म्हादईच्या उजव्या अन् डाव्या काठावरील संस्कृतीचा संगम; देवी गांजेश्वरी संकटातून तारुन नेणारी माता की जलमार्गाची रक्षणकर्ती?

Mhadei River Archaeological Heritage: गांजे आणि सत्तरीत एकूण ज्या देवीच्या नौकास्थित मूर्ती आहेत, त्या नावाड्यांच्या समूहाची अधिष्ठात्री देवता होत्या की उद्योगाला चालना देणाऱ्या माता आहेत याविषयी संशोधन व्हावे.
Mhadei River Archaeological Heritage
Mhadei River Archaeological HeritageDainiak Gomantak
Published on
Updated on

राजंद्र पां. केरकर

गांजे आणि सत्तरीत एकूण ज्या देवीच्या नौकास्थित मूर्ती आहेत, त्या नावाड्यांच्या समूहाची अधिष्ठात्री देवता होत्या की उद्योगाला चालना देणाऱ्या माता आहेत याविषयी संशोधन व्हावे. सत्तरीतील म्हादई आणि रगाडो त्याचप्रमाणे तिच्या छोट्या मोठ्या ओहोळांनी वेढलेल्या गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील मेळावली गावात मुख्य ग्रामदेवी सातेरीसमवेत वैशिष्ट्यपूर्ण अशी गांजेश्वरी देवीची मूर्ती पुजली जाते. ही मूर्ती गोव्यात आढळलेल्या मूर्तींपैकी महिषासुरमर्दिनीच्या आगळ्यावेगळ्या रूपाचे दर्शन घडवते.

ङ्गोंडा तालुक्यातल्या उजगाव ग्रामपंचायत क्षेत्रातल्या गांजेत शांतादुर्गेसमवेत गांजेश्वरीचा तेथील पंचायतनात समावेश होतो. परंतु असे असताना, त्या गावापासून काहीशा दूर असलेल्या सत्तरीतल्या मेळावली गावातल्या सातेरी देवीच्या पंचायतनात गांजेश्वरीचा समावेश होत असल्याने, तिच्या मूलभूत स्वरूपाशी निगडीत मूर्तीविज्ञान आणि पारंपरिक लोकधर्म यांचा समाजशास्त्रीय आणि पुरातत्वीय अभ्यास इथल्या नौकास्थित दैवतांच्या इतिहासाचा ऊहापोह करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.

Mhadei River Archaeological Heritage
Rajmachi Fort History: दोन बालेकिल्ल्यांचं अद्भुत रहस्य, बोरघाटावरचा स्वराज्याचा अजेय पहारेकरी; छत्रपतींचा बुलंद 'राजमाची'

मेळावली हा गाव खरे तर शेळ, धडा, मुरमुणे, पैकुळ आणि मैगिणी अशा पाच गावांचा समूह असून, या प्रत्येक गावात स्वतंत्र मंदिरे असली तरी या पाचही गावांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवहारात सातेरी, गांजेश्वरी, जल्मी, सिद्धेश्वर,रवळनाथ, बेताळ, केळबाय या दैवतांना महत्त्वाचे स्थान आहे. आदिवासी गावडाबहुल अशा गावातल्या देवस्थानात मेळेकरांना उल्लेखनीय स्थान आहे. धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा ग्रामपंचायत आणि दुसऱ्या बाजूला ङ्गोंडा तालुक्यातील गांजे उसगाव पंचायत क्षेत्रातील बोंडला आणि सत्तरीतील खोतोडा ग्रामपंचायत क्षेत्रांनी वेढलेला हा गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी घाटमार्ग आणि जलमार्ग यांच्याशी जोडलेला असल्याने, त्याला पूर्वीच्या काळी आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व लाभले होते.

या साऱ्या गोष्टींमागच्या पार्श्‍वभूमीचा उलगडा होण्यासाठी आणि म्हादई रगाडो नदी खोऱ्यात आज जवळपास विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर असणाऱ्या इतिहास आणि पुरातत्त्वीय संचितांचा वेध घेण्यासाठी शेळ मेळावलीची गांजेश्वरी महत्त्वाचा दुवा आहे. मोठ्या संख्येनं मेळावली गावात स्थायिक झालेले आदिवासी गावडा शेकडो वर्षांपूर्वी धारबांदोडा, ङ्गोंडा, तिसवाडी, बार्देस या तालुक्यांतील गावांतून स्थलांतरित झालेले आहेत. या गावात मेळेकर वगळता अन्य बिगर आदिवासी समाज महाराष्ट्रातील कास, गिरोडे, सातोशे त्याचप्रमाणे डिचोलीतील म्हावळिंगे, उसप आदी गावांतून स्थलांतरित झालेला आहे.

Mhadei River Archaeological Heritage
Haath Kaatro Khamb History: "लोकांचे हात कापले जायचे, याचे पुरावे कुठे?" फेरेरांच्या सवालाने 'हात कातरो' खांबाचा वाद विकोपाला; पुराव्यांच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड?

