

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनची रणजी संघ प्रशिक्षकपदाबाबतची मागील पाच मोसमांतील बदलाची परंपरा लक्षात घेता, २०२६-२७ मोसमातील स्पर्धेसाठी संघटना नवी नियुक्ती करू शकते. याबाबत ते अनुकूल असल्याची माहिती आहे.
गोव्याची रणजी करंडक एलिट अ गटातील मोहीम ११ ऑक्टोबरपासून सुरू होईल. सात सामन्यांपैकी चार सामने अवे, तर तीन लढती होम मैदानावर होतील. बडोदा, उत्तर प्रदेश, विदर्भ, बिहार, पुदुचेरी, मध्य प्रदेश, गतविजेता जम्मू-काश्मीर या मातब्बर संघांचे आव्हान आगामी मोसमात गोव्यासमोर आहे.
याव्यतिरिक्त नोव्हेंबरमध्ये गोव्याचा संघ सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटात हैदराबाद, मुंबई, गुजरात, विदर्भ, ओडिशा, उत्तराखंड, छत्तीसगड या संघांविरुद्ध तर डिसेंबरमध्ये विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या एलिट क गटात पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड या संघांविरुद्ध खेळेल.
जीसीए सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२६-२७ मोसमासाठी गतमोसमातील सीनियर पुरुष संघाचे प्रशिक्षक बडोद्याचे मिलाप मेवाडा यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता फारच अंधूक आहे. संघटनेने नव्या नियुक्तीबाबत विचारमंथन सुरू केले असून काही पर्यायी नावांची चाचपणीही केली आहे. मात्र अजून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
२०२५-२६ मधील रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या तीन लढतीत एक विजय व दोन अनिर्णित निकालांसह गोव्याने ११ गुणांसह मेवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक सुरवात केली. मात्र नंतर संघाची कामगिरी कमालीची घसरली आणि ओळीने चार पराभव पत्करावे लागले. संघ पराभूत होत असताना गोव्याच्या ड्रेसिंग रुममधील वातावरणही आनंददायी नसल्याची माहिती आहे.
प्रशिक्षकास मुदतवाढ नाहीच!
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय अष्टपैलू दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने २०२४-२५ मोसमातील प्लेट विभागात सहाही सामने जिंकून रणजी एलिट श्रेणीसाठी पुन्हा पात्रता मिळविली होती. मात्र मोंगिया यांचा कालावधी वाढू शकला नाही आणि २०२५-२६ साठी प्रशिक्षकपदी मिलाप मेवाडा यांची वर्णी लागली.
त्यापूर्वी, मुंबईचे विनोद राघवन यांच्या मार्गदर्शनाखाली सातपैकी पाच सामने गमावल्यामुळे गोव्याची २०२३-२४ मोसमात रणजी स्पर्धेच्या एलिटमधून प्लेट विभागात पदावनती झाली होती. २०२२-२३ मध्ये कर्नाटकचे मन्सूर अली खान यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने रणजी स्पर्धेत समाधानकारक कामगिरी बजावली होती, पण त्यांना मुदतवाढ मिळाली नाही. कोविडमुळे संक्षिप्त स्वरुपात झालेल्या २०२१-२२ मधील रणजी स्पर्धेत दिल्लीच्या के. भास्कर पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याचा संघ तीन सामने खेळला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.