

पणजी: तंदुरुस्त होऊन संघात परतलेली कर्णधार तनया नाईक हिचा शानदार फॉर्म शनिवारीही कायम राहिला, तिचे शतक फक्त पाच धावांनी हुकले, पण २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट गटात गोव्याने चंडीगडला सहा धावांनी हरविले.
सामना देहरादून येथील अभिमन्यू क्रिकेट अकादमी मैदानावर झाला. ९५ धावांवर नाबाद राहिलेल्या तनया हिने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ११८ चेंडूंचा सामना केला व १२ चौकार मारले. त्यामुळे गोव्याला निर्धारित ५० षटकांत ८ बाद २०१ धावा केल्या.
नंतर गोव्याच्या गोलंदाजांनी चंडीगडला ४९.२ षटकांत १९५ धावांत गुंडाळले. मागील लढतीत फलंदाजीतील हाराकिरीमुळे विजयाची संधी असताना गोव्याला सौराष्ट्रविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. एकंदरीत गोव्याचा हा सलग दोन पराभवांनंतर पहिला विजय ठरला. तनयाचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. तिने सौराष्ट्रविरुद्ध ८४ धावांची खेळी केली होती.
संक्षिप्त धावफलक : गोवा : ५० षटकांत ८ बाद २०१ (हर्षिता यादव ३५, ऊर्वशी गोवेकर १३, तनया नाईक नाबाद ९५, तनिशा गायकवाड ६, प्रेषा नाईक ४, स्वराली कासार ०, पूजा कलेल ३, पलक आरोंदेकर ९, मेताली गवंडर ९, निर्मिती खानविलकर नाबाद ६, पुष्पा बिष्णोई ३-४०) वि. वि.
चंडीगड ः ४९.२ षटकांत सर्वबाद १९५ (आराधना बिश्त ४७, यशिका ४२, हितांशी ३२, मन्नू २७, मेताली गवंडर १०-३-३७-३, हर्षिता यादव ९-०-३६-१, विदिका सावंत १०-०-३०-१, तनया नाईक ६-०-२८-०, पूजा कलेल ७.२-०-३३-१, निर्मिती खानविलकर ७-०-२९-१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.