अग्रलेख: कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजाचा एक हक्काचा 'कैवारी' हरपला

Ravi Naik: बहुजन समाजाच्या वेदनेवर फुंकर घालणारा ‘आपला माणूस’ आज हरपला आहे. त्यांचे जीवन हे समाजातील शेवटच्या घटकासाठी केलेल्या संघर्षाचे प्रतीक होते. हा बहुजनांचा ‘कैवारी’ कायम स्मरणात राहील.
Ravi Naik
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

बहुजन समाजाच्या वेदनेवर फुंकर घालणारा ‘आपला माणूस’ आज हरपला आहे. त्यांचे जीवन हे समाजातील शेवटच्या घटकासाठी केलेल्या संघर्षाचे प्रतीक होते. हा बहुजनांचा ‘कैवारी’ कायम स्मरणात राहील. गोव्याच्या राजकारणातील एक कणखर, निर्भीड आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे झुंजार नेते, माजी मुख्यमंत्री रवि नाईक काळाच्या पडद्याआड गेले.

त्यांच्या निधनाने केवळ एक राजकीय पर्व संपले नाही, तर गोव्याच्या मातीतील भूमिपुत्रांचा, विशेषतः कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजाचा एक हक्काचा ‘कैवारी’ हरपला आहे.फोंड्याच्या एका सामान्य घरातून येऊन मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारणारा आणि सत्तेत असतानाही मातीशी आणि माणसांशी नाळ तुटू न देणारा हा नेता अनंतात विलीन झाला.

कूळ-मुंडकारांच्या हक्कांसाठी लढणारा योद्धा

रवि नाईक यांची ओळख केवळ एक माजी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री नव्हती, तर ती ‘भाऊसाहेब बांदोडकरांच्या’ विचारांचे खरे पाईक म्हणून होती. गोव्यातील बहुजन समाजाला जमिनीचा हक्क देणाऱ्या ‘कूळ-मुंडकार कायद्याचे’ ते सर्वांत मोठे संरक्षक आणि पुरस्कर्ते होते. ज्या ज्या वेळी या कायद्याला कमजोर करण्याचा प्रयत्न झाला, त्या त्या वेळी रवि नाईक ढालीसारखे उभे राहिले.

२०१४ मध्ये जेव्हा तत्कालीन सरकारने कूळ-मुंडकार कायद्यात बदल करून खटले दिवाणी न्यायालयात चालवण्याची तरतूद केली, तेव्हा रवि नाईक यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. ‘हा बदल म्हणजे बहुजन समाजाच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे. भाऊसाहेबांनी आम्हांला हक्क दिले, पण हे सरकार ते काढून घेत आहे’, अशा शब्दांत त्यांनी आपली चीड व्यक्त केली होती.

Ravi Naik
Goa Crime: 'ड्रग्ज'प्रकरणी नायजेरियन व्यक्तीला अटक, 64 ग्रॅम गांजासह स्कूटर जप्त; पेडणे पोलिसांची कारवाई

त्यांनी स्पष्ट म्हटले होते की, ‘पहिल्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांवरील कर माफ करून दिलासा दिला आणि नंतर मगो पक्षाने कूळ-मुंडकार कायदा आणून बहुजन समाजाला न्याय दिला. हा कायदाच जर कमजोर झाला, तर आमचा भूमिपुत्र देशोधडीला लागेल.’ प्रसंगी रस्त्यावर उतरून ‘जागृती बैठका’ घेत त्यांनी बहुजन समाजाला त्यांच्या हक्कांसाठी जागृत ठेवले. त्यामुळेच ते केवळ नेते नव्हे, तर बहुजन समाजाचे ‘रखवालदार’ बनले.

