Ranji Trophy 2025: RCBच्या रजत पाटीदारचा संघ अडचणीत! गोव्याला विजयाची संधी; पाहुण्या 'कौशिक'च्या 5 विकेट्स

Goa Vs Madhya Pradesh: चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखालील संघासमोर दुसऱ्या डावात ३२८ धावांचे लक्ष्य असून तिसऱ्या दिवसअखेर सोमवारी त्यांनी १ बाद २१ धावा केल्या.
Goa Cricket
Goa CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रणजी करंडक क्रिकेट सामन्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी गोव्याला विजय नोंदविण्याची सुवर्णसंधी आहे, पण त्यासाठी त्यांना दिवसभरात मध्य प्रदेशचे बाकी नऊ गडी बाद करावे लागतील. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखालील संघासमोर दुसऱ्या डावात ३२८ धावांचे लक्ष्य असून तिसऱ्या दिवसअखेर सोमवारी त्यांनी १ बाद २१ धावा केल्या. पाहुण्या संघाला आणखी ३०७ धावांची आवश्यकता आहे.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर एलिट ब गट चार दिवसीय सामना सुरू आहे. गोव्याचा ‘पाहुणा’ मध्यमगती गोलंदाज वासुकी कौशिक याने ३४ धावांत ५ गडी बाद करत मध्य प्रदेशचा पहिला डाव १८७ धावांत गारद करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर कौशिक यानेच मध्य प्रदेशला दुसऱ्या डावात पहिला धक्का दिला.

गोव्यातर्फे ‘पाहुणा’ क्रिकेटपटू या नात्याने यंदा तिसरा रणजी सामना खेळणारा ३३ वर्षीय कौशिक याने २८व्या प्रथम श्रेणी सामन्यांत पाचव्यांदा डावात पाच गडी बाद करण्याची किमया साधली. कौशिक गतमोसमापर्यंत कर्नाटकतर्फे खेळत होता. एकंदरीत सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एकूण १४ गडी बाद झाले. कालच्या ७ बाद १८१ वरून मध्य प्रदेशचा पहिला डाव लगेच आटोपला.

त्यामुळे गोव्याला ९७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली, नंतर गोलंदाजांना साह्य केलेल्या खेळपट्टीवर गोव्याचा दुसरा डाव २३० धावांत संपुष्टात आला. मध्य प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेय सिंग याने ८१ धावांत ५ गडी टिपले. गोव्याकडून अभिनव तेजराणा याने अर्धशतक (६९) केले.

‘कॉन्कशन’ राजशेखरने केले संधीचे सोने

गोव्याच्या संघातील यष्टिरक्षक समर दुभाषी याच्या डोक्याला रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळी फलंदाजी करताना मध्य प्रदेशच्या कुलदीप सेन याला बाऊन्सर लागला होता. त्यानंतर बदली खेळाडू या नात्याने राजशेखर हरिकांत याने यष्टिरक्षण केले होते. सोमवारी सकाळी ३५ वर्षीय राजशेखर ‘कॉन्कशन’ खेळाडू या नात्याने समरच्या जागी संघात आला.

तब्बल सात वर्षांनंतर त्याला रणजी पुनरागमनाची संधी लाभली. यापूर्वी तो १४ ते १७ डिसेंबर २०१८ या कालावधीत त्रिपुराविरुद्ध आगरतळा येथे एकमेव रणजी सामना खेळला होता, तेव्हा त्याने अनुक्रमे ४ व १० धावा केल्या होत्या. राजशेखरने संधीचे सोने करताना सोमवारी दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येत ४३ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह महत्त्वपूर्ण ४० धावा केल्या. त्याने अखेरचा गडी वासुकी कौशिक याच्यासमवेत ३७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, त्यामुळे गोव्याला मध्य प्रदेशसमोर ३२८ धावांचे आव्हान ठेवता आले.

Goa Cricket
Ranji Trophy 2025: अर्जुन तेंडुलकर, कौशिकचा भेदक मारा! पाहुणा संघ बॅकफूटवर; ललित यादवने टिपले 2 बळी

अभिनवचा फलंदाजीतील फॉर्म कायम

गोव्याच्या दुसऱ्या डावात डावखुरा फलंदाज अभिनव तेजराणा याने अर्धशतक करताना १०१ चेंडूंत आठ चौकार व एका षटकारासह ६९ धावा केल्या. त्याचे हे दुसरे रणजी अर्धशतक ठरले. यंदा मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या अभिनवने एक द्विशतक व शतकही केले आहे. त्याने आतापर्यंत चार सामन्यांतील सहा डावात ९९.८०च्या सरासरीने ४९९ धावा केल्या आहेत. २४ वर्षीय डावखुऱ्या अभिनवने ललित यादव (४२) याच्यासह चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली.

त्यापूर्वी, अभिनवने कर्णधार स्नेहल कवठणकर (२३) याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली होती. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शद खान याने अभिनवला पायचीत बाद केल्यानंतर गोव्याची चहापानापर्यंत अनपेक्षित घसरगुंडी उडाली. गोव्याने ९ धावांत ४ गडी गमावले. गोव्याचा डाव ३ बाद १४६ वरुन ७ बाद १५५ असा कोसळला. कार्तिकेय याने पाच चेंडूंच्या फरकाने दीपराज गावकर व अर्जुन तेंडुलकर यांना बाद केले. २७ वर्षीय कार्तिकेय याने ४३व्या प्रथम श्रेणी सामन्यात दहाव्यांदा डावात पाच गडी बाद केले.

Goa Cricket
Ranji Trophy 2025: गोव्याचा डाव गडगडला! 'अर्जुन तेंडुलकर' अपयशी; MPच्या सारांशचा प्रभावी मारा

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः २८४

मध्य प्रदेश, पहिला डाव (७ बाद १८१ वरुन) ः ७६ षटकांत सर्वबाद १८७ (आर्यन पांडे २५, अर्शद खान नाबाद १७, अर्जुन तेंडुलकर १२-२-३४-२, वासुकी कौशिक १९-६-३४-५, ललित यादव १९-४-२७-२).

गोवा, दुसरा डाव ः ६५.४ षटकांत सर्वबाद २३० (मंथन खुटकर १६, सुयश प्रभुदेसाई ३, अभिनव तेजराणा ६९, स्नेहल कवठणकर २३, ललित यादव ४२, दर्शन मिसाळ ६, दीपराज गावकर १, अर्जुन तेंडुलकर ०, मोहित रेडकर ९, राजशेखर हरिकांत ४०, वासुकी कौशिक नाबाद ५, कुमार कार्तिकेय सिंग ५-८१, सारांश जैन २-६४, अर्शद खान ३-२१).

मध्य प्रदेश, दुसरा डाव ः १० षटकांत १ बाद २१ (हर्ष गवळी नाबाद १४, अर्जुन तेंडुलकर २-०-१३-०, वासुकी कौशिक ५-३-३-१, ललित यादव ३-१-४-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com