

मडगाव: काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या तिकिटांची बोली लावणे आताच सुरू केले असून नुवे मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवारीसाठी चार कोटी रुपयांची बोली लावल्याचा सनसनाटी आरोप आज मडगावात पत्रकार परिषदेत राजकीय विश्लेषक ॲड. राधाराव ग्रासियस यांनी केला.
नुकत्याच गोवा भेटीवर आलेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे उतरलेल्या कासावली येथील तारांकित हॉटेलचे लाखोंचे बिलही नुवेच्या एका संभाव्य उमेदवाराने फेडल्याचा आरोपही ग्रासियस यांनी केला. ग्रासियस यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून हा आरोप केला होता. त्यासाठी त्यांनी नुवेचे माजी आमदार आणि माजी मंत्री मिकी पाशेको यांच्या समाजमाध्यमावरील पोस्टचा आधार घेतला होता.
मंगळवारी त्यांनी मडगाव येथील आपल्या कार्यालयात पत्रकार परिषदेत घेत पुन्हा आरोप केला.ते म्हणाले, काँग्रेसने पाटो-पणजी येथे पक्षासाठी काही वर्षांपूर्वी कार्यालय बुक केले होते. त्यासाठी काही अनामत रक्कमही दिली होती. आता ते कार्यालय बांधून पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्या बिल्डरने काँग्रेसकडे संपर्क साधून आपले पैसे फेडून या कार्यालयाचा ताबा घेण्यात यावा, अशी मागणी केली असल्याची माहिती आपल्याला खास सूत्राकडून प्राप्त झाल्याचे सांगितले.
काँग्रेस प्रदेश समितीकडून या बिल्डरला १२ कोटी रुपयांची रक्कम द्यावी लागते. त्यामध्ये आता वाटाघाटी करून ही रक्कम आठ कोटींवर आणण्यात आली आहे. काँग्रेसकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने त्यांनी उमेदवारी विक्रीला काढल्या आहेत. नुवे आणि वेळ्ळी या मतदारसंघासाठी जो कोण चार कोटींची रक्कम अदा करेल, त्यालाच उमेदवारी मिळेल, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, ग्रासियस यांच्या आरोपासंदर्भात काँग्रेसची भूमिका काय, हे जाणून घेण्यासाठी गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
ग्रासियस यांच्या आरोपाबाबत कल्पना नाही
राधाराव ग्रासियस जो आरोप करतात तो कुठल्या माहितीवर आधारित याची मला काहीही कल्पना नाही. त्यावर सध्याची प्रदेश समिती खुलासा करू शकेल. मात्र, मी प्रदेश समितीचा अध्यक्ष असताना असा कुठलाही प्रकार झालेला नाही, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. उलट जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसने तळागाळातील कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिल्याचे पाटकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.