

कविता आमोणकर
रोजच्या जगण्याच्या यांत्रिकपणात या इच्छा ‘वेळ नाही’ किंवा ‘आता वय झालंय’ या दोन वाक्यांखाली कायमच्या दाबल्या जातात. मात्र, जेव्हा आयुष्याची एक संध्याकाळ समोर येते किंवा मुलं आपापल्या विश्वात स्थिरावतात, तेव्हा अचानक आपल्याच जगण्याची पोकळी जाणवू लागते. ही पोकळी भरून काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या सुप्त कलागुणांना आणि अर्धवट राहिलेल्या इच्छांना पुन्हा एकदा जिवंत करणे.
आयुष्य बहुतांश वेळा इतरांच्या सुखासाठी, त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करत वेगाने निघून जातं. कुटुंब, मुलं, नोकरी-व्यवसाय, सामाजिक नाती आणि रोजच्या जगण्याच्या संदर्भांतून प्रवास करताना माणसाला स्वतःसाठी वेळ काढणे अवघड होऊन बसते. या निरंतर प्रवासात एक असा टप्पा येतो, जिथे आरशात पाहिल्यावर प्रश्न पडतो की, ‘या सगळ्या गर्दीत मी कुठे आहे? माझी स्वप्नं कुठे हरवली?’ ही खंत मनाला कुरतडत असतानाच एक नवी जाणीव हळुवारपणे दार ठोठावते... ‘आयुष्यभर आपण सगळ्यांसाठी जगलो, आता स्वतःसाठी जगण्यात काय हरकत आहे?’ हा विचार म्हणजे केवळ एक तक्रार नसून स्वतःकडे परतण्याचा, आपल्या सुप्त इच्छांना उजाळा देण्याचा एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक सुवर्णयोग असतो.
मानवी आयुष्य म्हणजे जणू काही भूमिकांची एक सतत चालणारी मालिका असते. लहानपणी विद्यार्थी, तरुण वयात नोकरी किंवा करिअर इच्छुक, त्यानंतर जोडीदार, पालक अशा अनेक भूमिका आपण आयुष्यभर अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असतो. या प्रत्येक भूमिकेत कर्तव्य आणि जबाबदारी सर्वोच्च स्थानी असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डोक्यात फक्त दुसऱ्यांच्या गरजा, त्यांच्या सोयी-असुविधा आणि त्यांचे भविष्य असते. या गडबडीत आपल्या स्वतःच्या बालपणीच्या किंवा तरुणपणीच्या आवडीनिवडी कोपऱ्यात कुठेतरी धूळ खात पडतात.
कुणाला लहानपणी संवादिनी किंवा कीबोर्ड शिकायचं असतं, कुणाला गिटारच्या तारांवर बोटं फिरवून एखादी धून काढायची इच्छा असते, तर कुणाला स्वतःचं एखादं पुस्तक प्रकाशित करून आपल्या साहित्याची पखरण करायची असते. कुणाच्या मनात चित्रकलेच्या रंगांशी खेळण्याची ओढ असते, तर कुणी नृत्याच्या तालावर स्वतःला विसरून जाऊ इच्छितो. पण रोजच्या जगण्याच्या यांत्रिकपणात या इच्छा ‘वेळ नाही’ किंवा ‘आता वय झालंय’ या दोन वाक्यांखाली कायमच्या दाबल्या जातात. मात्र, जेव्हा आयुष्याची एक संध्याकाळ समोर येते किंवा मुलं आपापल्या विश्वात स्थिरावतात, तेव्हा अचानक आपल्याच जगण्याची पोकळी जाणवू लागते.
ही पोकळी भरून काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या सुप्त कलागुणांना आणि अर्धवट राहिलेल्या इच्छांना पुन्हा एकदा जिवंत करणे. समाजात अनेकदा असा एक गैरसमज पसरलेला असतो की, काहीतरी नवीन शिकण्यासाठी बालपण किंवा तरुणपणच योग्य असते. वय वाढले की शिकण्याची क्षमता कमी होते, स्मरणशक्ती कमजोर होते आणि नवीन गोष्टी आत्मसात करणे कठीण जाते, अशी एक मानवी समजूत रूढ झाली आहे. परंतु आपण कोणत्याही वयात नवीन गोष्टी शिकण्यास, नवीन मार्ग तयार करण्यास आणि जुन्या विचारांना बदलण्यास पूर्णपणे सक्षम असतो, जर शिकण्याची प्रबळ इच्छा मनात असेल तरच!
जेव्हा आपण विशी-तिशीच्या पुढे जाऊन एखादी नवी कला शिकायला सुरुवात करतो, तेव्हा मेंदू अधिक सक्रिय होतो. तरुण वयात शिकताना परीक्षा, स्पर्धा आणि भविष्याची चिंता असते; परंतु वयाच्या एका प्रगल्भ टप्प्यावर शिकताना केवळ आणि केवळ ‘आनंद’ हा एकमेव हेतू असतो. या निव्वळ आनंदासाठी केलेल्या अभ्यासामुळे किंवा कलासाधनेमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो, नैराश्य दूर होते आणि जगण्याबद्दलचा उत्साह द्विगुणित होतो. त्यामुळे ‘आता शिकून काय फायदा?’ असा विचार करण्याऐवजी ‘आता शिकल्याने मला खरा आनंद मिळेल,’ हा विचार मनाला नवी ऊर्जा देणारा ठरतो. नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा मनात निर्माण झाल्यानंतर पुढचा टप्पा येतो तो प्रत्यक्ष कृतीचा.
