण उजेडात आणण्यास मला संधी मिळाली, अशी पुष्टी आमोणकर यांनी जोडली.
हजारो मेसेज, ऑडिओ अन् व्हिडिओ क्लिप्स
मिलिंद नाईक यांच्याविरोधात पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीसोबत पीडित महिलेचे दोन मोबाईल्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये मंत्री व तिच्यातील व्हॉट्सअॅप चॅट, ऑडिओ व व्हिडिओ संभाषण आहे. सुमारे 8 हजारांहून अधिक मेसेज आहेत तर सुमारे 35 हून अधिक ऑडिओ आहेत. गर्भपात केल्याचे तसेच डॉक्टरांनी दिलेल्या औषधांची यादी हे सर्व पुरावे तिने आपल्या मोबाईलवर ‘स्क्रीन शॉट’ करून ठेवले होते. मंत्र्याने गरीब पीडित महिलेला मोठमोठी स्वप्ने दाखवून आपल्या मोहजाळ्यात ओढले व तिचे लैंगिक शोषण केले. तसेच गर्भपात करण्यासाठी धमकी दिल्याची माहिती तिनेच आपल्याला दिली होती. त्याचे पुरावेही आपण पोलिसांना दिले असल्याचे आमोणकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.