

पणजी: राज्यातील ९,६६८ शेतकरी सुमारे १७,१८६ हेक्टरवर प्राकृतिक तसेच परंपरागत शेती कसत असल्याचे केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी राज्यसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.
गोव्यासह देशभरातील जे शेतकरी राष्ट्रीय प्राकृतिक मिशनअंतर्गत शेती करतात, त्यांच्यासाठी केंद्र सरकारने सुमारे ४४ लाखांचे, तर परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेती करणाऱ्यांसाठी १२.३९ कोटींचे अर्थसाहाय्य २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी निश्चित केले होते.
त्याचा लाभ घेत राज्यातील १,६२३ शेतकऱ्यांनी प्राकृतिक शेतीवर भर देत सुमारे ६३० हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड केली. तर ८,०४५ शेतकऱ्यांनी या दोन वर्षांच्या काळात परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत १२.३९ कोटींचे अर्थसाहाय्य घेत सुमारे ६,५५५ हेक्टर जमिनीत पिकांची लागवड केल्याचे मंत्री ठाकूर यांनी उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
प्राकृतिक, परंपरागत शेती म्हणजे काय?
प्राकृतिक, परंपरागत शेती म्हणजे रासायनिक खते व कीटकनाशकांविना केली जाणारी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती.
यात शेणखत, गोमूत्र आणि निसर्गातील घटकांचा वापर करून जमिनीचा पोत व मानवी आरोग्य सुधारले जाते.
शेतीमध्ये गांडूळ खत, शेणखत आणि पालापाचोळा यांसारख्या स्थानिक घटकांचा वापर केला जातो.अशा घटकांमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते. शिवाय त्यातून विषमुक्त व पौष्टिक अन्नधान्य उपलब्ध होते.अशा प्रकारच्या शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.