

पणजी: ओमानमधील १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला तेव्हा गोव्याचा हरहुन्नरी क्रिकेटपटू चिगुरुपती व्यंकट याला संधी मिळाली नव्हती. पण शाविन विनोद हा खेळाडू जायबंदी ठरला आणि ऐनवेळी त्याची वर्णी लागली. शनिवारी पाकिस्तानविरुद्ध अंतिम लढतीपूर्वी हुकमी वेगवान गोलंदाज ईशान सूद खेळण्यास असमर्थ ठरल्याने या १८ वर्षीय खेळाडूस अकरा सदस्यीय संघात स्थान मिळाले.
या जिगरबाज युवा क्रिकेटपटूने अखेरीस अकराव्या क्रमांकावर फलंदाजीस येत भारताच्या सनसनाटी विजेतेपदात किमयागार ठरण्यापर्यंत संस्मरणीय मजल मारली. अल अमरात येथे अंतिम लढतीत ३३८ धावांच्या आव्हानसमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना व्यंकटने जिगरबाज कामगिरी करताना सामन्याचा मानकरी ठरलेल्या मोहित उल्वा (नाबाद ४९) याच्यासमवेत समर्थपणे किल्ला लढविला. तो फलंदाजीस आला तेव्हा भारताला विजयासाठी २९ धावांची गरज होती व अखेरचे सोळा चेंडू शिल्लक होते.
व्यंकटने संधीचे सोने करताना शांत चित्ताने मोहित याला मोलाचा साथ दिली. त्याने पाकिस्तानच्या खेळाडूंचा, तसेच मोठ्या संख्येने उपस्थित पाक समर्थकांचा दबाव झेलत मौल्यवान नाबाद ११ धावा केल्या. आठ चेंडूंतील खेळीत त्याने दोन चौकारही लगावले. मोहित-व्यंकट जोडीने पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणला. व्यंकटने गोलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान देताना पाच षटकांत ४० धावांत ३ गडी बाद केले होते. त्यामुळे अखेरच्या दहा षटकांत पाकिस्तानच्या धावगतीला लगाम लागला.
व्यंकटने यावर्षी भारताच्या १९ वर्षांखालील संघात पदार्पण करताना जुलैमध्ये युवा कसोटीत श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथील कसोटीत दोन्ही डावात मिळून पाच गडी बाद केले होते. नंतर तो ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन १९ वर्षांखालील एकदिवसीय सामने खेळला होता. गतवर्षी गोव्याने १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रगती साधली होती, त्या यशात त्याने महत्त्वपूर्ण वाटा उचलला.
ओमान, गोवा आणि भारतीय संघ
कोविड काळात व्यंकटचे वडील ओमानस्थित पूर्णचंद्र राव यांना कुटुंबीयांसह गोव्यात स्थलांतर करावे लागले. अवघ्या चार वर्षांतच या मेहनती मुलाने भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात स्थान मिळविण्यापर्यंत मजल मारली. व्यंकटचे वडील बार्देशमधील पिळर्ण येथील बहुराष्ट्रीय कंपनीत असून मडगाव येथे राहतात.
व्यंकटने क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरीचेच ध्येय बाळगावे हीच अपेक्षा आई-वडिलांनी मुलाकडून बाळगली. व्यंकटचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण सासष्टीतील सां जुझे द आरियल येथील द किंग्स स्कूलमध्ये झाले, तर उच्च माध्यमिक विद्यालयीन शिक्षण मडगावच्या आरएमएस उच्च माध्यमिकमध्ये घेतले. व्यंकटचे प्रारंभिक क्रिकेट ओमानमधील अकादमीत सुरू झाले आणि गोवा क्रिकेट असोसिएशनच्या ध्वजाखाली त्याचे क्रिकेट २०२२-२३ पासून बहरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.