या गावातील पद्ये ब्राह्मण शेकडो वर्षांपूर्वी इथे स्थायिक होऊन, त्यांनी या परिसरात नियोजनबद्ध जलसिंचनाद्वारे आपली हिरवीगार कुळागरे ङ्गुलवली. मेळावली गावातून कर्नाटकातल्या विरंजोळ आणि धारबांदोड्यातल्या तांबडी सुर्लच्या जंगलातून जाणाऱ्या राणीची पाज येथे पूर्वी जंगल मार्गाने जाता यायचे. विरंजोळ येथून गोवा कदंबाच्या खानापूर परिसरातील हळशी येथील राजधानीच्या शहरातही जाणे शक्य होते. पूर्वीच्या काळी गोवा कदंब राजे शिवचित्त पेरमाडीदेव यांची पट्टराणी कमलादेवी ज्या पारंपरिक मार्गाने हळशी ते गोवापूरी ये-जा करायची, त्यालाच ‘राणीची पाज’ ही संज्ञा वापरण्यात आलेली आहे.

म्हादई नदी काठावरचे पूर्वाश्रमीचे गांजे बंदर आज गेल्या अर्धशतकाहून विस्मृतीत गेल्याने म्हादई नदीच्या उजव्या काठावरच्या गांजे आणि डाव्या काठावरच्या आंबेशी परिसरातील नानाविध व्यापार, उद्योगानिमित्त स्थायिक झालेली साखरदांडे, लंवदे आदी कुटुंबे अन्यत्र मार्गस्थ झाली. तिसवाडी, बार्देस आणि अन्य प्रांतांतून मीठ, सुके मासे तर घाटावरच्या प्रदेशांतून लाकडे, कडधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तू यांची ने-आण केली जायची. शिडाची गलबते उसगावच्या जलमार्गातून गांज्यात यायची.

Mhadei River Archaeological Heritage
Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

शेळ- मेळावलीसह ङ्गोंड्यातील गांजे येथे एक आणि सत्तरीतल्या अन्य ठिकाणी अशा ज्या एकूण तेरा नौकास्थित देवीच्या मूर्ती आढळलेल्या आहेत, त्या मूर्तीतून देवीचे तारिणी स्वरूप की जलमार्गाची पोषणकर्तीचे तत्त्व अभिव्यक्त होते, हे निश्चित सांगणे कठीण आहे. आज धामशे, भुईपाल, भिरोंडा आणि गुळेली येथील नौकास्थित देवीच्या उल्लेखनीय मूळ पाषाणी मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्याने, अनमोल असे पुरातत्वीय संचित विस्मृतीत गेलेले आहे. त्यामुळे शेळ-मेळावली, नागवे आणि सावर्डे येथील नौकास्थित देवीच्या मूळ स्वरूपातील मूर्तींचे संरक्षण होणे भारतीय मूर्तीविज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.

धडा जाण्याच्या वाटेवर शेळ-मेळावलीच्या जुन्या मंदिरात ग्रामदेवी सातेरीची त्रिशूळ, ढाल आणि खड्ग अशी शस्त्रे तीन हातांनी आणि चौथा हात रेड्याच्या तोंडावर ठेवलेल्या स्थितीत मूर्ती आहे, तिच्याच शेजारी असलेल्या खोलीत चतुर्हस्त गांजेश्वरी उभ्या स्थितीत त्रिशूळ, ढाल आणि खड्गासहित दाखवलेली आहे. शेळ मेळावली गावातली गांजेश्वरी रिपुमर्दिनी, क्षात्रतेज असलेली आणि संहारक स्वरूपात असून, तिला नौकेत उभ्या स्थितीत दाखवलेली आहे. एकंदर मूर्तीतली नौकेची कलाकृती, नौकेतले होडी वल्हवणारे पुरुष आणि देवीचे एकंदर स्वरूप यावरून या मूर्तीचे वेगळेपण प्रकर्षाने लक्षात येते.

Mhadei River Archaeological Heritage
Keladi Nayaka Dynasty History: शूर राणी चेन्नम्मा: जिने औरंगजेबाचा 'फर्मान' धुडकावून छत्रपती राजाराम महाराजांना दिले अभय!

गांज्यातल्या मंदिरात जी नौकास्थित चतुर्हस्त देवीची जुनी मूर्ती होती, ती चक्क नौकेवर आसनस्थ स्थितीत दाखवलेली असून, नौकेवरती माशाचे चित्र कोरले होते . गांजे येथील शांतादुर्गा परिवारातील गांजेश्वरी आणि शेळ मेळावलीतील सातेरी परिवारातील गांजेश्वरी यांच्यात पूर्वापार ऋणानुबंध अस्तित्वात असले पाहिजेत आणि त्याचेच संचित दोन्ही गावांत आजतागायत पाहायला मिळते. मुंबईतील उमरखाडीतील नौकेत विराजमान झालेली दुर्गादेवी तेथील लोकमानस देवीने आपणाला नानाविध संकटांतून तारून नेणारी म्हणून पुजलेले आहे.

महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील विरार येथे डोंगरावरती नौकारूढ जीवदानी माता जलमार्गातील अडथळे दूर करणारी देवी म्हणून पुजली जाते. गांजे आणि सत्तरीत एकूण ज्या देवीच्या नौकास्थित मूर्ती आढळलेल्या आहेत, त्यांच्या पूजनपरंपरेमागे एकेकाळी लोकांना म्हादईच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेणाऱ्या नावाड्यांच्या समूहाची अधिष्ठात्री देवता होत्या की प्रचलित जलमार्गाला घाटमार्गाशी जोडून निर्विघ्न व्यापार उद्योगाला चालना देणाऱ्या माता आहेत याविषयी निश्चित सांगण्यासाठी या पुरातत्वीय संचितांचा नव्याने संशोधन करण्याची नितांत गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Mandovi Pollution
Cultural history of Juve island
Goa Mandovi River Casino Dispute
Sattari River Drowning Cases
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com