
पणजी: देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अखेरचा मोसम २०२९-२० मध्ये गोव्यातर्फे खेळलेल्या स्मित पटेल याने वयाच्या ३२व्या वर्षी कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा गाठला. अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळताना या यष्टिरक्षक-फलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये लॉडरहिल येथे कॅनडाविरुद्ध धडाकेबाज शतक नोंदविले.
स्मित पटेल याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. कॅनडाविरुद्धच्या आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक लीग २ स्पर्धेतील सामन्यात स्मितने नाबाद १५२ धावा केल्या. पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट शतक नोंदविताना त्याने एकूण १३७ चेंडूंतील खेळीत १२ चौकार व चार षटकार मारले.
स्मित यानेने मूळ दिल्लीचा मिलिंद कुमार (११५) याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी २०८ धावांची अभेद्य भागीदारी केली. त्या जोरावर अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३ बाद ३६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात कॅनडाचा डाव ४६.२ षटकांत १९२ धावांत संपुष्टात आल्यामुळे अमेरिकेने १६९ धावांनी दणदणीत विजय संपादन केला.
अहमदाबाद येथे जन्मलेल्या स्मित याने अमेरिकेतर्फे आतापर्यंत १३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला असून एक शतक व दोन अर्धशतकांसह ४१.५४च्या सरासरीने ४५७ धावा केल्या आहेत. भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळल्यानंतर स्मितने अमेरिकेचा रस्ता धरला. गतवर्षी तो या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास पात्र ठरला व त्याने १३ ऑगस्ट २०२४ रोजी पदार्पण केले.
भारताच्या १९ वर्षांखालील संघाने २०१२ साली विश्वकरंडक जिंकला होता, तेव्हा विश्वविजेत्या संघाचा स्मित प्रमुख सदस्य होता. त्या स्पर्धेतील सहा सामन्यांत त्याने ५९.३३च्या सरासरीने १७८ धावा केल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरात, बडोदा व त्रिपुराकडून खेळल्यानंतर अखेरचा मोसम तो गोव्याकडून यष्टिरक्षक-फलंदाज या नात्याने खेळला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.