

रुक्मा सडेकर
मुलांसाठी नियम आणि मर्यादा ठरवताना पालकांना कधी कधी अपराधी वाटते. आपला कठोरपणा मुलांशी असलेले नाते बिघडवेल, अशी भीती वाटते. पण वास्तव अगदी उलट आहे. मर्यादा नातेसंबंध बिघडवत नाहीत; त्या भविष्यातील मोठ्या समस्या टाळतात आणि मुलांना अधिक सक्षम बनवतात. म्हणून मुलांसाठी नियम स्पष्टपणे ठरवा.
एकदा व्हॉट्सॲपवरील एका पालकांच्या ग्रुपमध्ये एका पालकाने सहजपणे म्हटले, ‘माझे मूल सध्या कुठे आहे, हेही मला अनेकदा माहीत नसते.’ ते एक वाक्य माझ्या मनात घर करून राहिले. कारण आजच्या काळात ही केवळ एका पालकाची व्यथा राहिलेली नाही; ती एका संपूर्ण पिढीच्या पालकत्वाचे वास्तव बनत चालली आहे.
जवळपास दररोज तरुण मुलांच्या दुर्दैवी मृत्यूच्या बातम्या आपल्या कानावर येतात. कधी नैराश्य त्यांना गिळून टाकते, तर कधी स्वतःच्या बेफिकिरीतून घडलेल्या अपघातात त्यांचा जीव जातो. नुकतीच आयफोनच्या एका क्षुल्लक वादातून एका कुटुंबातील तिघांचे जीवन उद्ध्वस्त झाले. मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांचाही त्याच्यासोबत मृत्यू झाला आणि डोळ्यांसमोर घडलेले हे भयंकर दृश्य सहन न झाल्याने आईनेही आपले जीवन संपवले.
दुसऱ्या एका घटनेत पहाटेच्या वेळी १८ वर्षांच्या मुलाचे एसयूव्हीवरील नियंत्रण सुटले. त्यातील दोन मुले किरकोळ जखमांसह बचावली; मात्र मागे बसलेल्या तिसऱ्या मुलाला जीव गमवावा लागला. आयफोन कोण घेऊन देतो? एसयूव्ही कोणाची? पेट्रोलचे पैसे कोण देतो? बाहेरचे जेवण, पार्ट्या आणि पेयांचा खर्च कोण करतो? अर्थातच; पालक. कारण ही मुले आणि तरुण त्यांची जबाबदारी असतात.
हेही खरे आहे की, त्या वयातील मुलांना सांभाळणे सोपे नसते. पालकही अनेकदा हतबल होतात. अशावेळी काही जण समुपदेशकांची, आध्यात्मिक गुरूंची किंवा धार्मिक संस्थांची मदत घेतात. पण हा झाला प्रश्न निर्माण झाल्यानंतरचा ‘एसओएस’ उपाय. संकट ओढवल्यानंतर मदतीसाठी धाव घेण्यापेक्षा समस्या मुळात कुठून निर्माण होते आणि ती होऊच नये यासाठी काय करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे.
आमच्या निवासी संकुलाच्या सर्वसाधारण सभेने क्रिकेट, फुटबॉलसारखे चेंडूचे खेळ खेळण्यास बंदी घालण्याचा ठराव केला. चेंडू लागून एक-दोनदा नव्हे, तर अनेकदा रहिवासी जखमी झाले होते. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश होता. गाड्यांनाही चेंडू लागून नुकसान झाले होते. मुलांना इतर सुरक्षित खेळ खेळण्यास कोणतीही मनाई नाही. लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळाची जागाही आहे. पण क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्यासाठी तिथे पुरेशी जागाच नाही.
अशा परिस्थितीत या मुलांचे सुशिक्षित, आधुनिक पालक त्यांना योग्य मार्गदर्शन करतील, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण तसे होत नाही. आता फारशी लहान न राहिलेली ही मुले क्रिकेट खेळतच राहतात आणि लोक जखमी होतच राहतात. एवढेच नव्हे, तर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनाही उद्धटपणे विचारले की, ‘तुम्ही बाहेरच्या गजबजलेल्या दुपदरी रस्त्याच्या पलीकडे जाऊन का बसत नाही? इथेच वसाहतीच्या बाकावर का बसता?’ त्यांच्या पालकांनीच त्यांना खेळायला सांगितले आहे, असे मुलांचे म्हणणे. ‘आता आम्हाला कोण थांबवते ते पाहू,’ असा त्यांचा आविर्भाव असतो.
अशाच एका प्रसंगी एका ज्येष्ठ महिलेने चेंडू लागलेल्या एका मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर ती मुलगी संतापून म्हणाली, ‘मग आम्ही खेळायचे तरी कुठे?’ मुलीची चूक समजावून सांगण्याऐवजी तिची आई त्या ज्येष्ठ महिलेवरच उलटली. खरा मुद्दा मुलांनी खेळावे की खेळू नये, हा नव्हताच. काय खेळायचे, कुठे खेळायचे आणि कसे खेळायचे, हा खरा प्रश्न होता.
