
साळगावच्या अंतर्गत रस्त्यांची डागडुजी सुरू आहे की थेट मोटो क्रॉस स्पर्धा योजली आहे, असा प्रश्न स्थानिकांना पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठाली खडी अंथरून ठेवलेली असून त्यावरून दुचाकी चालवणे म्हणजे थेट जिवावर उदार होऊन ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये भाग घेण्यासारखे आहे. खडीचे प्रमाण एवढे जास्त की रस्ता ओळखण्याऐवजी एखादा वाळवंटातील चढ-उतार असलेला रस्ता आहे की काय, असा संभ्रम निर्माण होतो. वाहनचालकांचा तोल जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत आणि तरीही संबंधित विभागाला याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. ‘विकास’ नावाखाली सुरू असलेल्या या कामामुळे रस्त्याची अवस्था ‘थरारक प्रवासाची’ झाली आहे. लोकांसाठी हा अनुभव ‘फुकटचा मोटो क्रॉस’ ठरत असला, तरी अपघाताच्या शक्यतेने नागरिक भयभीत आहेत. रस्त्यांवर केवळ खडी टाकून काम झाले समजणाऱ्या अधिकाऱ्यांनी एखाद्या दुचाकीवर बसून प्रत्यक्ष या रस्त्याची सफर करावी, म्हणजे त्यांनाही वास्तविक अनुभव आणि भान येईल. अन्यथा, ‘खडीवरून विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या’ या धोरणांची झूल जनता रोज अंगावर झेलत राहणार, हे निश्चित! ∙∙∙
विजय सरदेसाई यांचे फक्त गोव्याच्या राजकारण्यांशीच नव्हे, तर केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांशीही संबंध असून तो पक्षातीत असा आहे. काल याचा प्रत्यय केंद्रीय काँग्रेस समितीचे माजी सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्या व्हिडिओ संदेशामुळे दिसून आला. सरदेसाई यांना शुभेच्छा देण्यासाठी दिग्विजय यांनी खास व्हिडिओ पाठविताना विजय हे गोव्यातील चमकते राजकारणी असून गोव्याबद्दल त्यांना असलेले प्रेम वादातीत आहे असे त्यात म्हटले आहे. यापूर्वी २०१२ च्या निवडणुकीत दिग्विजय यांनी विजयच्या गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर युती करण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला होता, पण गोव्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यात खो घातल्यामुळे त्यांचा हा प्रयत्न सफल होऊ शकला नाही. असे जरी असले तरी विजय आणि दिग्विजय यांची मैत्री मात्र कायम राहिली. कालच्या त्या व्हिडिओने हेच पुन्हा एकदा अधोरेखित केले.∙∙∙
गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे स्थानिक व विधानसभा निवडणूक लढवणार आहे. तसे या पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवांनी जाहीर केले आहे. गोव्यात या पक्षाचा विस्तार करायचे असल्यास नवीन नेत्यांची भरती किंवा प्रभावी चेहरे पक्षाकडे वळविण्याची गरज आहे. हा पक्ष मागील अनेक वर्षे कार्यरत असला तरी या पक्षाची अपेक्षित कामगिरी दिसत नाही. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बरेच पाणी वाहून गेले आहे. आता दादा यांचा पक्ष गोव्यात विस्तार करणार असल्याने अनेकांनी आत्तापासून गुडघ्याला बाशिंग बांधण्यास सुरुवात केली आहे. म्हापशात देखील काही नेते मंडळी पुन्हा सक्रिय राजकारणात येण्यास इच्छुक आहेत. तशीही या नेत्यांची राजकीय डाळ यापूर्वी शिजली नव्हती, त्यामुळे पुन्हा नव्याने स्वतःला ते पुन्हा लाँच करू पाहताहेत. पण अजित दादा यांचा पक्ष त्यांना संधी देतो की नाही किंबहुना यात संबंधितांना किती यश मिळते हे येणाऱ्या काळात समजेल.∙∙∙
