Rahul Gandhi: राहुल गांधी गोव्यात पुन्हा येणार; भाऊसाहेब बांदोडकरांच्या समाधीला भेट देणार का?

Will Rahul Gandhi visit Bhausaheb Bandodkar Samadhi: भारतीय संघराज्यातील गोव्याचे वेगळेपण अबाधित ठेवण्याचे श्रेय नेहरू, इंदिरांबरोबरच प्रामुख्याने बांदोडकर आणि सिक्वेरांनाही जाते, हे विसरून चालणार नाही.
Will Rahul Gandhi visit Bhausaheb Bandodkar Samadhi
Rahul GandhiDainik gomantak
Published on: 
Updated on: 

डॉ. नाऊ वरक

भारतीय संघराज्यातील गोव्याचे वेगळेपण अबाधित ठेवण्याचे श्रेय नेहरू, इंदिरांबरोबरच प्रामुख्याने बांदोडकर आणि सिक्वेरांनाही जाते, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात राहुल गांधी भाऊसाहेब बांदोडकरांच्या मिरामार येथील समाधीला भेट देतील का? स्थानिक काँग्रेसचे नेते भाऊसाहेबांचे नाव आपल्या सभांमध्ये गर्वाने घेतील का?

गोंय राखण यात्रे’ची सांगता राहुल गांधींच्या उपस्थितीत १८ ऑक्टोबर रोजी मडगाव येथे झाली. राहुल यांच्या भाषणानंतर बरेच तर्क-वितर्क प्रसारमाध्यमांवर उमटले. ‘मै गोवा बहुत खुशी से आता हूँ। जहाँ भी मुझे बुलाना है, जितनी बार आप मुझे बुलाना चाहते हो, आप बुलाइए। मै खुशी से आ जाऊंगा!’ या शब्दांनी राहुल यांनी आपल्या भाषणाला विराम दिला. राखण यात्रा ही त्यांच्या आगमनाची सुरुवात आहे, शेवट नाही. देशभरात राहुल यांच्या १८ तारखेच्या भाषणाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. ते तब्बल १८ मिनिटे बोलले. त्यांचे संपूर्ण भाषण हे मिश्र वाक्यांनी भरलेले होते. मिश्र वाक्यात एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्ये असतात. एकापेक्षा अधिक गौण वाक्यांनी भरलेले भाषण मुख्य मुद्यांपासून भरकटते.

Will Rahul Gandhi visit Bhausaheb Bandodkar Samadhi
Goa Development Architects: गोव्याचा विकास पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध हवा! CM सावंत यांनी अधोरेखित केले वास्तुविशारदांचे महत्त्व

राजकीय नेत्यांनी गौण वाक्ये सुद्धा मुख्य विधानाच्या सुरात बोलली पाहिजेत. दिल्लीतील ‘व्होट चोरी’ आंदोलनातील मुख्य विधानांचीच गोव्यातील सभेत पुनरावृत्ती झाली. बऱ्याचदा पक्षाचे राष्ट्रीय नेते स्थानिक नेत्यांची भाषणे अभ्यासत असतात. त्यावरून आपल्या भाषणाची व कार्यक्रमाची सुसंगत रूपरेषा आखतात. राहुल यांना कदाचित गोव्याविषयी अजूनही योग्य अंदाज आला नसावा म्हणून ते पुन्हा येतील याची ग्वाही देऊन गेले. गांधींच्या भाषणाअगोदर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘ओपिनियन पोल’ हे जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींनी गोव्याला दिलेली भेटवस्तू आहे, असे म्हटले. तर राजीव गांधींनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिल्याचे सांगितले.

भाऊसाहेब बांदोडकर आणि जॅक सिक्वेरा या दोन महापुरुषांचे संदर्भ या भाषणांमध्ये नव्हते. राजकारण हे द्वंद्व नसून मानवाच्या प्रगतीची वाहती धारा आहे. बऱ्याचदा काँग्रेसचा बुद्धिजीवी वर्ग भाऊसाहेब बांदोडकरांना हिंदुत्व आणि मराठीवादाच्या कक्षेत सीमित करतो. मात्र कित्येकदा गोवा काँग्रेसचे नेते व प्रवक्ते अटल बिहारी वाजपेयी आणि मनोहर पर्रीकर यांचेही आपुलकीने संदर्भ देतात. गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व हे काँग्रेस पक्षामुळे आहे, असा दावा करण्यात येतो, त्यावेळी नकळत भाऊसाहेबांचा राजकीय वारसा लपविण्याचा चतुर प्रयत्न दिसतो. ३ डिसेंबर १९६६ रोजी भाऊसाहेब बांदोडकरांनी विधानसभेत बहुमत असतानाही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. निष्पक्ष पद्धतीने ओपिनियन पोल व्हावा यासाठी राजकीय सत्ता बाजूला सारून लोकशाहीला प्राधान्य दिले.

