

आम आदमी पक्ष व गोवा फॉरवर्ड यांची ‘गोवा फर्स्ट’च्या नावाखाली जी युती झाली होती, ती आता तुटल्यात जमा आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ही युती जाहीर झाली होती आणि आता पंधरा-वीस दिवसांतच तिला घरघर लागली. आता विजयना महाआघाडी, म्हणजे सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे व नवे समीकरण निर्माण करण्याचे स्वप्न पडायला लागले आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आले तर उत्तमच आहे. पण, मग मध्येच विजयना ‘आप’शी युती करावी असे का वाटले, हा प्रश्न उपस्थित होतोच. हा काँग्रेसवर दबाव टाकण्याचा विजयचा प्रयत्न तर नव्हे ना, असेही वाटायला लागते.
जेव्हा ही युती जाहीर झाली, तेव्हा अनेकांनी या युतीला ‘अनैसर्गिक युती’ असे नाव देऊन टाकले. अगदी फॉरवर्डच्या काही नेत्यांनासुद्धा ही युती आवडली नव्हती. तसे पाहायला गेल्यास, ‘आप’ व फॉरवर्ड यांची कार्यप्रणाली, तत्त्वे आणि भौगोलिक पार्श्वभूमी विभिन्न असल्यामुळे ही सोयरीक जमणे कठीणच वाटत होते. आणि तसेच झाले. ‘आप’ हा गोव्याला तसा नवीनच पक्ष. जरी या पक्षाचे दोन आमदार सध्या विधानसभेत असले, तरी अजूनही या पक्षाची पाळेमुळे गोव्यात रुजली आहेत, असे दिसत नाही. गोवा फॉरवर्ड हा जरी स्थानिक पक्ष असला, तरी अजूनही तो राज्यव्यापी पक्ष बनलेला नाही. अजूनही हा पक्ष विजय सरदेसाईंच्या खांद्यावरच उभा असलेला दिसतो आहे. यामुळे विधानसभेत सध्या या पक्षाचा एकच आमदार आहे आणि तो म्हणजे विजय सरदेसाई. अशा परिस्थितीत हे दोन पक्ष एकत्र येऊन काय करणार किंवा करू शकणार, हा प्रश्न उपस्थित होतोच. आणि तो झालाही.
त्यामुळे संसार सुरू होण्यापूर्वीच घटस्फोटाची पाळी आली. आता विजयने जी महाआघाडीची हाक दिली आहे, त्यात ‘आप’ असणार की नाही, हे माहीत नाही. पण असला, असे गृहीत धरले, तरी जागावाटपाच्या वेळी काय होईल, हे सांगणे कठीण आहे. जर महाआघाडीत काँग्रेस, आरजी, ‘आप’ व गोवा फॉरवर्ड एकत्र आले, तर जागावाटपाच्या वेळी संघर्ष होऊ शकतो. खास करून, ‘आप’ व काँग्रेसमध्ये सासष्टीतील जागांवरून मतभेद होऊ शकतात. याचे कारण म्हणजे दोन्ही पक्ष प्रामुख्याने सासष्टीतील आठ मतदारसंघांतच जास्त प्रभावी आहेत. यामुळे महाआघाडी झाली, तरी जोपर्यंत जागावाटप होत नाही, तोपर्यंत काही खरे नाही, असेच म्हणावे लागेल. त्याचबरोबर या महाआघाडीचा एक समान कार्यक्रमही निश्चित करावा लागेल.
म्हणूनच सध्या ‘निक तोच भट न्हावपाक गेला’ या कोकणी उक्तीप्रमाणे या आघाडीची स्थिती आहे. आता भट खरेच आंघोळ कधी करतो किंवा करतो की नाही, हे बघणे एवढेच आपल्या हाती आहे. तोपर्यंत ‘आप’ व गोवा फॉरवर्डच्या युतीची झाली तशी अवस्था महाआघाडीची होऊ नये, म्हणजे मिळवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.