PM Narendra Modi Foreign Tour: "मुसाफिर हूं यारो..." मोदींच्या दौऱ्यांवर मिश्कील टोला

Prime Minister Foreign Tours Satire: माणूस हिंडता बरा असतो. केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येते, असे म्हटले जातेच. एका जागी बसून बसून माझा जीव उबगतो.
Prime Minister Foreign Tours Satire
PM Narendra Modi Foreign TourDainik Gomantak
Published on
Updated on

माणूस हिंडता बरा असतो. केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येते, असे म्हटले जातेच. एका जागी बसून बसून माझा जीव उबगतो. जिवाला मुंग्या येतात. जीव चुळबूळ करू लागतो. एकटा जीव, सदाशिव म्हणतात, ते काही उगीच नाही. आपण देशोदेशी जावे, तिथल्या चालीरिती बघाव्यात. नाच बघावेत, तिथले एखादे वाद्य वाजवून बघावे. यातून माणसाला खरी जीवनदृष्टी लाभते. जागतिक समस्या सोडवत मीही सारखा हिंडत असतो.

...काही दिवसांपूर्वी मी सेशेल्स नावाच्या छोट्याशा देशाला भेट दिली. राजनैतिक करार, रणनैतिक करार, व्यापारी करार वगैरे सटरफटर कामे उरकल्यावर तिथे एका १९४ वर्षे वयाच्या कासवालाही भेटलो. त्याला खाऊ दिला. मला बरे वाटले. त्या कासवाला बरे वाटले की नाही, ते कळले नाही. लेकाचे हात-पाय-मान कवचात ओढून विरोधकांसारखे बसले होते.

Prime Minister Foreign Tours Satire
Nepal PM Oath Ceremony: नेपाळमध्ये 'बालेन' युगाचा उदय! रॅपर ते PM... बालेंद्र शाह यांनी घेतली 47 वे पंतप्रधान म्हणून शपथ

सेशेल्सला जाण्यापूर्वी, डेन्मार्क, आइसलँड, इटली वगैरे देशांचा दौरा हाणला होता. माझा झपाटाच असा आहे की एकदा विमान काढले की मी चार-सहा देशात जाऊन येतोच. त्यामुळे इंधनाचा खर्च वाचतो, परकीय चलनही वाचते. युरोप दौऱ्यानंतर मी मनाशी म्हटले एक छोटासा भारत दौराही करून टाकावा!! माझी ब्याग तशी भरलेलीच असते...उचलली आणि भारतात आलो, झाले.

आल्यासारखा भारतात दोन-चार दिवस राहिलो. निदान ओळख तरी राहिली पाहिजे? असाच फिरतीवर राहिलो, तर एक दिवस मलाच फॉरेनर म्हणतील, अशी भीती वाटते. जाऊ दे. पण काहीही म्हणा, भारतात मला का कुणास ठाऊक, पण घरच्यासारखे वाटते. जणू हीच माझी जन्मभूमी आहे, असा भास होतो. पण थोड्या दिवसांनी तो भास नष्ट होऊन ‘मी इथला नव्हेच, किंबहुना मी बायॉलॉजिकलच नव्हे’ असे वाटू लागते. मग मी पुन्हा ब्याग उचलतो. यावेळी तसेच घडले...

Prime Minister Foreign Tours Satire
Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

भारतातून निघून इंडोनेशियाला आलो आहे. सकाळीच जाकार्ताच्या सुकणो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. इंडोनेशियात प्रॉब्लेम एवढाच आहे की इथे आल्यावर आपण भारतातून भारतात आल्यासारखे वाटते. इंडोनेशियात रामायण फारच प्रचलित आहे. मला बघून काही लोकांनी ‘जय श्रीराम, जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. मी दचकलोच! मनात म्हटले, हे रामरक्षा आंदोलक इथे कुठे आले? मी माहिती घेतली. पण माझे धाकटे बंधू उधोजीसाहेब ठाकरे यांनी दादरपुरतेच आंदोलन केले होते, असे मला सांगण्यात आले.

उद्या मी इथल्या प्रंबानन मंदिर संकुलात जाणार आहे. जवळपास १५६ मंदिरे आहेत. प्रंबानन म्हणजे पूर्वीचे ब्रह्मानंद असणार, असे मी वाचले होते. तिथे मीही रामरक्षा म्हणून येईन, असे ठरवले आहे. बघू! इंडोनेशियातून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड असे हिंडून येण्याचा इरादा आहे. इंडोनेशियात तीनेक वेळा येऊन गेलो आहे, आणि ऑस्ट्रेलियातही जाऊन आलो असलो तरी न्यूझीलंड राहून जात होते. या दौऱ्यात तेही होऊन जाणार.

Prime Minister Foreign Tours Satire
Prime Minister Irrigation Scheme : ‘विकासनिधीतून घेतलेले साहित्य चार महिने पडून’; प्रधानमंत्री सिंचाई योजना

सहा दिवसांत दौरा संपणार, या कल्पनेने उदास वाटते आहे. भारतात सध्या कुठल्याच निवडणुका नाहीत. तिथे जाऊन करायचे तरी काय? इंधनाचा प्रश्न मी आधीच सोडवलाय. (उरलेला इथेनॉलच्या साह्याने गडकरीसाहेब सोडवतील!) माझे भारतात तसे सध्या काही काम नाही. (उरलेले मोटाभाई करत आहेत!) पण न्यूझीलंडनंतर पुढे काय, हा प्रश्न माझ्यासमोर आ वासून उभा आहे. पण सध्या इंडोनेशिया तर इंडोनेशिया! सगळे देश हिंडून झाल्यावर मला ग्रहमंडळाकडे वळावे लागणार, अशी चिन्हे दिसतात. बघू!!

मुसाफिर हूं यारो, ना घर है ना ठिकाना,

मुझे हिंडते जाना है, बस हिंडते जाना!!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com