Panaji Traffic Congestion: उत्सवांच्या झगमगाटात पणजीचा श्वास कोंडला; महोत्सव हवेत, पण नागरिकांना मोकळा श्वास कधी?

Panaji Traffic Congestion During IFFI: दरवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत पणजीचे रूपांतर एका सांस्कृतिक केंद्रात होते.
Panaji Traffic Congestion During IFFI
Panaji Traffic CongestionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

राजू नायक

पणजीला मोकळा श्‍वास घेऊ द्या! उत्सवांच्या नियोजनातील ढिसाळपणाची किंमत गोव्याच्या राजधानीने आणखी किती मोजायची? नित्याचे उत्सव व प्रदूषण, वाहतूक कोंडी यामुळे पणजीतील नागरिकांचे जीवन हराम झाले आहे, पणजीला नवचैतन्य प्राप्त करून देण्यासाठी प्रशासनाकडे काय योजना आहेत? दरवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत पणजीचे रूपांतर एका सांस्कृतिक केंद्रात होते. पाठोपाठ आयोजित होणारे विविध कार्यक्रम, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आणि सेरेंडिपिटी कला महोत्सव यांमुळे राजधानीत हजारो पर्यटकांची गर्दी उसळते. गोवा जगाच्या प्रकाशझोतात येण्याचा आनंद साजरा करत असतानाच, पणजी शहर मात्र गर्दीच्या विळख्यात गुदमरू लागते.

गेली २५ वर्षांहून अधिक काळ पणजीकरांची एक साधी, ठाम आणि सातत्यपूर्ण मागणी आहे. मोठ्या प्रमाणावरील उत्सव आणि कार्यक्रम एका छोट्या निवासी शहराच्या मध्यवर्ती भागात कोंबून भरवू नयेत. मात्र, वर्षानुवर्षे नागरिकांच्या या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कार्यक्रमांचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी जवळपास सर्वच कार्यक्रम एकाच परिसरात, म्हणजे कांपाल भागात केंद्रित केले जात आहेत. यावर्षी तर ऑक्टोबर फेस्टमुळेही नागरिकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

Panaji Traffic Congestion During IFFI
Bahujan Representation in Goa: लोकसंख्येत 39 टक्के, पण सत्तेतील वाटा 8 टक्क्यांहून कमी; गोव्याच्या मंत्रिमंडळात बहुजनांची पीछेहाट

याचा परिणाम म्हणजे संपूर्ण नागरी जीवन ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होते. कांपाल परिसरातील रस्ते वाहतुकीच्या कोंडीने जखडले जातात, पार्क केलेल्या वाहनांमुळे पदपथ गायब होतात आणि वाहतूक कोंडी आजूबाजूच्या जोडरस्त्यांवर पसरते. कांपाल पदपथावर गाड्या उभ्या राहातात. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी दैनंदिन जीवन म्हणजे एक प्रकारची अग्निपरीक्षाच ठरते. वाहनांचा आवाज, धूर आणि वाहतुकीचा खोळंबा यामुळे नागरिक अस्वस्थ होतात. स्वतःच्या परिसरातच त्यांना मोकळेपणाने श्वास घेणे कठीण होते.

शुक्रवारपासून ५७ वा इफ्फी सुरू झाला आहे व सेरेंडिपिटीची ११वी आवृत्ती पुढच्या महिन्यातच पणजीत भरेल. या दोन्ही महोत्सवांच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्‍नच नाही. दोन्ही महोत्सव गोव्याचा सांस्कृतिक दर्जा, मानांकन निश्‍चित वाढवताहेत, परंतु पणजीची किंवा कांपाल भागाची या महोत्सवांना सामावून घेण्याची स्थिती आता राहिलीय काय, हा प्रश्‍न आहे, त्याकडे सरकार आणि पालिकेचे सतत दुर्लक्ष झाले आहे. अनेक वर्षांपासून राज्य सरकारने पणजीला उत्सवी नगरीचे स्वरूप आणले आहे, परंतु एकापाठोपाठ असे उत्सव सुरू झाले आणि नागरिकांचा श्‍वास गुदमरू लागला. कांपाल परिसरातील नागरिकांचे खाजगी जीवन उद्‍ध्वस्त झाले. हल्ली तर परिस्थिती इतकी बिघडली आहे की बांदोडकर मार्गावर रहदारीची प्रचंड कोंडी होऊन काही रुग्णवाहिका तेथे अडकून पडल्या, तेव्हा नागरिकांच्या सहनशिलतेचा कडेलोट झाला!

