स्त्रियांवर होणारे अत्याचार कधी थांबणार? कुडचडेच्या घटनेने समाजाचा चेहरा विद्रूप; खापर फोडण्यात आपण 'माहीर', पण जबाबदारी कुणाची?

Curchorem Crime Case: समाजात पुन्हा अशा घटना घडू नयेत, मुलींवर बलात्कार, अत्याचार होऊ नयेत म्हणून आपण जो काही वाटा उचलला पाहिजे तो उचलतच नाही. म्हणून अशा घटना वारंवार घडतच राहतात.
Curchorem Crime Case
Curchorem Crime CaseDainik Gomantak
Published on
Updated on

शुभदा दीपक मराठे

समाजात पुन्हा अशा घटना घडू नयेत, मुलींवर बलात्कार, अत्याचार होऊ नयेत म्हणून आपण जो काही वाटा उचलला पाहिजे तो उचलतच नाही. म्हणून अशा घटना वारंवार घडतच राहतात.

कुडचड्यासारखी एखादी घटना घडते, तेव्हा आपण त्याचे खापर कुणाच्या तरी माथी फोडून मोकळे होण्यात तत्पर असतो. आपला अनुभव, आपली विचारसरणी यानुसार ‘दोषी कोण?’ हे ठरवून मोकळे होतो. ते स्वाभाविक असले तरी एका गोष्टीकडे दुर्लक्ष होते, ती म्हणजे जबाबदारीचा विचार. समाजात पुन्हा अशा घटना घडू नयेत, मुलींवर बलात्कार, अत्याचार होऊ नयेत म्हणून आपण जो काही वाटा उचलला पाहिजे तो उचलतच नाही. म्हणून अशा घटना वारंवार घडतच राहतात. आपण तीच चर्चा, त्याच प्रतिक्रिया पुन्हा पुन्हा देत राहतो किंवा मेणबत्त्या तरी पेटवत राहतो.

‘मुलींना अतिस्वातंत्र्य देण्याचे हे परिणाम आहेत’, ‘मुलाला बापाच्या पैशांचा व सत्तेचा माज चढला’, ‘सुरक्षा व्यवस्था कोलमडली आहे’, ‘पोलीस करताहेत तरी काय?’, ‘पुरुषसत्ताक संस्कृतीमुळे स्त्रीवर होणारे हे अत्याचार थांबणार तरी कधी?’, ‘आधुनिक जगात आजही स्त्रीचे स्थान दुय्यमच आहे.’, ‘स्त्रीवर अत्याचार करणे ही पुरुषी मानसिकता आहे.’, ‘मुली अशा फशी पडतातच कशा?’, ‘आईवडिलांचे संस्कारच नाहीत’ या व अशा असंख्य प्रतिक्रिया दिल्या जातात. नंतर सगळे शांत. पुन्हा तशीच दुसरी घटना घडली, की पुन्हा हाच प्रतिक्रियांचा रतीब सुरू. ‘माझी भूमिका काय?’ असा प्रश्‍न स्वत:स कधीही विचारत नाही.

Curchorem Crime Case
Goa Crime: पगार-जेवणाच्या वादातून साळगाव 'दुहेरी हत्याकांड', पाच महिन्यांनंतर संशयित ओडिशातून जेरबंद

एखादा मुलगा मुलीवर अश्‍लील कमेन्ट करतो, छेड काढतो, तेव्हा सभोवताली असलेली माणसे गप्प राहतात. त्याचे धाडस वाढत जाते व तो एकेदिवशी बलात्कार करतो. एका अर्थाने गप्प राहण्याचा ‘सज्जनपणा’च बलात्कारास कारणीभूत ठरतो.

आपल्याला विचारणारे कुणीतरी आहे, आपण उत्तरदायी आहोत याचे भान अत्याचार, गुन्हे करण्याची प्रवृत्ती असलेल्या माणसाला कधीच आणून दिले जात नाही. पाणी वरून खाली येते, खालून वर नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. विकार उत्पन्न होणे, नासणे ही प्रकृती आहे. तसे होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. तशी व्यवस्था कुटुंबापासून ते संपूर्ण समाजापर्यंत आपल्याकडे होती व आहे. त्याचे साधे उदाहरण म्हणजे पूर्वी गावागावांतून ऐकू येणारे संबोधन, ‘आमचो जांवय’, ‘आमचो भावोजी’.

