

पणजी: स्मार्ट वीज मीटरमुळे वाढीव वीज बिले येत असल्याचा आरोप करत हणजूण ग्रामस्थ, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता.११) विद्युत भवनात धडक देत आंदोलन केले.
सामान्य नागरिकांवर वाढीव वीज बिलांचा आर्थिक बोजा पडत असून, यामुळे लोकांवर ‘पेज’ खाण्याची वेळ आली आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनाचा भाग म्हणून विद्युत भवनाच्या प्रवेशद्वारात उपस्थितांना ‘पेज’चे वाटप करण्यात आले.
काँग्रेसचे ॲड. अमित पालेकर, गजानन तिळवे, योगेश गावकर तसेच ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. सुरवातीला पोलिस व कनिष्ठ अभियंत्यांसमोर आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र, मुख्य अभियंत्यांची भेट नाकारण्यात आल्याने त्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले.
अखेर मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस, अधीक्षक अभियंता काशिनाथ शेट्ये आणि वरिष्ठ अभियंता मयूर हेदे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. यावेळी स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिले आल्याचा मुद्दा उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
गजानन तिळवे यांनी सरकारवर टीका करत वाढीव बिलांमागील कारणांची समाधानकारक उत्तरे अधिकाऱ्यांना देता आली नसल्याचे म्हटले. सरकारच्या खर्चाचा भार जनतेवर टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, शुक्रवार (१२ जून) ही वीज बिल भरण्याची अंतिम तारीख असून, नागरिकांनी वाढीव बिले भरू नयेत, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले.
वाल्मिकी नाईक यांनी मंजूर भारावरील दंडाबाबत ग्राहकांना योग्य माहिती न देता शुल्क आकारले जात असल्याचा आरोप केला. दोन बिले थकल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवल्याचे त्यांनी नमूद केले.
वीजभार वाढविण्यासाठी मुदत द्या!
ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले की, पूर्वी सुमारे ९०० रुपये वीज बिल येणाऱ्या ग्राहकाला स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल साडेचार हजार रुपयांचे बिल आले आहे.
ग्राहकांनी विजेचा भार वाढवून घेतला नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक शुल्क आकारण्यात येत आहे. नागरिकांना विजेचा भार नियमित करण्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांची मुदत देण्यात यावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.