उच्च न्यायालयानेही सरकारचे कान पिळले आहेत. पाच महिन्यांत पणजीच्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर पणजी महानगरपालिकेने राजधानीतील व्यापारी प्रदर्शनावर बंदी लागू करण्याचे पाऊल जरूर उचलले, परंतु त्याची अंमलबजावणी कशी होईल, याबाबत नागरिक साशंक आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर इफ्फी आणि सेरेंडिपिटीसारखे महोत्सव यावर्षीही भरत आहेत. इफ्फीच्या काळात काही रस्त्यांवरील वाहतूक अन्यत्र वळवण्याचे राज्य सरकार पाऊल जरूर उचलते, परंतु रस्ते बंद केल्यानंतर अन्य भागांमध्ये कोंडी होते. विशेषतः पणजीतील मुख्य बाजाराला जोडणारा जन. बर्नांड ज्योकीस रस्ता (आयनॉक्सची मागची बाजू) वाहतुकीसाठी बंद केला जातो तेव्हा लोकांना आपली वाहने उभी करण्यासाठी इतर रस्ते व पदपथांचाही वापर करावा लागतो. नागरिकांचा चालण्याचा अधिकारही हिरावला जातो.

स्थानिक नगरसेवक व कार्यकर्तेही या प्रश्‍नावर सतत आवाज उठवत असतात. पणजीचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर झाले तेव्हा एक सर्वंकष वाहतूक योजना व स्मार्ट शहर एकात्मिक नियंत्रण केंद्र तयार करण्याचे अभिवचन देण्यात आले होते. आल्तिनोवर तसे सुसज्ज नियंत्रण केंद्र स्थापन झाले आहे, परंतु ते कधी कार्यान्वितच झालेले नाही. मग त्यासाठी मंजूर केलेल्या निधीचे काय झाले? स्मार्ट सिटीसाठी प्रचंड खर्च करून सरकारने घाईघाईने सीसीटीव्ही खरेदी केले होते. त्यांचाही पत्ता नाही. परिणामी नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडी व अनागोंदीला तोंड द्यावे लागते. वास्तविक या शहराच्या भवितव्याविषयी चर्चा सुरू करायला सरकार व पालिकेला अजून अपयशच आले आहे. पणजी शहराची वाढ होऊ लागली तेव्हाच नियोजनकर्त्यांना सरकारने विश्‍वासात घ्यायला हवे होते.

Panaji Traffic Congestion During IFFI
Goa International Sports City: गोव्यात 3 हजार कोटींचे आंतरराष्ट्रीय क्रीडा शहर; युरोपातील रिवार समूहाशी करार, 3 हजार रोजगारांची अपेक्षा

२००४मध्ये इफ्फी सुरू झाला व पणजीची रंगरंगोटी करण्यात आली तेव्हा शहरातील रिअल इस्टेटचे भाव वाढतील व बिल्डर्स हात धुऊन घेतील याचा विचार सरकारला स्पर्शून गेला नाही. ताळगाव शहर बनले आहे. राजकारण्यांनी त्याचे लचके तोडणे चालविले व दरवर्षी तेथे एक नवीन झोपडपट्टी तयार होते. पर्वरीचेही तसेच आहे. परिणामी वाहतूक कोंडी व अनियोजित शहरीकरणाचे बळी येथील मूळ नागरिक ठरले! पणजीत कॅसिनोला जागा देण्याचाही निर्णय असाच अविचारी! नोव्हेंबर, डिसेंबर हा काळ अतिपर्यटनाचा. त्याच काळात इफ्फी व सेरेंडिपिटी होते व कॅसिनोमधील गर्दीही वाढते. इफ्फीच्या तारखा बदलण्याचाही विचार अनेकदा बोलून दाखवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील हा विषय. त्याकडे अजून गांभीर्याने पाहिले जात नाही.