Curchorem Crime Case
Goa Crime: बंद घरात माय-लेकीचा मृतदेह; केपेत खळबळ, तीन दिवसांनी प्रकार उघड

पूर्वी हे गावातील कुणीही व्यक्ती एखाद्याबद्दल बोलायचा. त्याचे प्रत्यक्ष नाते तसे असलेच पाहिजे असे बंधन नव्हते. त्यामुळे, चारचौघांत जपून वागण्याचे, कुठलाही गैरप्रकार न करण्याचे बंधन आपसूक त्या व्यक्तीवर येत असे. ‘तुम्ही मला विचारणारे कोण?’ हा प्रश्‍न वयात आलेली मुले आईवडिलांना विचारतात. परवानगी घेणे कालबाह्यच झाले आहे; साधी माहितीही दिली जात नाही.

पूर्वीच्या काळी आईवडिलांच्या धाकात मुले असायची; आता त्याची अजिबात आवश्यकता नाही. पण, किमान संवाद तरी हवा. परस्परांवर प्रेम हवे, जबाबदारीची जाणीव हवी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातला मोकळेपणा नाहीसा झालाय. सगळेच सांगावे, अशी अपेक्षा नाही. पण, निदान आपल्या मित्रमैत्रिणी आपल्या कुटुंबाच्या मित्रमैत्रिणी व्हायला काहीच हरकत नाही. तिथे प्रामाणिकपणा असावा, लपवाछपवी नसावी. आपण अवेळी, नेहमीच्या सुरक्षित जागेपेक्षा अन्यत्र जातो, तेव्हा कायम ‘जीपीएस शेअरिंग’ करून तरी निदान कायम संपर्कात राहणे गरजेचे आहे. लैंगिक अपराध सहसा ओळखीच्या, नात्यात घडतात. एखाद्यावर विश्‍वास ठेवताना केवळ आपली आवड, माहिती यापेक्षाही कुटुंबातील कुणाचे तरी मत अवश्य घ्यावे. नातलगांतही अशा वर्तनाचा पुसटसा संशय जरी आला, तरी न घाबरता ते आई-वडील, भाऊ, बहीण कुणाला तरी स्पष्टपणे सांगावे. कुटुंबीयांनीही ते गांभीर्याने घ्यावे.

Curchorem Crime Case
Goa Crime: टँकर चालकावर जुन्या मालकाकडून खुनी हल्ला! पणजीतील प्रकार; संशयित समीर खानला अटक

नेमस्त, चांगले वागण्याचे नुकसान, दुष्परिणाम यांचे प्रचंड उदात्तीकरण मनोरंजन व अन्य माध्यमातून एवढे केले आहे, की तसे वागणे मूर्खपणात गणले जाते. व्यक्तिगत पातळीवर स्वत:चे व व्यवस्थेतील सद्गुण यांच्यावर कुणाचाही विश्‍वास उरला नाही. कुडचडे प्रकरणात पॉस्कोखाली अटक झालेली असूनही समाजमाध्यमावरील प्रतिक्रिया व्यथित करणाऱ्या होत्या. ‘लगेच जामीन मिळेल’, ‘आरे काय ना सुट्टलो तो; बाणस्तारीचे किदे जाले?’, ‘पैसा आणि सत्ता असली की काहीही शक्य आहे’, ‘पोलिसच केस कमकुवत बनवतील’, अशा सहज उमटलेल्या प्रतिक्रिया होत्या. केवळ दोषीला शिक्षा होईल, यावरचाच नव्हे तर माणसाच्या चांगुलपणावरचाच विश्‍वास उडाला आहे.

Curchorem Crime Case
Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

एखाद्या मटकेवाल्याला पोलिसांनी पकडल्यावर उमटलेली पहिली प्रतिक्रिया असते, ‘हफ्ता पोहोचला नसावा’! काही नकारात्मक बातमी नसली, तर वर्तमानपत्रांची पाने कोरी निघतील, अशी भीती वाटण्याइतपत स्थिती आहे. पोलीस व्यवस्थित तपास करतील व दोषीला शिक्षा होईल, असे प्रामाणिपणे किती जणांना वाटते हे प्रत्येकाने स्वत:स विचारावे. समाजात बदल तेव्हाच घडतील जेव्हा आपण त्याविषयी सकारात्मक व ठाम असू. एका रात्रीत ते घडत नाहीत. सर्वांत आधी त्यावर विश्‍वास ठेवावा लागतो. नाही तर पुन्हा पुन्हा तेच तेच होत राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com