मग प्रश्न पडतो; ही मुले कोणत्या मूल्यांमध्ये वाढत आहेत? इतरांच्या सुरक्षिततेची, वयाचा मान राखण्याची, नियमांचे पालन करण्याची आणि आपल्या कृतीच्या परिणामांची जाणीव त्यांना कोण करून देणार? चुकीच्या मूल्यांमध्ये वाढलेली हीच मुले भविष्यात चुकीच्या कारणांसाठी वर्तमानपत्रांच्या मथळ्यांत झळकण्याची शक्यता अधिक नाही का?
मुलांच्या भावनिक आरोग्यासाठी मूल्ये आणि शिस्त अत्यावश्यक आहेत. ठाम, स्पष्ट आणि सातत्यपूर्ण मर्यादांमध्ये वाढणाऱ्या मुलांना सुरक्षिततेची भावना अधिक असते, असे अनेक अभ्यास सांगतात. अशा मुलांमध्ये स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची, आवेग आवरण्याची आणि नातेसंबंध चांगल्या प्रकारे हाताळण्याची क्षमता विकसित होते.
एखादी परीक्षा रद्द झाल्याने एखादा तरुण मानसिकदृष्ट्या कोलमडून पडत असेल, तर समस्या केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटीत नसते. तो मुलगा किंवा मुलगी आधीपासूनच मानसिकदृष्ट्या काठावर उभा असतो; परीक्षा रद्द होणे हे फक्त शेवटचे निमित्त ठरते. त्याऐवजी दुसरे काहीही कारण असू शकले असते; प्रेमसंबंधातील अपयश, पालकांनी स्मार्टफोन घेऊन देण्यास नकार देणे किंवा एखादी किरकोळ निराशा.
आपण परीक्षा व्यवस्था अधिक चांगली करू शकतो. जीवनातील छोट्या-मोठ्या अडचणी शक्य तितक्या कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण जोपर्यंत आपण मूळ समस्येकडे, भावनिक ताकदीच्या अभावाकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत परिस्थितीत फारसा बदल होणार नाही.
मुलांसाठी आखलेल्या निरोगी मर्यादा म्हणजे शिक्षा वा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न नव्हे. त्या म्हणजे मुलांच्या मनात स्वतःची भावनिक ताकद निर्माण होईपर्यंत दिलेला बाह्य आधार होय. अशा मर्यादा नसतील तर मुलांना अस्थिर, असुरक्षित, उतावीळ, चिंताग्रस्त किंवा आक्रमक वाटू शकते. स्वतःसाठी स्थैर्य शोधताना ते अधिकच भरकटू शकतात.
मी अशा अनेक पालकांना भेटते, जे दररोजच्या ‘सत्तासंघर्षा’ने अक्षरशः थकून गेले आहेत. मुलांनी सांगितलेले ऐकायचे नाही. प्रत्येक गोष्टीवर वाद घालायचा. साधी विनंती केली तरी उलट उत्तर द्यायचे. ‘नाही!’ असे ताडकन सुनवायचे. आई-वडिलांसह कुणाचाही फारसा आदर करायचा नाही. आणि एखादी छोटीशी अपेक्षा पूर्ण झाली नाही की मोठा भावनिक उद्रेक करायचा. शाळांकडूनही अशाच प्रकारच्या तक्रारी ऐकायला मिळतात.
पालकत्व कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे तयार करणारे कोणतेही प्रशिक्षण नसते. पालक मुलांना वाढवता वाढवता स्वतःही शिकत असतात. कधी कधी आपल्या बालपणी ज्या प्रकारच्या पालकांची भीती वाटायची, तसे आपण आपल्या मुलांसाठी होऊ नये, असा निर्धारही पालकांच्या वागण्यात दिसतो.
म्हणूनच मुलांसाठी नियम व मर्यादा ठरवताना पालकांना कधी कधी अपराधी वाटते. आपला कठोरपणा मुलांशी असलेले नाते बिघडवेल, अशी भीती वाटते. पण वास्तव अगदी उलट आहे. मर्यादा नातेसंबंध बिघडवत नाहीत; त्या भविष्यातील मोठ्या समस्या टाळतात आणि मुलांना सक्षम बनवतात. म्हणून मुलांसाठी नियम स्पष्टपणे ठरवा. ते मोडल्यास त्याचे परिणामही स्पष्ट असू द्या. पण हे सर्व राग वा सूडबुद्धीने नव्हे; शांतपणे व प्रेमाने करा.
हे सोपे आहे म्हणून नव्हे, तर आज आपण ज्या घटना वारंवार पाहत आहोत, त्या आपल्याला एक कठोर सत्य सांगत आहेत म्हणून मुलांना योग्य वेळी ‘नाही’ म्हणण्याची किंमत कदाचित मोठी असेल; पण त्यांना कधीच ‘नाही’ न म्हणण्याची किंमत त्याहूनही भयंकर, अगदी जीवघेणी ठरू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.