बहुजन अस्मितेचा बुलंद आवाज

रवि नाईक हे केवळ कायद्याचे रक्षक नव्हते, तर ते बहुजन समाजाच्या राजकीय अस्मितेचा बुलंद आवाज होते. गावडा, कुणबी, वेळीप आणि धनगर या समाजांना अनुसूचित जमातीचा (डलहशर्वीश्रशव ढीळलश) दर्जा मिळवून देण्यासाठी सुरुवातीला ज्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला, त्यांना आर्थिक अडचणींमुळे दिल्लीत जाऊन आपली बाजू प्रभावीपणे मांडणे आणि तेथील महत्त्वाच्या सरकारी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून पाठपुरावा करणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत, पात्रांव रवि यांनी या समाजाला सर्वतोपरी मदत केली. हा समाज त्यांचे हे सहकार्य कधीही विसरणार नाही.

‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगो) बहुजन समाजाला दगा दिला’, असा थेट आरोप करायला ते कधीही कचरले नाहीत. जेव्हा त्यांना वाटले की, पक्षाची धोरणे समाजाच्या हिताची नाहीत, तेव्हा त्यांनी पक्षातून बाहेर पडून आपला वेगळा मार्ग चोखाळला. त्यांच्या या निर्णयामुळे गोव्यातील, विशेषतः भंडारी समाजाचा व गावडा समाजाचा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी हे सिद्ध केले की, नेता हा समाजाच्या हितासाठी असतो, पक्षासाठी नव्हे.

शिक्षणातून समाज परिवर्तनाचा ध्यास

रवि नाईक यांना शिक्षणाचे महत्त्व पुरेपूर माहीत होते. त्यांना जाणीव होती की, बहुजन समाजाला जर विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल, तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. याच दूरदृष्टीतून त्यांनी आपल्या कार्याचे केंद्र असलेल्या फोंड्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ‘फोंडा एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून त्यांनी उच्चशिक्षणाची दारे समाजातील गरीब आणि वंचित घटकांसाठी उघडली.

आज त्यांच्या नावाने उभे असलेले ‘रवि एस. नाईक कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स’ हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. या संस्थेच्या ध्येयधोरणांमध्येच स्पष्टपणे नमूद आहे की, समाजातील सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, उपेक्षित आणि पहिल्यांदाच शिक्षण घेणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचून त्यांचा बौद्धिक विकास करणे आणि त्यांना सक्षम बनवणे हे संस्थेचे ध्येय आहे. शिक्षणाच्या या ज्ञानगंगेमुळे फोंडा आणि परिसरातील हजारो बहुजन तरुणांचे आयुष्य उजळून निघाले.

Ravi Naik
Goa AAP Candidates : सासष्टीत 9 मतदारसंघांत ‘आप’ देणार उमेदवार! काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याची तयारी; गोवा फॉरवर्डही रिंगणात

मातीशी घट्ट जोडलेला नेता

आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत रवि नाईक यांनी कृषिमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषवली, पण त्यांचा पाय नेहमीच जमिनीवर राहिला. अलीकडेच कृषिमंत्री असताना त्यांनी गोव्याची सुपीक जमीन वाचवण्यासाठी दिलेला लढा सर्वश्रुत आहे. ‘आमची वडिलोपार्जित जमीन दिल्लीवाल्यांना विकू नका, नाहीतर गोव्यात गोमंतकीयच भूमिहीन होतील’, असा कळकळीचा सल्ला ते नेहमी देत.

त्यांचा हा विचार केवळ भावनिक नव्हता, तर त्यामागे बहुजन समाजाच्या भविष्याची चिंता होती. रवि नाईक यांच्या जाण्याने गोव्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गुन्हेगारीवर वचक ठेवणारा कणखर प्रशासक, विकासाची दूरदृष्टी असणारा नेता आणि त्याचवेळी बहुजन समाजाच्या वेदनेवर फुंकर घालणारा ‘आपला माणूस’ आज हरपला आहे. त्यांचे जीवन हे समाजातील शेवटच्या घटकासाठी केलेल्या संघर्षाचे प्रतीक होते. हा बहुजनांचा ‘कैवारी’ कायम स्मरणात राहील.

- दिनेश शिवा जल्मी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com