Goa Election: काँग्रेस तुल्‍यबळ उमेदवारांच्‍या शोधात

उत्तर गोव्‍यात चाचपणी सुरू: डिचोलीमध्ये तर काँग्रेसकडे सध्या एकही मजबूत उमेदवार नाही.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

पणजी: विधानसभेच्या निवडणूका (Goa Assembly Election) जवळ येत आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. सत्ताधारी भाजपकडे सासष्टीतील काही मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदरासंघात एकापेक्षा जास्त उमेदवारीचे मजबूत दावेदार आहेत. मात्र, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे अद्याप बऱ्याच मतदारसंघात मजबूत उमेदवार सापडत नाहीत. अनेक इच्छूक उमेदवार सध्या काँग्रेस पक्षात (Congress) प्रवेश करीत आहेत. मात्र, त्यातील बहुतांश राजकारणात नवखे आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल का? सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला टक्कर देऊन निवडून येण्याची किमया ते साधतील की नाही, तो येणारा काळच ठरवेल.

निवडणुकीला अद्याप वेळ आहे. तोपर्यंत अनेक घडामोडी घडणार आहेत. उमेदवारी वाटपावेळी उमेदवारी न मिळालेले अनेक मजबूत उमेदवार दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवतील आणि त्यानंतरच निवडणुकीला खरी रंगत येईल. उमेदवारांनी कितीही दावे केले, तरीही मतदारांचा कौल कुणाला यावरच सर्वकाही अवलंबून आहे.

डिचोली, मये, थिवी, हळदोणे मतदारसंघ

डिचोलीमध्ये तर काँग्रेसकडे सध्या एकही मजबूत उमेदवार नाही. घनश्‍याम राऊत हे उमेदवारीवर दावा करीत असले, तरी साळ वगळता इतरत्र त्यांना पाठिंबा कमीच आहे. मये मतदारसंघातही काँग्रेसकडे मजबूत उमेदवार नाही. थिवी मतदारसंघातही डिचोली व मये सारखीच परिस्थिती आहे. हळदोण्यात काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास अमरनाथ पणजीकर हे आमदार ग्लेन टिकलो यांना टक्कर देऊ शकतात.

Goa Congress
Goa Election: पर्ये मतदारसंघात ‘राणे’ कुटुंबियांची मक्तेदारी

पेडणे, म्‍हापसा, ताळगाव मतदारसंघ

म्हापसामध्ये सुधीर कांदोळकर हे काँग्रेसकडे मजबूत उमेदवार असले, तरी उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके हे उमेदवारीसाठी दावेदारी करत आहेत. पणजीतून हल्लीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी महापौर उदय मडकईकर यांना भाजपच्या नाराजांनी आतून सहकार्य केले, तरच आमदार बाबूश यांना ते घाम काढू शकतील. ताळगावमध्ये टोनी रॉड्रिगीस हे महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसमध्ये दाखल झाले, तरी ताळगाव हा मोन्सेरात कुटुंबाचा मजबूत गड आहे. सांताक्रुझमध्ये रुडाल्फ फर्नांडिस यांच्या रुपात काँग्रेसकडे मजबूत उमेदवार आहे. मागील निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून उभे राहून तिसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त केली होती.

साखळी मतदारसंघ

साखळी मतदारसंघात काँग्रेसचे अनेक इच्छुक उमेदवार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना टक्कर देणारा उमेदवार सध्यातरी नाही. साखळीचे विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात मागील निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना साखळीच्या बाहेर ग्रामीण भागात मते प्राप्त करणे कठीण गेले.

पर्वरी, पेडणे, मांद्रे, शिवोली मतदारसंघ

पर्वरीत काँग्रेस सोबत भाजपकडेही मजबूत उमेदवार नाही. पेडणे मतदारसंघात काँग्रेसपेक्षा मगो मजबूत असल्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना काँग्रेसपेक्षा मगोच्या उमेदवारांकडे संघर्ष करावा लागणार आहे. मांद्रेमध्ये सचिन परब, ॲड. रमाकांत खलप हे काँग्रेस उमेदवारीचे दावेदार आहेत. भाजपमध्येही उमेदवारीसाठी आमदार दयानंद सोपटे व माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यात रस्सीखेच असल्याने येथे भाजपला काँग्रेस नव्हे तर मगो टक्कर देण्याच्या स्थितीत आहे. शिवोलीमध्ये काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही. मात्र, साळगावात ॲड. यतीश नाईक व तुलीयो डिसोझा यांच्‍यासारखे दमदार उमेदवार आहेत. साळगाव व शिवोलीत सध्या गोवा फॉरवर्डचे आमदार असले, तरी ते येत्या निवडणुकीत त्याच पक्षाचे उमेदवार असतील का? हा प्रश्‍न आहे. कळंगुटमध्ये अग्नेल फर्नांडिस व जोसेफ सिक्वेरा यांच्यात एकमत झाले, तरच मंत्री मायकल लोबो यांना ते टक्कर देऊ शकतील.

Goa Congress
Goa Assembly Election: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग

सांतआंद्रेत, प्रियोळ, मडकई मतदारसंघ

सांतआंद्रेत मात्र काँग्रेस सध्या मजबूत उमेदवाराच्या शोधात आहे. कुंभारजुवेत पांडुरंग मडकईकर यांचे प्राबल्य आहे. येथे भाजप व कॉंग्रेसची उमेदवारी कुणाला मिळते, यावर बरेच काही अवलंबून आहे. मडकईकर वगळता येथे दोन्ही पक्षाकडे मजबूत दावेदार असले, तरी ते नवखे उमेदवार ठरणार आहेत. प्रियोळ व मडकई या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला मजबूत उमेदवार गेली अनेक वर्षे सापडलेला नाही. या दोन्ही मतदारसंघात मगोचे प्राबल्य आहे. प्रियोळात कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचे स्थान सध्या घट्ट दिसत आहे.

फोंड्यात चुरशीची लढत

फोंडा मतदारसंघात मगो व काँग्रेसमध्ये टक्कर आहे. रवी नाईक हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, ते पक्षासोबत नाहीत. त्यांचे पूत्र भाजपात दाखल झालेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत रवी नाईक यांची भूमिका निर्याणक ठरणार आहे. शिरोडा मतदारसंघात तिन्ही पक्षाची संघटना मजबूत असली, तरी महादेव नाईक हे ‘आप’मध्ये दाखल झाल्‍याने शिरोड्यात सध्या कॉंग्रेसकडे तगडा उमेदवार नाही.

पर्ये मतदारसंघ

उत्तर गोव्याचा विचार करता सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे हे काँग्रेसचे निष्ठावान आमदार आहेत. मात्र, ते येणारी निवडणूक लढवतील की नाही याबाबत साशंकता आहे. त्यांचे पूत्र विश्‍वजित राणे हे स्वतः भाजप सरकारात आरोग्यमंत्री आहेत. येत्या निवडणुकीत ते स्वतः पर्येतून भाजपच्या उमेदवारीवर उभे राहण्यास इच्छुक आहेत, तर त्यांच्या पत्नी डॉ. दिव्या राणे या वाळपईतून भाजपच्या उमेदवार असू शकतात. या दोन्ही मतदारसंघात प्रतापसिंह राणे वगळता काँग्रेसकडे मजबूत उमेदवार नाही. सध्या भाजपात असलेले विश्‍वजित कृष्णराव राणे हे पर्येतून एक मजबूत दावेदार असले, तरी त्यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्यास ते कोणत्या पक्षात जातील त्यावर बरेच काही अवलंबून आहे.

-विठ्ठल गावडे पारवाडकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com