Vijai Sardesai: विजय सरदेसाई कोणती भूमिका घेणार?

Goa Politics: सध्या पक्षबांधणी, जनसंपर्क हे ध्येय असले तरी युतीबाबत सरदेसाईंची भूमिका नेमकी कशी असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. तरी २०२७च्या निवडणुकीत गोवा फॉरवर्ड प्रबळ शक्ती म्हणून समोर उभा ठाकू शकतो.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई हे ’आमचो आवाज विजय’ या उपक्रमाखाली प्रत्येक तालुक्यात जनता दरबार आयोजित करताना दिसत आहेत. परवा फोंडा इथे हा ‘दरबार’ आयोजित करण्यात आला होता. उपस्थिती चांगली होती. लोक आपल्या समस्या सरदेसाईंकडे मांडताना दिसत होते.

विशेष म्हणजे यात फोंड्यातील काही प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांचाही भरणा होता. तसे पाहायला गेल्यास फोंड्यात गोवा फॉरवर्डची विशेष बांधणी नाही. पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत इथे थोडेफार हातपाय मारताना दिसतात तेवढेच. पण तरीही फोंड्यातील लोकांना या ’दरबारा’बद्दल असलेली उत्सुकता लपून राहिलेली नव्हती. याचे प्रमुख कारण म्हणजे विजय सरदेसाई या नावाचे ’ग्लॅमर’!

२००७ साली भाजपच्या दामू नाईकांकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर विजय कोठेच दिसत नव्हते. पण २०१२साली अपक्ष असूनसुद्धा विजय मिळाल्यानंतर विजयांना राजकीय अस्तित्व प्राप्त झाले. त्या काळात विधानसभेच्या अधिवेशनात विजय, रोहन खंवटे व नरेश सावळ या तीन अपक्ष आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनासुद्धा जेरीस आणले होते.

इथूनच विजयांच्या नावाभोवती ’ग्लॅमर’ जमू लागले. त्याचे पुढचे पाऊल म्हणून त्यांनी ‘गोवा फॉरवर्ड’ची स्थापना केली. २०१७साली गोवा फॉरवर्डचे तीन आमदार निवडून आले आणि विशेष म्हणजे तिघांनाही मंत्रिपदे लाभली. पण ही मंत्रिपदे औट घटकेची ठरली. पर्रीकरांच्या निधनानंतर या मंत्रिपदांचाही अंत झाला. तेव्हापासून विजय व भाजपमध्ये जो संघर्ष सुरू झाला तो अजूनही कायम आहे.

विजयमधला अंगार अजूनही तेवढाच तप्त असल्याचे ठायी ठायी दिसून येत आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत फॉरवर्डला एकच जागा मिळाली असली तरी गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जी दक्षिण गोव्याची जागा मिळाली ती मिळवण्यात विजयांचा सिंहाचा वाटा होता हे कोणीही नाकारू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर विजय आता नवी ‘इनिंग’ खेळायला सज्ज झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गोव्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार भरविण्यामागे त्यांचा हाच हेतू असल्याचे प्रतीत होत आहे.

अधिवेशनात या समस्यांविरुद्ध आवाज उठवणार असे त्यांच्याकडून सांगितले जात असले तरी एवढ्या समस्या ते या अधिवेशनात कशा काय मांडणार हे मात्र समजायला मार्ग नाही. पण जनसंपर्क हा त्यांच्या मोहिमेचा मुख्य हेतू असावा.

त्यातून आपल्या पक्षाचा विस्तार व्हावा असेही विजयांना वाटत असावे आणि ते वाटणे साहजिकच आहे. पण हे करताना आपल्या पक्षाची काँग्रेसशी युती आहे हे सांगायला ते विसरत नाहीत.

त्याचबरोबर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असूनसुद्धा अशा प्रकारचा ‘जनता दरबार’ प्रत्येक तालुक्यात का आयोजित करत नाही, हा प्रश्न उपस्थित होतोच. पण एक स्थानिक पक्ष असूनसुद्धा विजयांनी जी मोहीम सुरू केली आहे तिचे महत्त्व यामुळेच अधोरेखित झाल्याशिवाय राहत

नाही. आता प्रश्न आहे तो युतीचा. युती झाली तर जागा वाटणीचा. आम आदमी पक्ष युतीत सहभागी होईल की नाही, हे सांगता येत नाही. तीच गोष्ट तृणूमुलची. आरजी अजूनही अंधारात तीर मारताना दिसत आहे. हे पाहता युतीवर मर्यादा येऊ शकतात.

Vijai Sardesai
Vijai Sardesai: 'काँग्रेससोबत 2027 पर्यंत युती! राहुल गांधींना तसे आश्वासन दिलेय', विजय सरदेसाईंची स्पष्टोक्ती

यामुळेच फॉरवर्डने आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचे ठरविले असावे असे वाटते. येणाऱ्या मडगाव पालिका निवडणुकीत फॉरवर्डने सर्व जागा लढविण्याचे जे ठरविले आहे ती पक्षविस्ताराची नांदी असावी असेच दिसत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक जण विजय यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत. २०१७ साली कोणाशीही युती न करतासुद्धा फॉरवर्डला तीन जागा मिळाल्या होत्या हे विसरता कामा नये.

Vijai Sardesai
Vijai Sardesai: 'या सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्‍या जमिनींवर', सरदेसाईंचा आरोप; सांगेत ‘आमचो आवाज ’ला प्रतिसाद

सध्याचा विजय यांचा प्रभाव पाहिल्यास या यशाची पुनरावृत्ती होऊ शकते वा वृद्धीही होऊ शकते. आता सर्व काही निर्भर असणार आहे ते विजय सरदेसाईंच्या भूमिकेवर किंवा निवडणुकीवेळी असणाऱ्या परिस्थितीवर.

सध्या त्यांची भूमिका संदिग्ध वाटत असली तरी निवडणूक जसजशी जवळ येत जाईल, तसतशी ही भूमिका अधिकाधिक स्पष्ट होत जाईल यात शंकाच नाही. आता ही भूमिका नेमकी कशी असेल हे आत्ताच सांगणे कठीण असले तरी २०२७च्या निवडणुकीत विजय सरदेसाईंचा गोवा फॉरवर्ड एक प्रबळ शक्ती म्हणून समोर उभा ठाकू शकतो एवढे निश्चित!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com