Goa Politics: खरी कुजबुज; वैष्‍णवीच्‍या मृत्‍यूस जबाबदार कोण?

Khari Kujbuj: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन गोव्यात येऊन गेले. कार्यकर्त्यांच्या सभेत त्यांनी कॉंग्रेसवर टीका करताना त्यांच्या काळात काय काय घोटाळे झाले याचा पाढाच त्यांनी वाचला.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

वैष्‍णवीच्‍या मृत्‍यूस जबाबदार कोण?

राज्‍यातील शैक्षणिकदृष्‍ट्या प्रसिद्ध असलेल्‍या बिट्स पिलानीत शिकणाऱ्या बंगळुरु येथील वैष्‍णवी जितेश या वीस वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेत आत्‍महत्‍या केल्‍याने शैक्षणिक क्षेत्राला पुन्‍हा हादरा बसला आहे. याआधी या कॅम्‍पसमध्‍ये पाच विद्यार्थ्यांनी स्‍वत:ला संपवून घेतले होते. त्‍यात आता वैष्‍णवीच्‍या माध्‍यमातून सहाव्‍या विद्यार्थ्याचा समावेश झालेला आहे. वैष्‍णवी जितेश वर्षभरापूर्वी तणावाखाली गेली होती. त्‍यामुळे तिच्‍या पालकांनी तिला बंगळुरुत नेऊन तिचे समुपदेशन केले होते. ती पुन्‍हा कॅम्‍पसमध्‍ये आल्‍यानंतर तिच्‍यावर लक्ष केंद्रीत करून तिला समूपदेशन देण्‍याची प्रमुख जबाबदारी बिट्स पिलानीच्‍या व्‍यवस्‍थापनाची होती. तरीही व्‍यवस्‍थापनाने तिच्‍याकडे दुर्लक्ष केले. त्‍यामुळे वैष्‍णवीच्‍या मृत्‍यूला जबाबदार कोण? असा प्रश्‍‍न शैक्षणिक क्षेत्रातून उपस्‍थित केला जात आहे. ∙∙∙

काँग्रेस गप्प का?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन गोव्यात येऊन गेले. कार्यकर्त्यांच्या सभेत त्यांनी कॉंग्रेसवर टीका करताना त्यांच्या काळात काय काय घोटाळे झाले याचा पाढाच त्यांनी वाचला. ज्यांच्या कारकिर्दीत हा घोटाळा झाला, तेच आता भाजपवासीय झालेत, हे मात्र ते विसरले. याबद्दल मात्र कॉंग्रेसचे स्थानिक नेतृत्व गप्प का? असा प्रश्न कॉंग्रेसवालेच आता विचारू लागले आहेत. हे घोटाळे होण्यात ज्यांचे हात आहेत, तेच आता भारतीय जनता पक्षात आहेत. अशा लोकांना भाजपने स्वीकारले कसे, असा प्रश्न कॉंग्रेस नेतृत्वाने विचारायला हवा होता, अशी चर्चा दबक्या आवाजात कॉंग्रेसवालेच करू लागले आहेत. ∙∙∙

प्रयत्‍न फळास येणार?

गत विधानसभा निवडणुकीत दोन आमदार निवडून आल्‍याने आत्‍मविश्‍‍वास वाढलेल्‍या दिल्लीचे माजी मुख्‍यमंत्री तथा ‘आप’चे राष्‍ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवालांनी गोव्‍याकडे अधिकच लक्ष केंद्रीत केलेले आहे. विधानसभा निवडणूक अवघ्‍या तेरा महिन्‍यांवर येऊन ठेपल्‍याने आतिषींनंतर केजरीवालांनीही गोव्‍यातील मुक्काम वाढवण्‍यास सुरुवात केलेली आहे. काही दिवसांपूर्वी गोव्‍यात दाखल होत त्‍यांनी ग्रामीण भागांचा दौरा करीत तळागाळातील जनतेच्‍या हृदयाला स्‍पर्श करण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. आता त्‍यांचे हे प्रयत्‍न फळास येणार? की जिल्‍हा पंचायत निवडणुकीप्रमाणे वाट्याला अपयशच येणार? हे निवडणुकीच्‍या निकालानंतरच कळेल. ∙∙∙

मुहूर्त इस्पितळाचा की प्रचाराचा ?