त्यामुळे भारतीय संघराज्यातील गोव्याचे वेगळेपण अबाधित ठेवण्याचे श्रेय नेहरू, इंदिरांबरोबरच प्रामुख्याने बांदोडकर आणि सिक्वेरांनाही जाते, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात राहुल गांधी भाऊसाहेब बांदोडकरांच्या मिरामार येथील समाधीला भेट देतील का? स्थानिक काँग्रेसचे नेते भाऊसाहेबांचे नाव आपल्या सभांमध्ये गर्वाने घेतील का? हे पाहावे लागेल. बांदोडकर आणि काँग्रेस यांमधील संबंध हे गोवा मुक्तीपूर्वीपासून होते. ९ डिसेंबर, १९६३ रोजी गोवा, दमण आणि दीव विधानसभेची पहिली निवडणूक झाली. दमण सोडता गोव्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. याच पार्श्वभूमीवर नेहरूंनी २६ डिसेंबर १९६३ रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

‘देशात सर्वत्र काँग्रेसची सत्ता असूनही गोव्यात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येत नाही, हेच भारतातील निवडणुकांची विश्वाससार्हता आणि पारदर्शकता दर्शविते. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही हेराफेरीला थारा नाही, याचेच हे द्योतक आहे’, हे नेहरूंचे बोल होते. नेहरूंनी बांदोडकरांना शुभेच्छा देत असताना बांदोडकरांचा महाराष्ट्रवादी गोमंतक आणि काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद नसल्याचे आवर्जून नमूद केले. तसेच बांदोडकर गोव्याच्या विलीनीकरणाचा मुद्दा तूर्तास उपस्थित करणार नसल्याने नेहरूंनी बांदोडकरांची प्रशंसाही केली. बांदोडकरांच्या निधनानंतर युनायटेड गोवन्स पक्षाप्रमाणे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातीलही मातब्बर नेते काँग्रेसमध्ये सामील झाले. प्रतापसिंग राणे आणि दयानंद नार्वेकर यांनी काँग्रेससाठी उत्तर गोव्याचा बाले किल्ला हल्लीपर्यंत लढला.

Will Rahul Gandhi visit Bhausaheb Bandodkar Samadhi
Goa Dairy AGM Adjourned: मराठीत कामकाज नाकारल्याने गोवा डेअरीची सभा गुंडाळली! बेकायदेशीर नोटिशीवरूनही गदारोळ

१९८० मध्ये बांदोडकरांच्या ज्येष्ठ कन्या शशिकला काकोडकर काँग्रेस पक्षात सामील झाल्या. मांद्रे मतदारसंघातील भाऊसाहेबांचे उत्तराधिकारी रमाकांत खलपांनीही १९९९ मध्ये काँग्रेसची कास धरली. मात्र उत्तर गोव्यात बांदोडकर आणि काँग्रेस हे समीकरण बिघडू लागले. दक्षिण गोव्यातील नेतृत्व काँग्रेस पक्षावर हावी झाले. बांदोडकरांच्या राजकीय विचारसरणीला तसेच उत्तर गोव्याला हिंदुत्वाच्या चौकटीत बसविणे काँग्रेससाठी हानिकारक ठरले. गोव्याच्या राजकारणात उशिरा दाखल झालेल्या भाजपने भाऊसाहेबांची अस्मिता आपल्या पक्षात सामावून घेतली.

राहुल गांधींकडे गोव्यातील काँग्रेसचा राजकीय दृष्टिकोन बदलण्याची संधी आहे. भाऊसाहेब बांदोडकरांनी गोवा सामान्य गोवेकरांच्या हातात सोपविला. त्यामुळे गोंय राखण यात्रा भाऊसाहेबांच्या उद्‍घोषाशिवाय अपूर्ण आहे. गोवा सरकारच्या माहितीनुसार सध्या मिरामार येथील बांदोडकरांच्या समाधीचे नूतनीकरण ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. बांदोडकरांचे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक व महाराष्ट्र काँग्रेस यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. महाराष्ट्रातील माणिकराव ठाकरे सध्या गोवा काँग्रेसचे प्रभारी आहेत. ठाकरे राहुल गांधींना नेहरू, इंदिरा आणि बांदोडकरांच्या राजकीय मैत्रीची आठवण करून देतील का? तसेच राहुल गांधी पुन्हा येतील तेव्हा बांदोडकरांच्या समाधीसमोर नतमस्तक होतील का? यावर काँग्रेसची पुढची वाटचाल निर्भर असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi 2029 election plan
Rahul Gandhi Goa Visit Analysis
Rahul Gandhi Goa Speech
Rahul Gandhi silence on Mhadei River dispute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com