Mandovi River Goa: मांडवीचे विराट रूप अन् तिच्या पात्रातील 'आठवे बेट' आखाडा; जकातीपासून देवालयांपर्यंतचा रंजक इतिहास

Akhada Island Goa History: आखाडा म्हणजे सीमा शुल्क (कस्टम) पूर्वकाळी त्या बेटावर व्यापाराची भरभराट चालत होती.
Akhada Island Goa History
Mandovi River GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मधू य. ना. गावकर

आखाडा म्हणजे सीमा शुल्क (कस्टम) पूर्वकाळी त्या बेटावर व्यापाराची भरभराट चालत होती. त्यामुळे हिंदूधर्मीयांनी आठ बेटांवर सप्तकोटेश्‍वर, देवकीकृष्ण, सातेरी, शांतादुर्गा, गणपती, बेताळ, रवळनाथ महादेवाची देवालये उभारून सर्व बेटांच्या बंदराला पंचगंगा तीर्थक्षेत्र नाव दिले.

साहित्यात सीता या शब्दाला भूमी आणि इंद्र शब्दाचा अर्थ पर्जन्य मानला आहे. या दोन शब्दांतून नदीचा जन्म होतो, भारतात गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि कावेरी नद्यांना पूज्य मानतात. त्याना मिळणाऱ्या अनेक उपनद्याही पूज्य आहेत. त्या नद्याप्रमाणे गोव्यात प्रमुख सात नद्या आणि त्यांना मिळणाऱ्या उपनद्या आहेत, गोव्याची प्रमुख नदी मांडवी असून, पाण्याच्या बाबतीत तिची गंगेच्या पाण्याबरोबर तुलना करतात.

Akhada Island Goa History
Goa Development Fund: 'गोव्याच्या विकासासाठी भरपूर निधी देऊ'; फोंड्यात शिवराजसिंह चौहान यांचे आश्वासन, 80 कोटींच्या धनादेशांचे वितरण

गंगेच्या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याने तिच्या पाण्याला पवित्र मानतात. म्हादई मांडवीचे उगमस्थान पश्‍चिम घाटातील देगाव गावात झाले, तरी ती एकमुखी नाही. तिच्या प्रवाहाचे चित्र डोळ्यांसमोर उभे केल्यास ती विराट रूपाने पहावयास मिळते. त्यासाठी गोव्यातील बार्देश, डिचोली, सत्तरी, धारबांदोडा फोंडा आणि तिसवाडी तालुक्याचा आरसा समोर धरावा लागतो. उगमाने ती म्हादई होते, नंतर मांडवीचे रूप धारण करीत प्रवासताना भांडुरा, कळसा, बैल, कोतरान, पानशिरा, सुर्ला, रगाडा, दूधसागर खांडेपार, नावतान, कुडणे, कळटी, वाळवंटी डिचोली, अस्नोडा, कट्टीका, हलतरा आणि म्हापसा या उपनद्यांशिवाय कैक खाड्या मिळाल्याने तिचे विराट रूप कळून येते.

मांडवी नदीच्या उपनद्यांना पश्‍चिम घाटातून प्रवास करताना त्यांना उंचावरून झेप घेत धबधब्याच्या रूपाने कोसळत खाली प्रवास करावा लागतो. वजरा सखला सुर्ल, लाडफे, सालेली, साट्रे, चिकली, पैकुळ, कृष्णापूर, हरवळे या ठिकाणी त्या रूपेरी प्रवाहाने कोसळताना दिसतात, तिच्या उपनद्यांनी धबधबे निर्माण करून ज्याप्रमाणे खाली येण्यास वाटा निर्माण केल्या, त्या उपनद्या आणि धबधब्यांच्या शोधमार्गाने माणसांनी आपल्या सोयीसाठी घाटमार्ग वाटा तयार करून देवाणघेवाणीने विकास साधला.

