Ranji Trophy 2025: अर्जुन तेंडुलकर, कौशिकचा भेदक मारा! पाहुणा संघ बॅकफूटवर; ललित यादवने टिपले 2 बळी

Goa Vs Madhya Pradesh: पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर एलिट ब विभागीय सामन्यात रविवारी दुसऱ्या दिवशी गोव्याचे वर्चस्व राहिले. पहिल्या डावात यजमानांनी २८४ धावांपर्यंत मजल मारली.
Arjun Tendulkar Ranji Trophy, Goa vs Madhya Pradesh Ranji Match
Arjun Tendulkar Ranji Trophy, Goa vs Madhya Pradesh Ranji Match, Lalit Yadav Bowling PerformanceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : वासुकी कौशिक व डावखुरा अर्जुन तेंडुलकर या वेगवान गोलंदाजांनी मध्य प्रदेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडल्यानंतर ऑफस्पिनर ललित यादव याने जम बसवू पाहणाऱ्या दोघांना टिपले, परिणामी रणजी करंडक क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर यजमान गोव्याचे पारडे जड झाले असून त्यांना आघाडीची संधी आहे.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर एलिट ब विभागीय सामन्यात रविवारी दुसऱ्या दिवशी गोव्याचे वर्चस्व राहिले. पहिल्या डावात यजमानांनी २८४ धावांपर्यंत मजल मारली. दिवसअखेर मध्य प्रदेशची ७ बाद १८१ अशी स्थिती होती.

ते अजून १०३ धावांनी मागे आहेत. मध्य प्रदेशची ७ बाद १६६ अशी धावसंख्या असताना मोहित रेडकरच्या गोलंदाजीवर दीपराज गावकरने महंमद अर्शाद खान याचा सोपा झेल सोडला नसता, तर पाहुणा संघ आणखीनच कोसळला असता.

गोव्यातर्फे कौशिक याने तीन, तर अर्जुन व ललित यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले आहेत. मध्य प्रदेशला अनुभवी रजत पाटीदार व व्यंकटेश अय्यर यांची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवली.

गोव्याने अगोदरच्या दिवशीच्या ८ बाद २५६ धावसंख्येत रविवारी दीपराज गावकर (५१) याच्या अर्धशतकामुळे आणखी २८ धावांची भर टाकली. स्नेहल कवठणकरच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात गोव्याचे नेतृत्व केलेल्या दीपराज याने १७ व्या रणजी सामन्यात चौथे अर्धशतक नोंदविले.

बाऊन्सर थेट समरच्या डोक्यावर

गोव्याच्या डावात सकाळी ९३व्या षटकात मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याच्या बाऊन्सरने थेट समर दुभाषीच्या डोक्याचा वेध घेतला. यावेळी समर चार धावांवर खेळत होता. नंतर त्याने तशीच नेटाने फलंदाजी केली. गंभीर इजा झाली नाही, तरीही सुरक्षिततेच्या कारणास्तव डाव संपल्यानंतर समरला इस्पितळात स्कॅनिंगसाठी नेण्यात आले.

त्यामुळे राखीव यष्टीरक्षक राजशेखर हरिकांत याने मध्य प्रदेशच्या पहिल्या डावात यष्टिरक्षण केले. नंतर समर पुन्हा संघात परतला. ‘‘समरला धोका नाही. तो स्थिर आहे. कदाचित उद्या सकाळी यष्टिरक्षण करेल. आरोग्य सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्ही त्याच्याऐवजी राखीव यष्टिरक्षकाचा वापर केला,’’ अशी माहिती दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर गोव्याचे प्रशिक्षक मिलाप मेवाडा यांनी दिली..

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (८ बाद २५६ वरुन) : ९५.५ षटकांत सर्वबाद २८४ (दीपराज गावकर ५१, समर दुभाषी ६, वासुकी कौशिक नाबाद ०, कुमार कार्तिकेय सिंग ३-८८, सारांश जैन ४-७८).

मध्य प्रदेश, पहिला डाव : ७३ षटकांत ७ बाद १८१ (ऋषभ चौहान ४३, सारांश जैन ४८, आर्यन पांडे नाबाद २१, महंमद अर्शाद खान नाबाद १५, अर्जुन तेंडुलकर १२-२-३४-२, वासुकी कौशिक १८-६-३३-३, दीपराज गावकर ५-१-१२-०, दर्शन मिसाळ १४-२-३७-०, मोहित रेडकर ७-१-२८-०, ललित यादव १७-३-२२-२)

Arjun Tendulkar Ranji Trophy, Goa vs Madhya Pradesh Ranji Match
Ranji Trophy 2025: गोव्याचा डाव गडगडला! 'अर्जुन तेंडुलकर' अपयशी; MPच्या सारांशचा प्रभावी मारा

गोव्याची गोलंदाजी धारदार

कौशिक व अर्जुन यांनी खूपच भेदक मारा करत मध्य प्रदेशची फलंदाजी कापून काढली. त्यामुळे १६व्या षटकातच त्यांची ४ बाद ३८ धावा अशी दाणादाण उडाली. यश दुबे (४) व हिमांशू मंत्री (६) यांना अर्जुनने माघारी धाडले, तर हर्ष गवळी (९) व हरप्रीतसिंग भाटिया (२) यांचा बचाव कौशिकने भेदला. उपाहारानंतर कौशिकने प्रतिस्पर्धी कर्णधार शुभम शर्मा (१६) याला बाद केल्यामुळे मध्य प्रदेशच्या ड्रेसिंग रुममध्ये सन्नाटा पसरला.

Arjun Tendulkar Ranji Trophy, Goa vs Madhya Pradesh Ranji Match
Ranji Trophy 2025: गोव्याशी भिडणार RCBचा कॅप्टन! रणजी करंडकमध्ये रंगणार थरार; 15 वर्षांनंतर चुरशीची लढत

ललितची परिणामकारक फिरकी

ऋषभ चौहान (४३) व सारांश जैन (४८) यांच्या चिवट फलंदाजीमुळे मध्य प्रदेशला सावरता आले. चहापानापूर्वी ललितने ऋषभचा त्रिफळा उडविल्यामुळे जमलेली जोडी फुटली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ५४ धावा जोडल्या.

मागील लढतीत सौराष्ट्रविरुद्ध नाबाद शतक (१०३) केलेल्या सारांशने जबरदस्त झुंज देताना सातव्या विकेटसाठी आर्यन पांडे (नाबाद २१) याच्यासमवेत १४२ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी केली. ललितनेच ही जोडी फोडली. कर्णधार स्नेहल कवठणकरने सारांशचा स्लिपमध्ये अप्रतिम झेल पकडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com