Mapusa News : उन्हाळा असो किंवा पावसाळा बार्देशात पाण्याची समस्या भेडसावत असते. परिणामी, लोकांची गैरसोय होते व मनस्ताप सहन करावा लागतो. याच जुलै महिन्याच्या सुरवातीला म्हापसा शहरासह बार्देशवासीयांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागला होता. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पातील मुख्य वाहिनीत बिघाड झाल्याने ही समस्या ओढवली होती. तीन दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. भरपावसात ही स्थिती उद्भवल्याने नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त करीत सडकून टीका केली होती.
अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पास तिळारी धरणातून कच्च्या पाण्याचा पुरवठा होतो. अस्नोडा प्रकल्पात प्रक्रिया झाल्यानंतर हे पाणी ग्राहकांना पुरविले जाते. परंतु, अस्नोडा प्रकल्पात फिल्टरेशन प्रकल्प सुरू झाल्यापासून तो अद्ययावत केलेला नाही. यात आधुनिक सुधारणांची गरज आहे, असे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे प्रामाणिक मत आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत तिळारीतून अस्नोडा प्रकल्पात येणाऱ्या कच्च्या पाण्यात माती अधिक असते. मातीमिश्रित पाण्यामुळे फिल्टरेशन प्रक्रियेत अडचणी येतात. परिणामी, पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. अशावेळी लोकांना मग टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते किंवा पाणी विकत घ्यावे लागते.
प्रकल्प चालतात आळीपाळीने
अस्नोडा येथे प्रत्येकी १२ एमएलडी तीन, ३० एमएलडी चार, ५० एमएलडी क्षमतेचे दोन ट्रीटमेंट प्रकल्प आहेत. हे प्रकल्प आळीपाळीने चालविले जातात.
बांधकामे वाढल्याने पाण्याची मागणी वाढली; परंतु पाणीपुरवठा करण्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा आवश्यकतेनुसार उभ्या राहिलेल्या नाहीत.
अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पस्थळी यांत्रिक बिघाड व विजेशी संबंधित समस्यांमुळे पाणीपुरवठ्यातील अडचणी वेळोवेळी वाढत आहेत.
उन्हाळा असो किंवा पावसाळा लोकांना पाण्याची समस्या भेडसावतेच. विशेष म्हणजे, पावसाळ्यात ही स्थिती नेहमीच असते. जास्त पाऊस पडला की मातीमिश्रित पाण्याचे प्रमाण वाढते. ही स्थिती आजची नाही व प्रशासनास याची कल्पना आहे. अशावेळी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प अद्ययावत करायला कुठलीच पावले अद्याप तरी उचललेली दिसत नाहीत. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प अद्ययावत होणे नितांत गरजेचे आहे.
-अॅड. शशांक नार्वेकर, नगरसेवक, म्हापसा पालिका
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.