आमदार विजय सरदेसाई यांचा शनिवारी ५५ वा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त फातोर्ड्यात मोठा कार्यक्रम झाला. माजी आमदारांची मांदियाळी या कार्यक्रमाला दिसून आली. व्यासपीठावर जे माजी आमदार होते, त्यापैकी नरेश सावळ यांचे भाषण अनेकांना म्हणजेच सरदेसाईंच्या समर्थकांना सुखावणारे ठरले असेल. त्यांनी मनोहर पर्रीकर यांचे उदाहरण दिले. अनेकांना पर्रीकर विरोधी पक्षनेतेच रहावे असे वाटत होते, पण ते पुढे मुख्यमंत्री झाले. आता विजय विरोधी पक्षातील नेते आहेत, तेच तसेच असावेत असे अनेकांना वाटत आहे, पण त्यांचे भवितव्य काय आहे, जनतेने लक्षात घ्यावे असे त्यांनी उपस्थितांमध्ये आशावाद निर्माण केला. २०२७ मध्ये आम्ही विधानसभेची निवडणूक लढविणार असून जिंकू असेही सांगण्यास सावळ विसरले नाहीत. परंतु सावळ कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार हे येणाऱ्या काळात दिसेल.∙∙∙
गोव्यात सध्या टॅक्सी ॲग्रिगेटरचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. केवळ सरकारच नव्हे, तर सत्ताधारी तसेच विरोधी आमदारसुध्दा ज्यारितीने टॅक्सीवाल्यांसंदर्भात कळवळा व्यक्त करत आहेत ते पाहिले, तर या मंडळींचाही टॅक्सी व्यवसाय चालतो की काय अशी शंका कोणालाही यावी. वास्तविक गोव्यातील पर्यटन व्यवसाय टॅक्सीवाल्यांमुळे बदनाम होत आहे हे अनेकदा समाज माध्यमांवरील तक्रारींवरून दिसून येत आहे. आता त्यांत ‘रेंट अ बाईक’ व कारवाल्यांचीही भर पडलेली आहे. तरीही सरकार या लोकांना गोंजारत बसल्याची टिप्पणी होऊ लागलेली आहे. ते पाहिले तर एकेकाळी राज्यात प्रामाणिकपणे व्यवसाय करत असलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सींनाच उत्तेजन का देऊ नये अशी विचारणा होऊ लागलेली आहे. कारण या टॅक्सी कार्यरत असताना त्यांच्याबाबत कोणाच्याच विशेष तक्रारी नव्हत्या. मग अन्य कोणत्याही टॅक्सीपेक्षा त्या पुरातन टॅक्सींनाच प्रतिसाद दिला जाऊ नये हे पटण्यासारखे आहे. ∙∙∙
कळंगुटमधील समस्या किंवा इतर काही प्रकार घडतात, तेव्हा त्यावर याच मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो बोलतात, हा सर्व प्रकार म्हणजे ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ असा आहे. मतदारसंघातील अघटित घटनांना आळा घालण्यासाठी आमदाराने पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे ते कर्तव्य आहे. आपल्या मतदारसंघात काय घडते आणि काय घडत नाही, याची तसूभरही कल्पना नसल्यासारखे अधूनमधून लोबो बोलतात, तेव्हा त्यांना नक्की कोणाला सांगायचे आहे आणि कोणासमोर समस्या मांडायच्या आहेत, असा प्रश्न येथील मतदारांना नक्कीच पडलेला असणार आहे. लोबो भाजपमधून काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमधून भाजपात आल्याने त्यांची सरकारदरबारी पत कमी झाली आहे, हे मान्य आहे. त्यामुळे त्यांनाही सर्व हातचे ठेवून बोलावे लागत असावे हे नक्की. मतदारसंघात बेकायदेशीर व्यवसाय हे काही आत्ताच चाललेले नाहीत. यापूर्वीही चालत होते, हे त्यांना माहीत आहे, पण सरकारात असूनही त्यांना त्या सर्वांवर आळा घालण्यात येत नाही, हीच त्यांची हतबलता आहे.. ∙∙∙
पावसाळा दारात उभा आणि आमदारांच्या हाती बियाणे व खते हे दृश्य बघून कुणालाही वाटेल की शेतीचा खरा तारणहार शेवटी राजकारणीच! भू-रूपांतर रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत ही सार्वत्रिक ओरड आहे. सरकारने मोठा गाजावाजा केलेले शेती धोरण अद्याप अधिसूचित केलेले नाही. शेतजमीन कधी रूपांतरित होईल ते सांगता येत नाही असे असताना शेतीसाठी बियाणे व खते वाटप करून काय साध्य होईल ते वाटप करणाऱ्यांनाच ठाऊक. फोटो काढले जातात, पोस्टर झळकतात, सोशल मीडियावर व्हिडिओ फिरवले जातात आणि ‘कृपावंत आमदार’ अशी प्रतिमा जोपासली जाते. वर्षभर शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणारे आता पेरणीच्या हंगामात ‘राजकीय पीक’ पेरताना दिसत आहेत. राजकीय खते वापरून जनतेच्या भूमीत पुन्हा निवडणुकीचे अंकुर फोडण्याचा हा प्रयत्न आहे काय? की मतांची कापणी करण्यासाठीचे हे रंगीत ढग आहेत? शेतकऱ्यांच्या जीवनात खरे बदल घडवण्यासाठी नियोजन, धोरणे आणि खरी मदत हवी; केवळ फोटोसेशन नव्हे, अशी चर्चा ऐकू येत आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.