

श्रीमती द्रौपदी मुर्मू (राष्ट्रपती)
पुरीत पोहोचल्यानंतर, ताफा पुरीच्या बडा दांडावर पोहोचला, तशी मला एक विलक्षण अनुभूती आली. कोणताही विचार न करता मी माझी गाडी थांबवायला सांगून कुणाला समजण्यापूर्वीच, बडा दांडावरून अनवाणी चालण्यास सुरुवात केली होती.
श्री जगन्नाथांना वंदन करणाऱ्या अनेक प्रार्थना आणि स्तोत्रे माझ्या बालपणापासूनच माझ्या स्मरणात आहेत. शाळा आणि महाविद्यालयात शिकत असताना महाप्रभू जगन्नाथांची भजने गाताना मला खूपच आनंद व्हायचा. महाप्रभू आपल्या अत्यंत जवळ असल्याचे मला जाणवायचे. सध्याच्या काळात मी भजने गात नाही, पण मी रोज महाप्रभूंचे स्मरण करते आणि त्यांची भजने गुणगुणते. कठीण काळात ते मला आधार देतात.
आजही, भक्त कवी मधुसूदन राव यांनी रचलेले गीत मी गुणगुणते, ज्याच्या ओळी आहेत: ‘महाप्रभू रात्रंदिवस माझ्या सोबत आहेत; याच स्मरणाने, मी नेहमीच मनापासून त्यांची उपासना करेन’. महाप्रभू जगन्नाथांच्या माझ्या पहिल्या दर्शनाची आठवण आजही अगदी ताजी आहे. या मंदिरात महाप्रभू श्री जगन्नाथांची, त्यांची बहीण सुभद्रा आणि मोठे भाऊ बलभद्र यांच्यासोबत पूजा केली जाते. महाप्रभू जगन्नाथांचा रंग सावळा आणि डोळे गोल आहेत.
सुभद्रेचा वर्ण पिवळा आहे आणि बलभद्र हे चांदण्यातील फुलासारखे पांढरे शुभ्र आहेत. एकदा तुम्ही या देवांचे दर्शन घेतले की, त्यांना कधीही विसरू शकत नाही. किती ते प्रभावी मंदिर, किती भव्य त्या मूर्ती! हे कधी तरी विसरता येणे शक्य आहे का? जेव्हा राष्ट्रपती पदासाठी माझ्या उमेदवारीची घोषणा झाली, तेव्हा मी आदरपूर्वक महाप्रभूंचे स्मरण केले. मी महाप्रभूंना प्रार्थना केली, ‘तुम्ही मला इतक्या उंचीवर घेऊन जात आहात.
मी विनवणी करते की, मला प्रत्येक पाऊल उचलताना मार्गदर्शन करा आणि नेहमी पाठीशी राहा.’ त्यांनी माझी प्रार्थना ऐकली. जेव्हा मला राष्ट्रपती पदाची उमेदवार म्हणून दिल्लीत राहावे लागले, तेव्हाच रथयात्रा उत्सव साजरा होणार होता. त्यामुळे पुरीला जाणे शक्य नव्हते. रथयात्रेदिवशी अगदी पहाटे मी हौझ खास, दिल्ली येथील श्री जगन्नाथ मंदिरात जाऊन महाप्रभूंचे दर्शन घेतले.
२५ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेण्यास संसदेच्या मध्यवर्ती सभागृहाकडे जात असताना मी महाप्रभूंची प्रार्थना करत होते. राष्ट्रपती म्हणून माझ्या प्रारंभीच्या भाषणावेळी, ते अगदी सोबतच असल्यासारखे मला जाणवत होते. मात्र, महाप्रभूंच्या दर्शनासाठी पुरीला जाण्याची माझ्या मनाची ओढ कायम होती. पण मला पुरीला जाता येत नव्हते. माझ्या मनात विचार आला; जोपर्यंत ते स्वतः परवानगी देत नाहीत, तोपर्यंत त्यांचे दर्शन कोणाला कसे मिळू शकेल!
मी मनात त्यांची प्रार्थना केली, ‘महाप्रभू, काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा! पण कृपया मला पुरीला बोलवा.’ त्यांना माझ्या भावना कशा समजणार नाहीत? लवकरच,१० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुरी दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला.
पुरीत पोहोचल्यानंतर, ताफा पुरीच्या बडा दांडावर पोहोचला, तशी मला एक विलक्षण अनुभूती आली. कोणताही विचार न करता मी गाडी थांबवायला सांगून कुणाला समजण्यापूर्वीच, बडा दांडावरून अनवाणी चालण्यास सुरुवात केली होती. श्री मंदिर तिथून सुमारे २ किमी अंतरावर होते. मंदिराच्या नील-चक्रावर आणि शिखरावरील पवित्र पतित पावन ध्वजावर माझे डोळे केंद्रित करून मी पुढे पुढे चालत राहिले.
मी चालत असताना रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या लहान मुलांचे, महिलांचे, तरुणांचे आणि वृद्धांचेही अभिवादन करत होते. गाभाऱ्यात पोहोचून चारही देवांचे दर्शन घेतल्यावर मी एका दिव्य आनंदाने भारावून गेले. ‘मी तिथे प्रार्थना केली, ‘हे महाबाहू! लोकांच्या सेवेप्रती असलेल्या माझ्या समर्पणाच्या भावनेला तुमचे आशीर्वाद सदैव बळ देवोत!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.