एक गोष्ट खरी आहे की, पणजीची अर्थव्यवस्थाही या महोत्सवांंवर अवलंबून आहे. पणजीत हॉटेलांची संख्या वाढली. रेस्टॉरंट व स्थानिक व्यापारी, पर्यटनविषयक सामग्री विकणाऱ्या दुकानांची येथे रेलचेल आहे. १८ जून मार्ग तर पर्यटन रस्ताच बनला आहे. त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब म्हणजे इफ्फी स्थळाच्या समोरच्या प्रोमेनाडवर भरणारे संगीत जलसे बंद झाले आहेत. काही चित्रपट आता पर्वरी, मडगाव, फोंडा येथे वळवण्यात आले आहेत. पर्वरीला जाण्यासाठी मोफत वाहतूक व्यवस्थाही असते. केवळ इफ्फीचा प्रश्‍न नाही. पणजीचा कोंडलेला श्‍वास मोकळा करण्यासाठी आता काही शांतता विभाग व आक्रमक सार्वजनिक वाहतूक योजना राबविण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

उच्च दर्जाचे संगीत जलसे, अन्न महोत्सव, कार्निव्हल व शिमगो मिरवणुका यांचे केंद्रिकरण पणजीतच होण्याची आता काही आवश्‍यकता राहिलीय काय? शहराबाहेर ते नेले जाणे सहज शक्य आहे, ताळगावला ते नेले जाऊ शकतात किंवा पणजीबाहेरच्या मुख्य हमरस्त्याच्या बाजूला उत्सव मैदान तयार केले जाऊ शकते. पणजीचे गतवैभव व वारसा स्थळे, जुन्या इमारतींचे रक्षण करताना अशा वारसा उत्सवांसाठी -जे केवळ दर्दी व अभ्यासक इतिहासाच्या ओढीने भेट देतील - राखून ठेवले जाऊ शकते.

पणजी शहराबाहेर एक निर्धारित व जागतिक दर्जाचे परिषद सभागृह किंवा फिल्मसिटी उभारली जाईल तोपर्यंत पणजीचा भार काही प्रमाणात कमी करण्यासाठी गांभीर्याने उपाय योजले पाहिजेत. पणजीतील उत्सव म्हणजे गोंधळ आणि नागरी सुविधांची गळचेपी असू नये, स्थानिकांना वेठीस धरले जाऊ नये!

नागरिकांची ही व्यथा केवळ किनाऱ्यालगतच्या परिसरापुरती मर्यादित नाही. काही अंतरावर असलेल्या ऐतिहासिक लॅटिन क्वार्टरमधील फोंताईन्हास आणि मळा येथील रहिवासीही या सततच्या गर्दीने त्रस्त झाले आहेत. शांत, निवांत आणि वैशिष्ट्यपूर्ण वातावरणासाठी ओळखला जाणारा हा परिसर आता दिवसभर पर्यटकांच्या गर्दीने व्यापलेला असतो. गोमंतकीय जीवनशैलीतील जिव्हाळ्याचा भाग असलेली दुपारची वामकुक्षीही वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे, रस्त्यांवर भटकणाऱ्या पर्यटकांमुळे आणि अनियंत्रित वाहतुकीमुळे वारंवार विस्कळीत होते. पर्यटकांसाठी ज्या अनुभवाचे वर्णन उत्साहपूर्ण वातावरण म्हणून केले जाते, तेच पणजीकरांसाठी वारंवार येणारे दुःस्वप्न ठरत आहे.

