

पणजी: नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गोव्याच्या फलंदाजांनी चांगली सुरवात केली, पण ते मोठी धावसंख्या रचणार नाहीत याची खबरदारी मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी घेतली. विशेषतः ऑफब्रेक गोलंदाज सारांश जैन याने प्रभावी मारा केला, परिणामी शनिवारी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर यजमान संघाचा डाव ६ बाद २५६ असा गडगडला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ‘ब’ गटातील चार दिवसीय सामन्यास पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर आरंभ झाला.
सुयश प्रभुदेसाई याने अर्धशतक नोंदविताना ११९ चेंडूंत सात चौकारांसह ६५ धावा केल्या. त्याने कर्णधार स्नेहल कवठणकर (४१) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला सावरता आले, पण दोघेही आठ धावांच्या फरकाने बाद झाल्यामुळे गोव्याचा डाव उपाहारानंतर ४ बाद १४० असा कोसळला. स्नेहलला सारांश जैन याने पायचीत बाद केले, तर सुयशला डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेय सिंग याने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.
त्यापूर्वी, सकाळच्या सत्रात वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याने मंथन खुटकर (१२) याला, तर अगोदरच्या चार डावांत ४२७ धावा केलेल्या अभिनव तेजराणा (३) याला सारांशने बाद केल्यामुळे गोव्याची स्थिती २ बाद ४५ अशी होती. लगेच स्नेहल वैयक्तिक दोन धावांवर नशीबवान ठरला. कुलदीप सेन याच्या गोलंदाजीवर तिसऱ्या स्लिपमध्ये स्नेहलने झेल दिला होता, पण पंचांनी नोबॉल तपासणीसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतली, त्यात कुलदीप ‘ओव्हरस्टेप’ झाल्याचे सिद्ध झाले आणि स्नेहल नाबाद ठरला.
गोव्याला नंतर ललित यादव (४१) व दर्शन मिसाळ (४४) यांनी पाचव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करून दिलासा दिला. मध्य प्रदेशचा कर्णधार शुभम शर्मा याला चौकार खेचल्यानंतर दर्शनला अनावश्यक उंच फटका खेळणे महागात पडले. हरप्रीतसिंग भाटिया याने कव्हर्स क्षेत्रात धावात जात अप्रतिम झेल पकडला आणि गोव्याच्या माजी कर्णधाराची खेळी संपुष्टात आली.
सारांशच्या गोलंदाजीवर ललित यादव संशायास्पद निर्णयामुळे पायचीत झाल्यामुळे गोव्याला मोठा धक्का बसला. ड्रेसिंग रुममध्ये परतताना ललितने जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अर्जुन तेंडुलकर (१) व मोहित रेडकर (१) जास्त काळ टिकले नाहीत. अर्जुनने अनावश्यकपणे उंचावरून फटका मारल्याने तो सारांशचा चौथा बळी ठरला. मोहितला दुसऱ्या नव्या चेंडूवर आर्यन पांडे याच्या वेगाचा अजिबात अंदाज आला नाही व त्याने स्लिपमध्ये हरप्रीतच्या हाती झेल दिला. दिवसअखेर दीपराज गावकर ३० धावांवर खेळत होता.
मध्य प्रदेशचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रजत पाटीदार व व्यंकटेश अय्यर जायबंदी झाल्याने त्यांनी शनिवारी गोव्याविरुद्धच्या सामन्यापूर्वी माघार घेतली. रजतच्या अनुपस्थितीत आता सलग दुसऱ्या लढतीत शुभम शर्मा मध्य प्रदेशचे नेतृत्व करत आहे. रजत व व्यंकटेश यांनी शुक्रवारी संघासमवेत सराव केला होता, मात्र ते खेळण्यास असमर्थ ठरल्याने त्यांची नावे शनिवारी संघातून गाळण्यात आली.
गोवा, पहिला डाव ः ८४.५ षटकांत ८ बाद २५६ (सुयश प्रभुदेसाई ६५, मंथन खुटकर १२, अभिनव तेजराणा ३, स्नेहल कवठणकर ४१, ललित यादव ४१, दर्शन मिसाळ ४४, दीपराज गावकर नाबाद ३०, अर्जुन तेंडुलकर १, मोहित रेडकर १, आर्यन पांडे १-१८, कुमार कार्तिकेय सिंग १-७८, कुलदीप सेन १-३२, सारांश जैन ४-७२, शुभम शर्मा १-२९).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.