तुये येथे नव्या इस्पितळाचं लोकार्पण मोठ्या थाटात झालं. फित कापली, टाळ्या वाजल्या, पुष्पगुच्छ दिले गेले...पण कार्यक्रम संपेपर्यंत लोकांच्या लक्षात एकच गोष्ट पक्की राहिली, इस्पितळात काय सुविधा आहेत यापेक्षा कोणत्या नेत्याने कोणता डायलॉग मारला हीच! तुये येथील हे इस्पितळ ‘गोमेकॉ’शी संलग्न असल्याचं सांगण्यात आलं, पण मंचावर मात्र आरोग्यापेक्षा राजकारण्यांचीच ‘ओपीडी’ भरलेली दिसली. खरं तर लोक वाट बघत होते, इथे एक्स-रे आहे का? आयसीयू बेड किती? डॉक्टर कायमस्वरूपी असणार का? याबद्दल जाणून घ्यायला, पण चर्चा रंगली ती कोणाचा संवाद किती व्हायरल झाला याची. कार्यक्रमानंतर पेडण्यात चहाच्या टपरीपासून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपपर्यंत एकच विषय ‘भाषण भारी की सेवा भारी?’, त्यामुळे हा मुहूर्त इस्पितळ सुरू करण्याचा होता की, निवडणूक प्रचाराचं बिगुल वाजवायचा? याचीच चर्चा रंगते आहे. ∙∙∙

...तर तेव्हाच मी आमदार झालो असतो!

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तुये इस्पितळाच्या उद्‍घाटन सोहळ्यात बोलताना म्हणाले की, तुये येथील इस्पितळात डॉ. प्रमोद सावंत हे आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून नियुक्त होते. डॉक्टरकीचा राजीनामा देऊन ते निवडणूक लढवणार होते. त्यांनी डॉक्टरकीचा दिलेला राजीनामा तेव्हा आरोग्यमंत्री या नात्याने मी स्वीकारला. म्हणून त्यानंतर निवडणूक लढवून डॉ. प्रमोद सावंत हे आमदार झाले. त्यावर मुख्यमंत्री सावंत म्हणाले, तुये सरकारी इस्पितळाशी माझे जवळचे संबंध आहेत. या इस्पितळात मी २००७ ते २००८ पर्यंत आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून प्रत्येक गुरुवारी यायचो. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी माझा राजीनामा स्वीकारला आहे, खरी गोष्ट आहे. पण २००८ मध्ये माझा राजीनामा स्वीकारला असता तर त्याचवेळी मी आमदार झालो असतो, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगताच हशा पिकला! ∙∙∙

Khari Kujbuj
Goa BJP Politics: भाजपला गोव्यात ‘नवीन’ दिशा मिळू शकेल?

रितेशचे वाढले ‘वजन’

फोंड्यात सध्या राजकीय धुमश्चक्री सुरू आहे. फोंड्याची पोटनिवडणूक एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे त्यामुळे राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपसमोर तर पेच निर्माण झाला आहे. तिकिट द्यायची कुणाला या पार्श्वभूमीवर रवी पुत्र रितेशचे पारडे जड आहे. कारण रितेश नाईक यांची वर्णी कला मंदिरावर लावल्याने हे ‘वेटेज’ वाढले आहे. पाहुया काय होते ते. पण सद्यस्थितीत सताधाऱ्यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा चंग बांधला आहे हे मात्र खरे. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa BJP Politics: भाजपला गोव्यात ‘नवीन’ दिशा मिळू शकेल?

टीकाकारांचे गुऱ्हाळ सुरूच?

तुये इस्पितळ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षे सुरू होती. त्यात सदर इस्पितळ गोमेकॉशी संलग्न व्हावे, या मागणीचीही भर पडली. मात्र, या दोन्ही मागण्या मान्य होऊन इस्पितळाचे उद्‍घाटन होऊनही काहींना टीका करण्याचा सोस सोडवत नव्हता, त्यामुळे सोशल मीडियात सरकारवर टीकेची झोड उठवणे सुरूच ठेवल्याने स्थानिकांत टीकाकारांचे गुऱ्हाळ सुरूच, अशी चर्चा सुरू होती. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com