

डॉ. नाऊ वरक
वाराणसी येथे आयोजित यात्रेत सोनिया गांधी सहभागी झाल्या. मात्र तुडुंब गर्दीमुळे त्या गर्दीतच कोसळल्या. त्यांना तात्काळ दिल्लीत हलविण्यात आले. दिल्लीतील विषारी हवा प्रदूषण आणि कडाक्याच्या थंडीमुळे त्यांनी गोव्यात येणे पसंत केले. त्या म्हणतात, ‘गोव्यातील दिवस त्यांच्यासाठी एक प्रकारची मनःशांती होती’.
सोनिया गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग, ए जर्नी ऑफ लव्ह’ हे संस्मरण १० नोव्हेंबर रोजी हार्पर कॉलिन्स या प्रकाशनाने प्रकाशित केले. आतापर्यंत ‘बिलॉन्गिंग’ हा शब्द साहित्य व संशोधनात भाषिक सौंदर्याच्या दृष्टीने वापरला जायचा. सोनिया गांधींनी हा शब्द आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकप्रिय केला. प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे व काँग्रेसच्या विरोधकांमध्ये गाजलेल्या या पुस्तकाने ‘बिलॉन्गिंग’ हा शब्द घरोघरी पोहोचवला. बिलॉन्गिंग म्हणजे ‘आपलेसे करणे व आपलेसे होणे यांमधील मानसिक आणि सामाजिक संबंधांची प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या स्वत्वाला सांभाळणे, हा एक वेगळाच संघर्ष असतो.
इटलीच्या सोनिया माईनो ते सोनिया गांधी या जीवनप्रवासात स्वत्व सांभाळण्यासाठी संघर्ष करावा लागला. समाजमाध्यमांवरील पुस्तकाचे ट्रोलिंग पाहता सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग’चा प्रवास अजूनही संपलेला नाही. या पुस्तकाची पाने चाळताना कुठेतरी सोनिया गांधींची संकल्पना गोव्यालाही लागू पडते याचा भास होत होता. सोनिया व गोवा यांच्या अनुभवात काहीतरी साम्य असल्याची जाणीव होत होती. गोव्यावर पोर्तुगीजांनी सत्ता स्थापन केल्यावर गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीत ‘बिलॉन्गिंग’ शोधत होता. गोवा मुक्तीनंतरचा राजकीय प्रवास पाहिल्यास गोवा आजही ‘बिलॉन्गिंग’च्या दोलायमान स्थितीतून जात आहे.
सोनियांच्या पुस्तकात गोव्याचा तीन ठिकाणी उल्लेख होतो. दोन ठिकाणी प्रत्यक्ष व एका ठिकाणी अप्रत्यक्ष. लग्न झाल्यानंतर सोनिया ज्यावेळी इंदिरा गांधींच्या घरी राहायला आल्या त्यावेळी त्यांना झणझणीत मसालेदार पदार्थ खायची सवय नव्हती. इटलीतील जेवणाशिवाय दिवस कसे काढायचे हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. देशातील विविध प्रकारचे अन्नपदार्थ चाखून त्यांनी भारतावर प्रेम करण्याचा प्रवास सुरू केला. पान नंबर १२२ वर त्या आवर्जून गोव्यातीलही जेवणाचा स्वाद घेतल्याचे नमूद करतात. विविध तऱ्हेचे अन्न ग्रहण करणे ही ‘आपलेसे होण्याची’ प्रक्रिया आहे. खाद्यसंस्कृतीतील विविधता जगणे हे त्या इंदिरा गांधींकडून शिकल्या. सोनियांचे पहिले मूल काही कारणांस्तव जन्मानंतर काही क्षणांतच दगावले.
