Goa Politics: खरी कुजबुज: भंडारी समाजाचा कलगीतुरा ऐरणीवर?

Khari Kujbuj Political Satire: लवकरच कोकणी अकादमी कोकणी ज्ञानासंदर्भात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करणार अशी घोषणा काल झाली. नोकरीसाठी ते अनिवार्य आहे.
Khari Kujbuj
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

भंडारी समाजाचा कलगीतुरा ऐरणीवर?

जिल्हा संस्था निबंधकांनी भंडारी समाजाच्या कार्यकारिणी समितीने केलेली घटना दुरुस्ती रद्द केल्यामुळे भंडारी समाजाचा कलगीतुरा आता ऐरणीवर आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन गटांचे एकमेकांवर मात करण्याचे प्रयत्न हीच सध्या या समाजाची रूपरेषा बनत चालली असल्याचे दिसायला लागले आहे आणि याचीच चर्चा सध्या फोंड्यातील भंडारी समाजात सुरू झाली आहे. फक्त कायद्याच्या चक्रात राज्यातील सर्वात मोठ्या समाजाला पिसून काढायचे काय असा सवाल या समाजातील धुरीणी विचारायला लागले आहेत. यांना समाजाच्या विकासापेक्षा फक्त ‘खुर्च्या’च दिसतात असा आरोपही व्हायला लागला आहे, पण फायदा काय? झोपलेल्या माणसाला उठविणे सोपे असते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्या माणसाला उठविणार कोण हो..? हे आम्ही नाही बोलत, भंडारी समाजातील विचारवंतच हा प्रश्न विचारायला लागले आहेत. ∙∙∙

कोकणी प्रमाणपत्राचा घोळ

लवकरच कोकणी अकादमी कोकणी ज्ञानासंदर्भात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करणार अशी घोषणा काल झाली. नोकरीसाठी ते अनिवार्य आहे. मध्यंतरी काही वर्षे अकादमीकडून ही प्रक्रिया बंद होती. आळस वा इतर कारण असेल. नंतर हे काम एका स्वायत्त कोकणी संस्थेकडे दिले गेले होते. त्यांनी स्वभावाला प्रामाणिक राहून तिथं मग्रुरी, मनमानी चालवली. उमेदवारांच्या तक्रारी वाढत होत्या. आता त्या संस्थेने हात वर केल्यावर नोकऱ्यांसाठी कोकणी प्रमाणपत्र घ्यायला मुलं अकादमीत येतात. म्हणून प्राप्त परिस्थितीत अकादमीला हे काम तीन स्तरीय यंत्रणेद्वारे करण्याचे डोहाळे लागले आहेत. अधिसूचना यायचीच आहे, तर आताच उतावीळपणे ‘शिताफुडे मीठ खावपा’ची गरज काय?’असा प्रश्न विचारला जात आहे. साहित्य पुरस्कार देताना बिगरलेखक परीक्षक बोलावले होते. शिळ्या कढीला ऊत आणताना आता प्रमाणपत्र देताना तरी कोकणी जाणणारे तज्ज्ञ लेखी - तोंडी चाचणीसाठी बोलवावे, असे बोलले जाते. ∙∙∙

दिल्लीवारी भोवणार?

काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव आणि सहप्रभारी अंजलीताईंच्या नुकत्याच झालेल्या गोवा दौऱ्यात स्थानिक नेतृत्वाविरुद्धचा असंतोष त्यांनी पाहिला. प्रदेश कार्यकारिणी, जिल्हा समिती आणि गट समितींच्या बहुतेक सदस्यांनी पक्षाचे तीन तेराच वाजल्याचे स्पष्टपणे त्यांना सांगितलेच. शिवाय आताच यावर रामबाण उपाय न काढल्यास आपच्या कॅप्टन व्हेंझी यांनी काँग्रेस गोव्यातून हद्दपार होणार अशी जी भविष्यवाणी केली आहे ती खरी ठरेल असा इशाराही दिला. त्यातच, पक्ष संघटनेची घडी नीट बसवा म्हणून माणिकराव आणि निंबाळकरताईंनी आदेश दिला म्हणून त्या दोघांविरुद्ध दिल्लीत जाऊन तक्रार करण्याचे स्थानिक नेतृत्वाचे कारनामे उघड झाल्याने आता पक्ष संघटनेतच उलथापालथ करण्याचे दोन्ही प्रभारींनी ठरविल्याचे कळते. एकंदर स्थानिक नेतृत्वाला ही दिल्लीवारी भोवणार तर नाही ना? ∙∙∙

अध्यक्षांचा त्रिफळा!

गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) कोणत्या मुहूर्तावर स्थापन झाली माहीत नाही, पण या संघटनेला लागलेले वादाचे ग्रहण मात्र काही सुटलेले नाही. या संघटनेवर सुरज लोटलीकर सोडले, तर इतर आलेले आत्तापर्यंतचे अध्यक्ष हे वादात अडकलेले असल्याचेच चित्र आहे. माजी अध्यक्ष विनोद फडके यांचे सुपुत्र विपुल फडके हे सुरवातीच्या काळात सर्व सदस्यांना बरोबर घेऊन जातील असे सर्वांना वाटत होते, पण माशी शिंकायची ती शिंकली आणि रोहन गावस देसाई यांनी सवतासुभा मांडायचेच ठरवल्याचे दिसते. त्यामुळे अध्यक्षांनी बोलविलेल्या बैठकीला सात सदस्यांनी आक्षेप घेत त्यांच्याविरोधात जिल्हा निबंधकांकडे तक्रार केली. निबंधकांनी अध्यक्ष विपुल फडके यांनी घेतलेल्या बैठकीचा निर्णय रद्दबातल ठरवत याचिकेवरील सुनावणीमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आणि त्यांचा त्रिफळा उडवला. गावस देसाई यांनाही अध्यक्षपदाचे वेध लागले आहेत आणि ऑगस्ट २०२५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीकडे डोळा ठेवूनच या कुरघोड्या चालल्यात तर नसाव्यात ना, असा संशय येतो. ∙∙∙

सांताक्रुझमध्ये कोणाचे वर्चस्व?

सांताक्रुझ मतदारसंघात सध्या पंचायत, जिल्हा पंचायत तसेच कालापूर कोमुनिदादमध्ये एका कुटुंबाने वर्चस्व मिळवले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी त्यांनी चालविली आहे. हल्लीच सांताक्रुझ मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे बूथ कार्यालय सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसने गेली अनेक वर्षे काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात आत्तापासूनच कार्यास सुरवात केली आहे. भाजपमय झालेले आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनीही मतदारसंघातील कामे धडाक्याने सुरू केली आहेत. त्यामुळे त्यांनाही स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व भाजपचे कार्य कसे काय लोकांसाठी लाभधारक ठरत आहे हे समजावून सांगण्याची कसोटी लागणार आहे. आता जिल्हा पंचायत निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सांताक्रुझमध्ये आता कोणाचे वर्चस्व आहे याची चर्चा सुरू झाली आहे. सांताक्रुझ मतदारसंघात अधिक तर मतदार हे काँग्रेसला प्राधान्य देत आले आहेत. त्यामुळे पुन्हा ते काँग्रेसच्या पाठीशी राहणार की आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्याबरोबर भाजपला पाठिंबा देणार हे वेळच ठरणार आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
Vasco Akkalkot: स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी! वास्को ते अक्कलकोट थेट बससेवा सुरु

रेती माफियांकडे दुर्लक्ष!

रेती उत्खननावर कायदेशीर बंदी असली तरी बक्कळ पैसा कमावण्यासाठी रेती माफियांकडून बेकायदेशीररीत्या चोरीछुपे रेती काढली जाते आणि ती रात्रीच्या अंधारात बाहेरच्या बाहेर विकली जाते. मोले येथील रेती माफियांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता खांडेपार येथीलही रेती माफियांना उघडे पाडण्याचा विडा मगोचे नेते केतन भाटीकर यांनी उचलला आहे. खरे म्हणजे ही रेती कोण काढतो, कधी वाहतूक केली जाते याचा सगळा अहवाल सरकारी यंत्रणेकडे असतो, पण कारवाई केली जात नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे सर्वांना पोचणारी ‘चिरीमिरी’..! ∙∙∙

Khari Kujbuj
खरी कुजबुज: ‘शॅक’धारकांना सुखद धक्का!

मंत्री आलेक्स सिक्वेरा असे का म्हणाले?

पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरांचा जनता दरबार संपल्यावर आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी नोटरीसंदर्भात बेकायदा जमीन संपादन प्रकरणी केलेल्या वक्तव्याचा खुलासा केला. ते म्हणाले, आपले विधान पूर्ण अभ्यासाअंती करण्यात आले आहे. आपली पंतप्रधान कार्यालयातही तक्रार करण्यात आली आहे. तरीसुद्धा जोपर्यंत मी मंत्री असेन तोपर्यंत आपण हे विधान मागे घेणार नाही. कारण यात तथ्य आहे. बाकी सर्व अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे आहेत. नेमके त्यांना असे बोलायची काय गरज होती असा प्रश्न तेथील उपस्थितांना झाला. सध्या मंत्रिमंडळ बदलाचे वारे वाहत आहे. त्याचप्रमाणे आलेक्स सिक्वेरांऐवजी आणखी कोणाची वर्णी लागणार आहे अशी वावडी आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या वक्तव्यावरून या वावडीत काही तथ्य आहे का? हा सुद्धा प्रश्न उपस्थितांमध्ये पसरला तर त्यात गैर काय! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com