चोर्लाघाट, रामघाट, अण्णेघाट, बोरघाट, केळघाट, राणीपाज, अनमोड घाट अशा नावांनी ते ओळखतात, मांडवीचे उगमस्थान देगाव आणि मुखस्थान तिसवाडीतील मीरामार आणि बार्देशातील रेईस मागूस गावांच्या मध्ये असून तिने ती भूमी विभागून आपला प्रवाह अरबी समुद्राला दिला आहे.

ज्यावेळी सागराला भरती येते, त्यावेळी तिच्या पात्रातून खार पाणी म्हापसा तार, अस्नोडा पार, डिचोली वाठादेव साखळी बाजार, विर्डी सावबांध, कुडणे सास्त, उसगांव पार आणि आंबेशी, गांजे पर्यंत पोहचते. तिच्‍या पात्रात वरच्या भागात गोडी मासळी, मध्य भागात खारगोड पाण्यातील मासळी आणि मुखाकडे समुद्री खार मासळी सापडते.

Akhada Island Goa History
Goa CZMP: 30 लाखांमुळे लटकला 'कुशावती'चा आराखडा; नव्या जिल्ह्याच्या समावेशासाठी अतिरिक्त निधीची मागणी

त्या विराट रूपातील मांडवीच्या पाण्यावर जैविक संपदेला जगवण्यासाठी तिने आपला प्रवाह न थांबवता मानव, पक्षी वृक्षलतिका, शेती, पशू बागायतीला सदोदित पाणी पुरवठा करीत आहे. निरीक्षणाने तिचे रूप अभ्यासताना तिच्या आश्‍चर्यकारक आभूषणांची रूपे पहावयास मिळतात. तिचा जन्म होताना गोव्याच्या भूमीत आणि पश्‍चिम घाटात बऱ्याच मोठ्या प्रमाणात भूगर्भीय उलथापालथी झाल्याचे दिसून येते. मैदानी भागातून वाहताना तिने आपल्या पात्रात खांडेपारचे धाकटे जुवे, वाघुर्मेचे व्होडले जुवे, ही दोन बेटे निर्माण करून म्हादई आणि खांडेपार उपनद्यांचे पाणी आपल्या प्रवाहात घेऊन, पुढच्या भागात सांतइस्तेव्ह बेटाला धडक देऊन दोन भागांतून प्रवासाने पुढे जाते.

एक फाटा मांडवी जुवारी नद्यांना जोडणारा बाणस्तारी नदी होतो. दुसऱ्या फाट्याने तिने सांतईस्तेव्ह, आखाडा, कुंभारजुवा, दिवाडी, वाशी, चोडण ही बेटे निर्माण करून, पुढे अस्नोडा पार आणि पोंबुर्फा उपनद्यांच्या मध्ये कालवी आणि खोर्जुवे बेटांची निर्मिती करून एक आश्‍चर्य निर्माण केले आहे. तिच्या पात्रातील दहा बेटांमध्ये आखाडा बेटाचा आठवा नंबर लागतो. आखाडा म्हणजे सीमा शुल्क (कस्टम) पूर्वकाळी त्या बेटावर व्यापाराची भरभराट चालत होती. त्यामुळे हिंदूधर्मीयांनी आठ बेटांवर सप्तकोटेश्‍वर, देवकीकृष्ण, सातेरी, शांतादुर्गा, गणपती, बेताळ, रवळनाथ महादेवाची देवालये उभारून सर्व बेटांच्या बंदराला पंचगंगा तीर्थक्षेत्र नाव दिले.

