

पणजी: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत एलिट ड गटात अपराजित राहत बाद फेरी गाठलेला गोव्याचा संघ आता अखेरच्या साखळी लढतीत अव्वल स्थान राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. गट विजेता ठरण्यासाठी त्यांना अनिर्णित लढतीतील आघाडीचे तीन गुणही पुरेसे ठरतील अशी सध्याची स्थिती आहे.
गोवा व चंडीगड यांच्यातील चार दिवसीय सामना मंगळवारपासून (ता. १६) पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर खेळला जाईल. चार सामन्यांत तीन विजय व एक अनिर्णित अशी शानदार कामगिरी बजावलेला गोव्याचा संघ २३ गुणांसह सहा संघांत प्रथम स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशचे १९ गुण आहेत.
त्यांचा सामना बरेली येथे बंगालविरुद्ध खेळला जाईल. गोव्यासह बाद फेरी गाठण्यासाठी उत्तर प्रदेशला या लढतीत पराभव टाळावा लागेल. बंगालचे १५ गुण आहेत. गोव्याने जिगरबाज खेळ केल्यामुळे बंगालला मागील लढतीत कल्याणी येथे विजय हुकला, त्यामुळे त्यांची वाटचाल कठीण बनली आहे.
चंडीगडने मागील लढतीत छत्तीसगडला नमविले, दोन विजय व तेवढेच पराभव यामुळे त्यांचे १४ गुण झाले आहेत. गोव्याविरुद्ध बोनस गुणासह विजय मिळविला, तरच त्यांना बाद फेरीची संधी असेल. या गटातील अन्य दोन संघांत छत्तीसगडचे सहा गुण आहेत, तर आसामला चारही लढतीत पराभव पत्करावा लागला आहे.
एलिट ड गटातील अपराजित मालिका कायम राखण्यासाठी गोव्याचा संघ मंगळवारी पूर्ण ताकदीनिशी मैदानावर उतरणार हे निश्चित असले, तरी चंडीगडकडून त्यांना चिवट प्रतिकार अपेक्षित आहे. सारे काही नियोजनानुसार घडल्यास गोव्याचा संघ गट विजेता या नात्याने थेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल होण्याचे संकेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.