बऱ्याचदा लोक विचारातच अडकून पडतात की, ‘मी या वयात मनात राहून गेलेली एखादी गोष्ट शिकण्यासाठी किंवा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले, तर लोक काय म्हणतील?’ पण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट शिकायची असते किंवा त्या इच्छेला पूर्ण स्वरूप द्यायचे असते, तेव्हा या गोष्टी नगण्य ठरतात. त्यासाठी सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक राहून हे शोधायला हवं की, आपल्याला आनंद नेमका कशात मिळतो? कीबोर्ड वाजवण्यात, गाणे गाण्यात, कविता रचण्यात, पुस्तक लिहिण्यात, चित्र काढण्यात किंवा नृत्य करण्यात? कुणाच्या दबावाखाली येऊन नव्हे, तर आपल्या आत्म्याला काय साद घालतंय, हे ओळखणे फार गरजेचे आहे. आपण कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी किंवा करिअर करण्यासाठी उतरलो नाही आहोत.
आपण केवळ आपल्या आत्मिक समाधानासाठी आणि आनंदासाठी जगत आहोत. याची खरी जाणीव जेव्हा आपल्याला होते, तेव्हा कुणाशीही तुलना न करता स्वतःच्या प्रगतीचा आनंद आपण स्वतः घेतो. तेव्हा आपल्या जगण्यातील निखळ आनंदाची वृद्धी नक्कीच होते. कोणतीही कला ही साधनेची अपेक्षा करते. रोजचा थोडासा वेळ जर या नव्या आवडीसाठी दिला, तर काही दिवसांतच त्यात झालेला बदल आपल्याला थक्क करणारा दिसतो. हा आपल्यात झालेला बदल म्हणजे स्वतःच्या प्रगतीची पावती असते.
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आवडीला व्यावसायिक दबावातून मुक्त करून केवळ आनंदासाठी जोपासते, तेव्हा त्यातून एका वेगळ्याच सृजनाचा जन्म होतो. उदाहरणार्थ, ज्यांना लिहिण्याची आवड आहे, त्यांनी वर्षानुवर्षे डायरीत किंवा कागदपत्रांच्या कोपऱ्यात जपलेल्या आपल्या कविता, कथा किंवा आठवणी एकत्र करून आपले पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेणे हा एक क्रांतिकारी निर्णय ठरतो. स्वतःचे पुस्तक छापील स्वरूपात हातात पडणे, त्या पानांचा सुगंध घेणे आणि आपल्या भावना जगासमोर मांडणे हा अनुभव शब्दांत सांगता येणार नाही. तीच गत चित्रकला किंवा संगीताची असते. जेव्हा आपण स्वतः काढलेले चित्र भिंतीवर पाहतो किंवा स्वतः वाजवलेली धून आपल्याच कानांवर पडते, तेव्हा जो आत्मसन्मान मिळतो, तो आयुष्यातील सर्व ताणतणावांना विसरण्यासाठी पुरेसा असतो.
हा आनंद कुठल्याही भौतिक संपत्तीपेक्षा कितीतरी जास्त मूल्यवान असतो. अनेकदा महिला किंवा पुरुष वयाच्या एका टप्प्यावर येऊन एकाकीपण अनुभवतात, कारण मुलं मोठी होऊन आपापल्या करिअरमध्ये व्यस्त होतात आणि घरात मोकळी जागा निर्माण होते. अशा वेळी जर स्वतःचा असा एखादा छंद नसेल, तर हे एकाकीपण नैराश्यात रूपांतरित होते... परंतु, अशा वेळी जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी नवीन शिकण्यात गुंतून जाता, तेव्हा तुमचे स्वतःचे एक वेगळे विश्व तयार होते.
तुम्ही अधिक आनंदी, उत्साही आणि सकारात्मक बनता. जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी असता, तेव्हाच निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक निकोप आणि सुंदर बनते. आपण जेव्हा आनंदासाठी इतरांवर अवलंबून न राहता आपल्या स्वतःच्या आनंदाचे मालक बनतो, तेव्हा लाभणारे आत्मिक समाधान मन प्रसन्न आणि संतुष्ट करणारे असते. कुटुंबीयांनाही जेव्हा हे कळते की त्यांची आई, वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्या आवडीच्या जोरावर पुन्हा एकदा तरुण झाली आहे, तेव्हा त्यांनाही एक अनामिक अभिमान वाटतो. आयुष्य हे मोजक्या श्वासांचे कोडे आहे.
आपण ते कसे जगतो, यावरच आपल्या जीवनाची सार्थकता अवलंबून असते. आजवर आपण जे केले, ते उत्तमच केले... कारण त्यातूनच संसार उभा राहिला, पिढ्या घडल्या आणि नाती फुलली. पण आता वेळ स्वतःची पाठ थोपटून घेण्याची आहे. आता वेळ स्वतःच्या सुप्त इच्छांना पंख देण्याची आहे. मग उशीर कशाचा? आजच ठरवा, तुम्हाला कोणती गोष्ट करायची होती जी मागे राहिली? कीबोर्डच्या पडद्यांवर बोटं फिरवायची आहेत, कागदावर रंगांची उधळण करायची आहे, की स्वतःच्या कवितांचे पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवायचे आहे? पाऊल उचला, कारण शिकण्यासाठी, जगण्यासाठी आणि आनंदाने ओसंडून वाहण्यासाठी वयाचा कधीही कोणताही अडथळा नसतो. आयुष्य पुन्हा एकदा नव्याने फुलवूया... स्वतःसाठी, फक्त आणि फक्त स्वतःसाठी!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.