

पणजी: पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानाची खेळपट्टी घातक नव्हती, मात्र तेथे ऑफस्पिनर महेश पिठिया व डावखुरा भार्गव भट यांनी गोव्याच्या फलंदाजांना दोन्ही डावांत साफ शरणागती पत्करण्यास भाग पाडले. यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गट सामन्यात बडोदा संघाने बुधवारी चौथ्या दिवशी डाव व १३५ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला.
ज्या खेळपट्टीवर बडोद्याने पहिला डाव दोन दिवस खेळत ८ बाद ४७२ धावांवर घोषित केला होता, त्याच खेळपट्टीवर गोव्याला पावणेदोन दिवसांत अनुक्रमे १९९ व १३८ धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात भार्गवने ३२ धावांत ५, तर महेशने ६६ धावांत ४ गडी टिपले. या दोघांनी दोन्ही डावांत मिळून प्रत्येकी ९ गडी बाद करण्याचा पराक्रम साधला. महेशने पहिल्या डावात ५८ धावांत ५, तर भार्गवने ५१ धावांत ४ गडी बाद केले होते. २५व्या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधील बळींचे शतक गाठलेला पिठिया सामन्याचा मानकरी ठरला.
गोव्याच्या फलंदाजांना बडोद्याच्या फिरकी दुकलीच्या कल्पक माऱ्याचा सामनाच करता आला नाही. त्यामुळे अखेरच्या दिवशी चहापानास अर्धातासाचा अवधी असताना गोव्याला कमजोर आव्हान आटोपते घ्यावे लागले. दुसऱ्या डावात कालचे नाबाद फलंदाज शिवेंद्र भुजबळ (४६) व कर्णधार अभिनव तेजराणा (४७) दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करून अपेक्षा उंचावल्या, मात्र उपाहारानंतर गोव्याचा डाव गडगडला. गोव्याने ४६ धावांत नऊ विकेट्स गमावल्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सतरावे वर्ष खेळणाऱ्या ३६ वर्षीय भार्गव याने ९९व्या सामन्यात २०व्यांदा डावात पाच गडी बाद करण्याची किमया साधली. बडोद्याला बोनससह एकूण सात गुण मिळाले, तर गोव्याला एकही गुण मिळाला नाही. गोव्याचा पुढील सामना १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत कानपूर येथे उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला जाईल. बडोद्याचा पुढील सामना घरच्या मैदानावर बिहारविरुद्ध होईल. एलिट अ गटात आता उत्तर प्रदेश व बडोद्याचे प्रत्येकी सात, विदर्भाचे सहा, मध्य प्रदेशचे तीन, तर जम्मू-काश्मीरचा एक गुण आहे. गोवा, पुदुचेरी व बिहार शून्यावर आहेत.
ओळीने पाचवा सामना गमावला
गोव्याचा हा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सलग पाचवा पराभव ठरला. गतमोसमात (२०२५-२६) अनुक्रमे पर्वरी येथे मध्य प्रदेशकडून तीन विकेट्सने, राजकोट येथे सौराष्ट्राकडून डाव व ४७ धावांनी, पुणे येथे महाराष्ट्राकडून आठ विकेट्सनी, पर्वरी येथे केरळकडून ९ विकेट्सनी, तर आता २०२६-२७ मोसमाच्या सुरवातीस पणजी जिमखान्यावर बडोद्याकडून डाव व १३५ धावांनी पराभव पत्करावा लागला. एकंदरीत पणजी जिमखान्यावर खेळलेल्या २६ रणजी करंडक सामन्यांत गोव्याला दहावा पराभव पत्करावा लागला.
संक्षिप्त धावफलक
बडोदा, पहिला डाव : ८ बाद ४७२ घोषित. गोवा, पहिला डाव : १९९ व दुसरा डाव (१ बाद ३५ वरून) : ६८ षटकांत सर्वबाद १३८ (शिवेंद्र भुजबळ ४६, अभिनव तेजराणा ४७, स्नेहल कवठणकर ०, ललित यादव १२, दर्शन मिसाळ नाबाद १७, दीपराज गावकर ०, मोहित रेडकर ०, ऋत्विक नाईक ०, वासुकी कौशिक ४, शुभम तारी ०, महेश पिठिया २८.२-५-६६-४, भार्गव भट २४-८-३२-५, राज लिंबानी ३-०-८-१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.