व्यापाराची उलाढाल करताना आखाडे (पूर्वीचे नाव अक्षयतीर्थ) बेटावर जकात अधिकारी बसवून परकीय व्यापाऱ्यांकडून जकातकर वसूल करीत होते, म्हणून या बेटाला आखाडा म्हणू लागले. त्या बेटाच्या पूर्वेला सांतईस्तेव्ह, पश्‍चिमेला दिवाडी, उत्तरेला नार्वे आणि दक्षिणेला कुंभारजुवा बेटांच्या उपनद्यांनी आणि मांडवी नदीच्या पात्राने वेढले आहे. बेटाच्या वर्तुळाकार तटावर हिरव्या कांदळवनाने कोट केले आहे. त्या वनातील वृक्षांवर कैक प्रकारचे पक्षी पहावयास मिळतात, कारण पंचगंगा परिसरात कैक नदी फाट्यांचा संगम झाल्याने जुवारी मांडवीच्या मुखातून भरतीच्या वेळी येणारी समुद्रीय मासळी त्या ठिकाणी अन्नासाठी थांबते.

बेटावरील स्थानिक मच्छिमारी लोक, हार, खुटावणी, वेणी, काटाळी, पागेर, दिपावणी करून मासळी पकडून त्या व्यवसायाने आपला संसार चालवतात. आखाडा बेटावर शंभर-सव्वासे घरे असून तिथले लोक देवाची भक्ती करणारे आहेत. त्या बेटावर बारमाही उत्सव साजरे होतात. तिथला युवक कष्‍टाळू असला तरी त्यांच्या अंगात चित्रकला, भजन, नाट्य, संगीत,घुमट या गायनकलेत प्राविण्य मिळवले आहे.

आखाडा बेटावर काळोबा, ब्रह्मेश्‍वर, पांडुरंग, विठ्ठल रखुमाई, सत्यनारायण देवालये उभारून त्यांनी तिथे भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे. हल्लीच उत्खननात सापडलेल्या पूर्वकाळीच्या वीटांनी बांधकाम केलेल्या वास्तूवरून दिसून येते की ही पुरातन वास्तू बेटाच्या टेकडीवर मध्यवर्ती ठिकाणी सापडली असून ती मातीच्या भरावाने संपूर्ण गाडून टाकली होती. ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि इतिहास अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांनी त्या वास्तूच्या ठिकाणाला भेट देऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी विशेष इतिहास अभ्यासक आणि पुरातनवास्तू खात्यामार्फत ते तिचा शोध लावीत आहेत. ती वास्तू एखादे देवालय, भांडार कोठी, जकात, सीमाशुल्क कार्यालय की एखाद्या राज्यकर्त्याचा बंगला की बाटाबाटीच्या वेळी धर्मांतर न करणाऱ्या माणसांना तिथे आफोन्‍स आल्कबुकर्कने समाधी दिली. हे येणारा काळ आपल्याला सांगेल.

Akhada Island Goa History
Goa Agriculture: शेती वाढवा, निर्यातीची दारे खुली! नारळ-काजू बागायतींच्या पुनरुज्जीवनासाठी शिवराजसिंह चौहानांची मोठी घोषणा

आखाडा बेट तीन वाड्यांनी ओळखले जाते, पण्णीवाडा, पोस्तावाडा, आणि मधलावाडा, वाड्यावर नदी किनारी होडीतून प्रवास करण्याची ठिकाणे होती. तिथला युवक शिक्षण घेण्यास, अगर मासळी व्यापार करणारे लोक बाजाराला जाण्यासाठी तार बंदराचा उपयोग करून पैलतीर गाठत होते. त्या बेटावर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याचे प्रेत होडी प्रवासाने नार्वा-तीर्थावर नेऊन त्यावर अंतिम संस्कार तथा दहन संस्कार करतात. हा प्रकार अंगावर शहारे आणतो, तरी तिथला कष्टकरी मांडवीशी नाते जुळवून येणाऱ्या संकटावर मात करीत सामोरे जातो. बेट जरी लहान असले तरी निसर्गाने त्याला शेती, गोडपाणी, आंबा, काजू, नारळ आणि रानमेव्याचे धन दिले आहे. गोवा मुक्तीनंतर त्या बेटावर प्रथम पूल उभारला आणि बांधावर रस्ता तयार करून तिथल्या कष्टकऱ्याला त्यांच्या दारापर्यंत प्रवासाचे दार उघडे झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com