Goa Loksabha: काँग्रेस, भाजप, आरजी! गोव्यात अधिसूचनेआधीच प्रचाराला वेग; पण नाराजांकडून धोका

Goa Loksabha Election Campaign: केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याआधीच प्रचाराने वेग घेतला आहे.
Goa Loksabha Election Campaign 2024
Goa Loksabha Election Campaign 2024Dainik Gomantak

Goa Loksabha Election Campaign 2024

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याआधीच प्रचाराने वेग घेतला आहे. कॉंग्रेसने आज इंडिया आघाडीतील घटक पक्षांतील नेत्यांना सोबत घेत प्रचारास सुरवात केली आणि प्रचाराचे एकत्रित नियोजनही केले.

दुसरीकडे भाजपने प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे करणे आजपासून सुरू केले आहे.

कधी नव्हे, ती भाजपने लोकसभा निवडणूक गांभीर्याने घेतली असून एकेक मत आपल्याविरोधात जाणार नाही, याची काळजी घेणे सुरू केले आहे. ही लोकसभा निवडणूक म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची कसोटीच ठरणार आहे.

आयोग 12 एप्रिल रोजी निवडणूक अधिसूचना जारी कऱणार आहे. त्याआधी उमेदवारांना बॅंकेत खाते उघडावे लागणार आहे. निवडणुकीचा सर्व खर्च त्या खात्यातून करावा लागणार आहे. त्या खर्चाचा हिशेब ठरावीक मुदतीने आयोगाला सादर करावा लागणार आहे.

सध्या अधिसूचनाच जारी न झाल्याने उमेदवारांनी केलेल्या प्रचारावरील खर्च मूळ हिशेबात जमा धरला जाणार नाही. सध्या निवडणूक निरीक्षक किंवा खर्च निरीक्षकही राज्यात आले नसल्याकारणाने केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पातळीवर आदर्श आचारसंहितेचे पालन प्रचार करताना केले जाते की नाही, याचीच काळजी घेतली जात आहे.

सभांसाठी जागा, ध्वनिक्षेपक वापराची परवानगी घेतली आहे का, याची पाहणी करण्यात येते.

उशिरा येऊनही काँग्रेसची प्रचारात मुसंडी

कॉंग्रेसने गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक आणि मडगाव येथील लोहिया मैदान अशा दोन ऐतिहासिक ठिकाणांहून प्रचाराची सुरवात केली. कॉंग्रेसने गोवा फॉरवर्डसह आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना सोबत घेतले आहे.

हे सारे पक्ष एकत्र आहेत, याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पणजी ते पत्रादेवी असा बसप्रवास या पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे केला. ‘भाजपची सद्दी संपली, कॉंग्रेसची चलती’ असा संदेश कॉंग्रेस जनतेला देऊ पाहात आहे.

Goa Loksabha Election Campaign 2024
Delhi Liquor Scam: केजरीवाल यांची अटक कायदेशीर; गोवा निवडणुकीतील मनी ट्रेलबाबत ED कडे भरपूर पुरावे

नेत्यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ

काणकोणात जनार्दन भंडारी, फोंड्यात वरद म्हार्दोळकर, बार्देशमध्ये अमरनाथ पणजीकर, पेडण्यात बाबी बागकर, सचिन परब, डिचोलीत मेघ:श्याम राऊत आदी नेते सक्रिय झाले, तरच कॉंग्रेसला जनाधार मिळविणे सोपे होणार आहे.

प्रदेशाध्यक्षपदी अमित पाटकर आल्यानंतर काहीजणांनी विश्रांती घेण्याचे स्वतःच ठरविले आहे. अशा नाराज नसलेल्या; पण सक्रियही नसलेल्या घटकांपर्यंत पाटकर यांनी पोचणे आवश्यक आहे.

‘आरजी’ची डोकेदुखी कायम

सारे पक्ष एकत्र आल्याने मतविभागणीचा फायदा भाजपला होणार नाही, असे नियोजन कॉंग्रेसने केले आहे. ‘आरजी’ पक्षाला सोबत येण्याचे आवाहन कॉंग्रेसने १५ दिवसांपूर्वीही पुन्हा केले होते. मात्र, ते सोबत न आल्याने त्यांच्यापुरती मत विभागणीची डोकेदुखी कॉंग्रेसला सहन करावी लागणार आहे.

