

‘स्टारलिंक ही अमेरिकेतील ‘स्पेसेक्स’ या कंपनीची उपग्रह इंटरनेटसेवा आहे. जमिनीवर सर्वत्र मोबाइल टॉवर किंवा फायबर केबल उभारण्याऐवजी हजारो उपग्रहांच्या साह्याने इंटरनेटसेवा पुरविण्याच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. भारतातही ही कंपनी गुंतवणूक करू इच्छिते. त्यामुळे दुर्गम भागात, खेड्यापाड्यांपर्यंत इंटरनेटसेवा पोचेल, असे म्हटले जाते; परंतु परवानग्या मिळण्यातील अडचणींसंदर्भात कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी भारतीय व्यवस्थेविषयी टिप्पणी केली. या वादाची कारणे, स्वरूप आणि भारताच्या हिताच्या दृष्टिकोनातून सुरक्षेचा प्रश्न या मुद्द्यांचा ऊहापोह...
उपस्थित प्रश्न
१. स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाला विरोध नेमका कशामुळे?
२. एलॉन मस्क यांच्या आरोपांमागे व्यावसायिक हितसंबंध की वास्तव?
३. स्टारलिंकमुळे भारताच्या डिजिटल सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो का?
४. उपग्रह इंटरनेटसेवेच्या माध्यमातून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला कोणती आव्हाने निर्माण होऊ शकतात?
५. स्टारलिंकचा भारतात प्रवेश झाल्यास दूरसंचार क्षेत्रात कोणते बदल होऊ शकतात?
दुर्गम भागात सेवा पुरवण्याचा दावा
या वादाचे स्वरूप केवळ खुली स्पर्धा आणि भारतातील काही बड्या कंपन्यांची मक्तेदारी एवढ्यापुरता मर्यादित नाही. भारतातील दूरसंचार क्षेत्रात मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व आहे, हे वास्तव आहे. या कंपन्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विशेष संरक्षण देऊन सरकार स्पर्धेला मारक भूमिका घेत आहे, अशी टीका परदेशातील बडे उद्योगपती करतात. पण यात केवळ व्यापार-उद्योगाचा प्रश्न नसून सुरक्षेचा मुद्दाही त्यात अंतर्भुत आहे. त्यामुळेच एलॉन मस्क यांनीही भारताच्या सार्वभौम निर्णयप्रक्रियेचा आदर केला पाहिजे.
एखाद्या देशात सेवा पुरवण्याची इच्छा असणे आणि त्या देशाच्या नियमांवर सार्वजनिक दबाव आणण्याचा अधिकार असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. दुर्गम गावे, डोंगराळ प्रदेश आणि सीमावर्ती भागांत विश्वासार्ह इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे अजूनही आव्हानात्मक आहे. उपग्रहांच्या माध्यमातून थेट इंटरनेट पुरवणारी स्टारलिंक ही पोकळी भरून काढू शकते. विशेषतः जिथे पारंपरिक मोबाइल नेटवर्क किंवा फायबर केबल पोहोचवणे खर्चिक ठरते, तिथे या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो, असा दावा केला जातो.
स्पर्धेचा फायदा ग्राहकांना मिळावा
एलॉन मस्क आणि मुकेश अंबानी यांच्यातील स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशावरून सुरू झालेला वाद आता केवळ दोन उद्योगपतींमधील स्पर्धेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो भारतातील उद्योगपतींचा राजकीय प्रभाव, सरकारी निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता आणि क्रोनी कॅपिटॅलिझम (Crony Capitalism) या महत्त्वाच्या मुद्द्यांपर्यंत पोहोचला आहे. मस्क यांनी भारतातील काही ‘ओलिगार्क्स’ म्हणजेच प्रचंड आर्थिक ताकद आणि राजकीय प्रभाव असलेल्या उद्योगपतींकडून `स्टारलिंक’चा मार्ग रोखला जात असल्याचा आरोप केला आहे.
त्यांचा दावा आहे की, विद्यमान कंपन्यांचे वर्चस्व टिकवण्यासाठी स्पर्धेला अडथळे आणले जात आहेत. त्यांनी मुकेश अंबानी यांना उपरोधिकपणे ‘पंतप्रधान अंबानी’ संबोधत त्यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अलीकडील पोस्टमध्ये त्यांनी असा सवालही केला की, स्टारलिंक महाग असेल तर तिच्या प्रवेशाला विरोध करण्याची गरजच काय? बाजारात स्पर्धा निर्माण झाली, तर ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील आणि प्रतिस्पर्ध्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो; पण त्यांचा व्यवसाय संपणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
मस्क यांनी उपस्थित केलेला ‘क्रोनी कॅपिटॅलिझम’चा मुद्दा गांभीर्याने तपासण्यासारखा आहे. जेव्हा सरकारी धोरणे किंवा परवानग्या निष्पक्ष निकषांऐवजी विशिष्ट उद्योगसमूहांच्या हितसंबंधांमुळे प्रभावित होतात, तेव्हा अशा व्यवस्थेला ‘क्रोनी कॅपिटॅलिझम’ म्हटले जाते. भारतात मोठ्या उद्योगसमूहांचा राजकीय आणि आर्थिक प्रभाव हा सार्वजनिक चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे मस्क यांच्या आरोपांकडे केवळ दोन अब्जाधीशांमधील भांडण म्हणून दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. मात्र, व्यापक प्रश्न महत्त्वाचा असला तरी अंबानी यांनीच ‘स्टारलिंक’ला रोखले आहे, हा विशिष्ट आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत.