सोनिया यांच्या दुसऱ्या गरोदरपणावेळी इंदिरा यांनी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिरोडकर यांची मुंबई येथे भेट घेतली. डॉ. शिरोडकर आणि त्यांची शिष्या डॉ. घई यांच्या वैद्यकीय निगराणीखाली राहुल गांधी यांचा १९ जून, १९७० रोजी जन्म झाला. राजीव गांधी यांचाही जन्म डॉ. शिरोडकर यांच्या वैद्यकीय देखरेखीखाली झाला होता. इंदिरांना डॉ. शिरोडकरांबद्दल भरपूर आदर होता. १८९९ मध्ये शिरोडा येथे त्यांचा जन्म झाला होता. ग्रांट मेडिकल कॉलेज, मुंबई येथून एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी १९३१ मध्ये इंग्लंड येथे फेलोशिप ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स (एफआरसीएस) मिळवली.
गोव्याविषयी तिसरा संदर्भ येतो तो पुस्तकाच्या ४७२व्या पानावर. २०१७ मध्ये उत्तरप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने ऑगस्ट, २०१६ मध्ये जनसंपर्क यात्रा आखली होती. वाराणसी येथे आयोजित यात्रेत सोनिया गांधी सहभागी झाल्या. मात्र तुडुंब गर्दीमुळे त्या गर्दीतच कोसळल्या. त्यांना तात्काळ दिल्लीत हलविण्यात आले. दिल्लीतील विषारी हवा प्रदूषण आणि कडाक्याच्या थंडीमुळे त्यांनी गोव्यात येणे पसंत केले. त्या म्हणतात, ‘गोव्यातील दिवस त्यांच्यासाठी एक प्रकारची मनःशांती होती’. मित्रपरिवारासोबतचे निवांत समुद्रकिनाऱ्यावरील सकाळ-संध्याकाळचे फेरफटके, झाडाझुडुपांनी सजलेल्या पायवाटांवरून सायकलस्वारी व मोकळ्या हवेचा मनमुराद आनंद त्यांना भावला.
१७ जानेवारी, १९९८ रोजी सोनिया गांधींनी पणजीत आझाद मैदान येथे लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा संबोधित केली. याच आझाद मैदानावर १७ जानेवारी १९९१ रोजी राजीव गांधींची शेवटची सार्वजनिक सभा झाली होती. २१ मे १९९१ रोजी राजीव गांधींची श्रीपेरूंबुदूर, तामिळनाडू येथे हत्या करण्यात आली. सोनिया यांनी श्रीपेरूंबुदूरवरून आपला राजकीय प्रवास सुरू केला. गोव्यातील त्यांच्या सभेला अपेक्षेपेक्षा कमी गर्दी होती. या सभेत सोनिया यांनी गोवा व नेहरू-गांधी परिवारातील 'बिलॉन्गिंग' अधोरेखित केले. गोव्याचे प्रादेशिकत्व काँग्रेसने राखल्याची जाणीव करून दिली.
काँग्रेसचे रवी नाईक आणि फ्रान्सिस्को सार्दिन्ह यांनी २८ फेब्रुवारी १९९८ रोजी झालेल्या निवडणुकीत लोकसभेच्या दोन्हीही जागा जिंकल्या. गोव्यासह देशभरात काँग्रेसचा चढता आलेख पाहता या घटनेस ‘सोनिया इफेक्ट’ म्हटले गेले. मे, २००२ मधील सभेतही सोनियांनी इंदिरा यांचे गोव्याविषयीचे प्रेम व्यक्त केले. १९८३ मध्ये राष्ट्रकुल देशांच्या नेत्यांची बैठक गोव्यात घेण्यासाठी इंदिरांचा गोव्याविषयीचा जिव्हाळा कारणीभूत होता, असे त्या म्हणतात.
हल्ली गोव्यात पोर्तुगीज कालीन इतिहासामुळे राजकीय व सांस्कृतिक वाद उफाळून येतात. ‘गोव्यातील बरेसचे लोक हे पोर्तुगीज धार्जिणे असू शकतात’, असा समज पसरविला जातो. सोनियांप्रमाणे गोव्यालाही विदेशीत्वाच्या आरशातून निरखले जाते. गोव्याच्या प्रादेशिकतेला पोर्तुगीज वसाहतवादाचा रंग दिला जातो. गोव्यात ‘बिलॉन्गिंग’ ही संकल्पना वृद्धिंगत करण्यासाठी सोनियांचे पुस्तक योग्य संदर्भग्रंथ ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.