नेत्यांना सक्रिय करण्याचे आव्हान

उत्तर गोव्यातून उमेदवारीसाठी चर्चेत असलेले कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि प्रदेश सरचिटणीस विजय भिके या प्रचार दौऱ्यात न दिसल्याने त्यांची चर्चा राजकीय वर्तुळात आज होती.

दक्षिणेकडे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी ऐन उन्हाळ्यात प्रचारात घाम काढण्यापेक्षा विश्रांती घेणे पसंत केल्याने कॉंग्रेससमोर या साऱ्यांना सक्रिय करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

‘तृणमूल’चाही सहभाग

प्रदेशाध्यक्ष पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या पसंतीचे उमेदवार पक्षश्रेष्ठींनी दिल्यामुळे ते निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली आहे.

त्यासाठी त्यांनी प्रचाराचे नियोजन करतानाही घटक पक्षांंना सोबत घेण्याचा शहाणपणा दाखविला आहे. आजच्या आघाडीच्या बैठकीला तृणमूल कॉंग्रेसचे प्रतिनिधीही उपस्थित होते, असे पाटकर यांनी बैठकीनंतर सांगितले.

भाजपकडून दौऱ्यांचे नियोजन

राष्ट्रीय पातळीवर झालेल्या सर्वेक्षणात भाजप गोव्यात एक जागा आरामात जिंकू शकेल, असा अंदाज वर्तविल्याने भाजप सावध झाला आहे. एकही मत विरोधात जाणार नाही, असे नियोजन करण्यासाठी भाजपने बैठक घेत तपशीलवार नियोजन केले आहे. मतदानाच्या दिवशीपर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत भाजपचा कार्यकर्ता किमान तीनवेळा पोचेल, असे नियोजन केले आहे.

Goa Loksabha Election Campaign 2024
Money Laundering Case: ईडीची मोठी कारवाई; 5000 कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला IGI विमानतळावरुन अटक

पल्लवींचा थेट जनतेशी संवाद

गेल्या १५ दिवसांत मोदी सरकारच्या कामगिरीची पुस्तिका, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केलेल्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका घरोघर पोचवण्यावर भाजपने भर दिला आहे. शिवाय नेहमी मतदार उपस्थित करत असलेले प्रश्न आणि त्यांना उत्तरे अशा स्वरूपाची पुस्तिकाही भाजपने प्रचार साहित्यात उपलब्ध केली आहे.

दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे या नवीन असल्याने त्यांच्या धर्मादाय आणि सामाजिक कामाविषयी आधी भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती दिल्यानंतर आता जनतेशी त्यांनी संवाद साधण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

छोट्या सभांना प्राधान्य

भाजपने उत्तर गोव्यात आता छोट्या सभांवर भर देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार स्थानिक मुद्दे प्रचारात घेतले जाणार आहेत. पुढील आठवड्याच्या अखेरीपासून जाहीर सभा घेण्याचे नियोजन भाजप करत आहे.

यासाठी काही नेत्यांच्या नावांना प्रदेश पातळीवरून पसंतीही दर्शविली आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम अद्याप उपलब्ध झालेला नाही. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आटोपले की, गोवा तिसऱ्या टप्प्यात असल्याने भाजप राष्ट्रीय पातळीवरील प्रचार नियोजनात गोव्याचा विचार करणार आहे.

छापील साहित्यावर भर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आता विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणे सुरू केले आहे. त्या त्या मतदारसंघांतील प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्याशी मुख्यमंत्री संवाद साधत आहेत, तर मतदान केंद्र पातळीवर मतदार यादी पानांवर काम करणाऱ्यांशी तानावडे संवाद साधत आहेत.

केंद्र व राज्य सरकारने १० वर्षांत केलेली कामे आणि विकसित भारत संकल्पना घराघरांत पोचविण्यासाठी छापील साहित्याची तजवीज भाजपने केली आहे.

१५ तारखेपूर्वी प्रचार करण्यावर जोर

छापील साहित्याच्या जोडीला व्हॉटस ॲप संदेशांच्या माध्यमातून भाजपने आपले म्हणणे मांडणे सुरू केले आहे. भाजपच्या उमेदवारांनी १५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी प्रचाराच्या सर्व फेऱ्या पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com