Rahul Narvekar Marathi Controversy: शोक-पस्तावावर खुलासा..!

Marathi Reading Blunder Satire: वाचून काढल्यानंतर आम्ही कागदच उलटा धरून वाचल्याचे ध्यानात आले!
Rahul Narvekar Marathi Controversy
Marathi Reading Blunder SatireDainik Gomantak
Published on
Updated on

सवर्गीय (स्वर्गीय असे वाचावे) आशाताई दिनकर मंगेशकर (च्यामारी पुन्यांदा नाव चुकले. दिनानाथ किंवा दीनानाथ...काहीही चालेल, पण वाचावे!) यांना श्रधधांजली (जोडाक्षरे ज्याने शोधून काढली, त्याला जोड्याने मारावा.) जो शोकपस्ताव (प्रस्ताव) मांडण्यात आला, तो अतिशय बारीक टायपात होता. आणि फोटोकापी मशीनमधली शाई संपल्याने तो असपष्ट (अस्पष्ट) होता. तरीही तो आम्ही वाचून काढला.

वाचून काढल्यानंतर आम्ही कागदच उलटा धरून वाचल्याचे ध्यानात आले! पण तोवर उशीर झाला होता. मुळात आमच्या हातात घाणेरडी छपाई असलेला सदोष मराठी मजकूर लिहिलेला कागद ज्याने दिला, त्याच्याविरोधात अविश्वास दर्शक ठराव आणला पाहिजे. (आणा, आणा!) मजकूर वाईट, टाइप वाईट, छपाई वाईट, कागद वाईट...सगळेच वाईट असून त्यामानाने आम्ही उत्तम अभिवाचन केले, असे म्हणावे लागेल.

Rahul Narvekar Marathi Controversy
Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

माझ्या अभिवाचनामुळे बऱ्याच कुलुंगी टीकाकारांनी मायमराठीच्या नावाने गळे काढले. कुत्री अभद्र भुंकली. पण मी अभिजात मराठीचा पाईप आहे. (पाईक असे वाचावे.) माझे मराठी भाषेवर अतोनात म्हंजे अतोनात फ्रेम आहे. मराठीतले सातबारे आणि फेरफाराचे दस्त मी सहज वाचू शकतो. अगदी कोऱ्या कागदावरचे फेरफारसुद्धा नीट वाचू शकतो. पण हाय मराठी असली की कुणीही फाफलणारच. तरीही मी चांगले अभिवाचन केले.

अभिवाचनाची मला लहानपणापासून सवय आहे. मी इतका घडाघडा बोलत-वाचत असे की शेजाऱ्यांनी मला ‘लेका बालिष्टर का झाला नाहीस?’ असे म्हटले. मग मी वकील झालो. खरे सांगायचे तर माझे अभिवाचन अलवाकिक दर्जाचे (अलौकिक असे वाचावे.) होते. लोकांना ते समजले नाही कारण हल्ली मराठी भाषेचा स्तरच खाली जात आहे. स्व. आशाताईंचा मानभंग होईल, असे तर माझ्या सपनातही येणार नाही.

Rahul Narvekar Marathi Controversy
Marathi Official Language: कोकणीबरोबरच मराठीला राजभाषा करा! 'राजभाषा निर्धार'ची मागणी; मंत्री रमेश तवडकर यांना निवेदन

(स्वप्न...पुन्हा जोडाक्षरं!) मराठी गानरसिकांचे कान तृप्त करणारी आशाताईंची गाणी अरं जा मर अशी आहेत. (कृपया अजरामर असे वाचावे.) गानरसिकांच्या तृप्तीबद्दलचे वाक्य मी अंदाजानेच वाचले, इतके असपष्ट होते. ‘गान’ या शब्दावर तर मी खूपच अडखळलो. नशीब, मी योग्य पद्धतीनेच अभिवाचन केले. या शोकपस्तावाच्या अभिवाचनानंतर मला उपस्थितांनी चांगली दाद दिली. म्हणाले की, ‘‘अध्यक्षमहोदय, तुम्ही उत्तम वाचन करता. कार्यक्रम का करीत नाही? तुफान लोकप्रिय होतील!’’

ही सूचना मी मनावर घेतली. पण त्यानंतर काही टीकाकारांनी माझ्या अभिवाचनावर यथेच्छ झोड उठवली. यामागे हितचिंतकांचे राजकारण आहे हे मला समजते. इतके काही माझे मराठी वाईट नाही. गेली साडेचार वर्षे मी या खुर्चीत बसून माझ्या माहितीप्रमाणे मराठीतूनच सभागृहाचा कारभार चालवत आहे. ज्याअर्थी सगळे खुश आहेत, त्याअर्थी माझी भाषाही चांगलीच आहे. आत्ताच कशी ही टीका झाली?

Rahul Narvekar Marathi Controversy
Marathi official language: मराठीला 'राजभाषा दर्जा' न दिल्यास धडा शिकवू, मडगावातील लोहिया मैदानावर सुभाष वेलिंगकरांचा एल्गार

जे घडले त्यात माझा काहीही दोष नव्हता. कागद, टाइप, छपाई वगैरेबद्दल मी सुरवातीला सांगितलेच. तरीही मी चांगलेच वाचन केले. काही राजकीय नेते कागद हातात न घेता किती वाईट भाषा वापरतात, हे कुणी पाहिले का? कागदावर वाचून मी असे वाचन केले, हातात कागद नसता तर काय बोललो असतो याची कल्पना करा. त्यापेक्षा आहे ते काय वाईट आहे?

तरीही कुणाचे मन दुखले असेल तर मी सॉरी म्हणतो. अगदी शुद्ध मराठीत सॉरी! मग तर झाले? एवढ्या खुलाश्यानंतर कुणी माझ्याकडे बारीक टायपातली लक्षवेधी सूचना आणून दिली, तर मग मला जबाबदार धरू नका. यापुढे माझ्यासमोर येणारा प्रत्येक मजकूर हा मोठ्या टायपातला, स्वच्छ छपाई असलेलाच आला पाहिजे. जय महाराष्ट्र.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com