
पणजी: गतमोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत प्लेट विभागातील कमजोर संघांविरुद्ध गोव्याची वेगवान गोलंदाजी निस्तेज भासली, यंदा बलाढ्य संघांच्या एलिट गटात खेळणार असल्याने मारा धारदार हवा असल्याची जाणीव गोवा क्रिकेट असोसिएशनला (जीसीए) झाली. त्यावर उपाययोजना करताना कर्नाटकचा वेगवान वासुकी कौशिक याला पसंती देण्यात आली आहे.
गतमोसमातील प्लेट गटातील सहा सामन्यांत गोव्याने सात वेगवान-मध्यमगती गोलंदाजांचा वापर केला, मात्र त्यांना तुलनेत कमजोर प्रतिस्पर्ध्यांवर पूर्ण वर्चस्व राखता आले नाही. वेगवान गोलंदाजांत डावखुऱ्या अर्जुन तेंडुलकरने चार सामन्यांत १६ गडी बाद केले, परंतु वेळोवेळी दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या भेदकतेवर मर्यादा आल्या.
हेरंब परब व शुभम तारी यांनी प्रत्येकी ११ गडी बाद केले असले, तरी सातत्यात हे दोघेही गोलंदाज प्रभावी ठरले नाहीत. दीपराज गावकर याला फलंदाज या नात्याने जास्त पसंती मिळाली, तर अनुभवी लक्षय गर्ग व फेलिक्स आलेमाव, तसेच रेल्वेऐवजी गोव्याला पसंती दिलेल्या ऋत्विक नाईक यांना फक्त प्रत्येकी एका सामन्यापुरतीच संधी मिळाली.
फिरकी गोलंदाजीत दर्शन मिसाळ व मोहित रेडकर भार वाहत आहेत. केवळ फिरकी गोलंदाजांच्या बळावर एलिट गटातील मातब्बर फलंदाजांविरुद्ध गोव्यासाठी यावेळची मोहीम कठीण ठरेल.
ही बाब ‘जीसीए’ला पटल्यामुळेच कर्नाटकचा ३२ वर्षीय वेगवान गोलंदाज वासुकी कौशिक याला पसंती देण्यात आलेली आहे. कौशिक याला कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेकडून अजून ना हरकत दाखला (एनओसी) मिळालेला नाही. आवश्यक सोपस्कार पूर्ण होताच तो आगामी मोसमात गोव्याची कॅप परिधान करू शकेल.
‘जीसीए’तील वरिष्ठ सूत्रानुसार, कौशिक गोव्याकडून खेळणे जवळपास निश्चित आहे, मात्र तांत्रिक बाबींची पूर्तता होईपर्यंत थांबावे लागेल. कौशिकने संभाव्य करारासंदर्भात जीसीए पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. वयाची तिशी पार केल्याने कर्नाटक रणजी संघात संधी कमी असल्याचे त्याला वाटत असून तो गोव्याकडून खेळण्यास तयार आहे.
कर्नाटकचे प्रमुख वेगवान गोलंदाज विविध कारणास्तव अनुपलब्ध ठरल्यानंतर कौशिक याने २०२४-२५ मध्ये वेगवान गोलंदाजीची जबाबदार यशस्वीपणे पेलली. संघातर्फे सात रणजी क्रिकेट सामन्यांत त्याने १८.७३च्या सरासरीने सर्वाधिक २३ गडी बाद केले. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कौशिक याने २२३ गडी बाद केले आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये पदार्पण केल्यानंतर कर्नाटक व दक्षिण विभागतर्फे २३ प्रथम श्रेणी सामन्यांत ९३, लिस्ट ए (एकदिवसीय) स्पर्धेतील ४४ सामन्यांत ८२, तर ३८ टी-२० सामन्यांत ४८ विकेट प्राप्त केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.