

पणजी: राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत विविध इव्हेंट आणि महोत्सवांच्या आयोजनावर तब्बल ६७५ कोटी रुपये खर्च केले असून, जनतेच्या पैशांची ही मोठ्या प्रमाणात उधळपट्टी असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस (संघटन) दुर्गादास कामत यांनी केला. इव्हेंटच्या आयोजनासाठी जणू स्वतंत्र खातेच सुरू केले असावे, अशा पद्धतीने सरकारकडून खर्च केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. आज पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विशेष म्हणजे, सरकारकडून एकाच वर्षात एकाच महोत्सवाचे दोनदा आयोजन करण्याचा प्रकार सुरू असल्याचे कामत यांनी निदर्शनास आणून दिले. ९ ते ११ जानेवारीदरम्यान ग्रामीण अन्न महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवावर त्यावेळी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा याच महोत्सवाच्या आयोजनासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. यावेळी त्यावर तब्बल दोन कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा सरस महोत्सवाचे आयोजन मार्चमध्ये केले होते. आता त्याच वर्षात पुन्हा सहा कोटी रुपये खर्चून या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. मत्स्य महोत्सवाच्या बाबतीतही असाच प्रकार घडत असून, जानेवारीनंतर पुन्हा एकदा त्यासाठी सरकार सहा कोटी रुपये खर्च करणार आहे, असे कामत यांनी सांगितले.
कृषी खात्याला निधी कमी
राज्य सरकारने अर्थसंकल्पात कृषी खात्यासाठी अवघ्या २० कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही अर्थसंकल्पीय तरतूद पूर्णपणे खर्च झाल्यानंतर कृषी खाते नवे मंत्री संकल्प आमोणकर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी निधीची गरज असताना महोत्सवांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याला सरकारचे प्राधान्य का? असा सवाल कामत यांनी उपस्थित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.