दुसरीकडे, भारत सरकारचे म्हणणे आहे, की ‘स्टारलिंक’सह तीन उपग्रह इंटरनेट कंपन्यांची सुरक्षा तपासणी सुरू असून त्यांना समान नियामक प्रक्रियेतून जावे लागत आहे. उपग्रह संप्रेषणामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, माहितीचे संरक्षण आणि देशातील नियंत्रणव्यवस्था यांसारखे वास्तविक प्रश्न आहेत. त्यामुळे परवानग्यांमधील विलंब म्हणजेच राजकीय हस्तक्षेप, असा निष्कर्ष त्वरित काढता येत नाही. मस्क यांच्या भूमिकेत व्यावसायिक हितसंबंधही आहेत. ‘स्टारलिंक’ला भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत प्रवेश हवा आहे. त्यामुळे त्यांची विधाने ही ग्राहकांच्या हिताची बाजू मांडणारी असली, तरी त्यातून त्यांच्या स्वतःच्या कंपनीला होणारा फायदा दुर्लक्षित करता येणार नाही.
स्टारलिंक आणि राष्ट्रीय सुरक्षा
एलॉन मस्क यांनी अवकाशात कमी उंचीवरील सुमारे १३ हजार लो अर्थ ऑर्बिट (लिओ) उपग्रह सोडले आहेत. या उपग्रहांमार्फत वाय-फाय रुटरच्या साह्याने भारत सरकारच्या माहितीशिवाय थेट इंटरनेट उपलब्ध करून दिले जाते. स्टारलिंकच्या स्टारशील्ड या कंपनीने अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी गुप्त करार केला आहे. स्टारलिंकला मिळणारा डेटा अमेरिकेच्या सरकारला उपलब्ध करून देणारा हा करार असल्याचे म्हटले जाते. भारत सरकारच्या माहितीशिवाय भारताविषयीचा इत्थंभूत डेटा अमेरिकेपाशी पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागू शकते. ईशान्य भारतातील संवेदनशील राज्यांपैकी एक मेघालय सरकारने स्टारलिंक इंडियासोबत पथदर्शक प्रकल्पासाठी करार केला आहे.
मेघालयात जाण्यासाठी भारतीय नागरिकांनाच परमीट घ्यावे लागत असताना या करारामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्टारलिंकला भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून दाखल व्हावे लागेल, अशी अट घालण्यात आली. ‘इंडियन नॅशनल स्पेस ऑथरायझेशन प्रमोशन सेंटर’ने स्टारलिंकने केलेल्या अर्जाला मंजुरी देताना ही अट घातली. त्यानुसार जिओ आणि एअरटेलने स्टारलिंकसोबत सामंजस्य करार केले आहेत. दुसरीकडे उपग्रह इंटरनेट सेवा देण्यासाठी खुद्द मुकेश अंबानींच्या ‘जिओ.’ने पृथ्वीलगतच्या कमी उंचीवरील सोळाशे लिओ उपग्रह सोडण्याची आणि भारतभरात २३ ग्राऊंड स्टेशन्स उभारण्याची तयारी चालविली आहे.
या ट्रान्सपाँडर्सची वैशिष्ट्ये, क्षमता आणि त्यामुळे देशाच्या सुरक्षेसंबंधात उद्भवणाऱ्या संभाव्य जोखिमा तज्ज्ञांकडून समजून घेण्यासाठी स्टारलिंकसारख्या कंपनीने सादर केलेल्या हजारो पानांच्या दस्तावेजाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. मस्क यांच्यापाशी ट्विटरचे मोठे हत्यार आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांच्यासह भारताचे अनेक बडे राजकीय नेत्यांचे कोट्यवधी फॉलोअर आहेत. स्टारलिंकवरील आपले ट्विट जास्तीत जास्त वाचले जावे म्हणून मस्कने त्याला बूस्ट केले आहे. अमेरिकेत आपला प्रतिस्पर्धी टिकू नये, चीनच्या कार विकल्या जाऊ नयेत म्हणून मस्क यांनी प्रतिबंध घालायला लावले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.