पणजी शहराची रचना एकाच वेळी हजारो अतिरिक्त वाहने सामावून घेण्यासाठी कधीच करण्यात आलेली नव्हती. येथील अरुंद रस्ते, ऐतिहासिक वारसा क्षेत्रे आणि नाजूक नदीकिनारी असलेला परिसर एका छोट्या किनारी शहराच्या गरजा लक्षात घेऊन विकसित झाला आहे; सलग भव्य कार्यक्रमांचा भार सहन करण्यासाठी नव्हे. शहराच्या मध्यवर्ती भागाला कायमस्वरूपी उत्सवभूमी समजणे म्हणजे शहराच्या मर्यादांकडे आणि करदात्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. हंगामी गोंधळाच्या ओझ्याखाली कोलमडून पडण्याऐवजी पणजीला एक राहण्यायोग्य राजधानी म्हणून टिकवायचे असेल, तर प्रशासनाने ठोस आणि निर्णायक पावले उचलणे आवश्यक आहे.

उपाययोजना आवश्यक

भव्य कार्यक्रमांचे विकेंद्रिकरण करा : मोठ्या मैफिली, प्रदर्शने आणि महोत्सवांची ठिकाणे पणजीच्या मध्यवर्ती हद्दीबाहेर हलवावीत. बांबोळी, दोनापावला पठारावरील मोकळ्या जागा किंवा स्वतंत्र संमेलन क्षेत्रांसारख्या शहराच्या बाहेरील जागांमध्ये मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन शक्य आहे. त्यामुळे निवासी परिसर वाहतुकीच्या कोंडीत अडकणार नाहीत.

Panaji Traffic Congestion During IFFI
Goa Voter List Deletion: गोव्यात 35 हजार मतदारांची नावे यादीत नसल्याचा काँग्रेसचा दावा; वगळलेल्यांना मदतीचा हात देणार

'पार्क अँड राइड' व्यवस्था कठोरपणे लागू करा : मोठ्या कार्यक्रमांच्या काळात कांपाल, मिरामार आणि शहराच्या मध्यवर्ती भागात बाहेरील वाहनांच्या पार्किंगवर बंदी घालावी. पाटो, मेरशी आणि बांबोळी येथे बाहेरच्या बाहेर वाहनतळ उभारून, तेथून पर्यटकांना शहरात आणण्यासाठी वारंवार धावणाऱ्या इलेक्ट्रिक शटल बसची व्यवस्था करावी.

वारसा आणि निवासी क्षेत्रांचे संरक्षण करा : मळा आणि फोंताईनहास या परिसरांना व्यावसायिक कार्यक्रमांच्या गर्दीपासून आणि अवजड पर्यटक वाहतुकीपासून पूर्णपणे मुक्त ठेवावे. केवळ स्थानिक रहिवाशांसाठी वाहन प्रवेश पास जारी करावेत आणि शांततेच्या वेळांचे काटेकोर पालन करावे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्यांची दुपारची विश्रांती आणि रात्रीची शांतता पुन्हा अनुभवता येईल.

एकाच वेळी होणाऱ्या कार्यक्रमांच्या परवानग्यांवर मर्यादा घाला : एकाच महापालिका क्षेत्रात सलग किंवा एकाच वेळी अनेक महोत्सव आयोजित करण्यासाठी परवानग्या देण्याची पद्धत थांबवावी. नागरी पायाभूत सुविधांना कार्यक्रमांदरम्यान पूर्ववत होण्यासाठी वेळ मिळणे आवश्यक आहे. नागरिकांनाही त्यांच्या दैनंदिन जीवनाबाबत निश्चितता आणि नियोजनाची संधी मिळायला हवी.

दैनंदिन शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारा : सार्वजनिक वाहतूक सुधारावी, पदपथांवरील अतिक्रमणे हटवावीत आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग निर्माण करावेत. शहरातील कमी अंतराच्या प्रवासासाठी नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये.

उत्सव शहराच्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालण्यासाठी असतात, शहराचा श्वास कोंडण्यासाठी नव्हे. गोव्याचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे वेळापत्रक दीर्घकाळ टिकाऊ राहायचे असेल, तर वर्षभर येथे राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाचा आदर करणे आवश्यक आहे. पणजीला अमर्याद पार्किंगची जागा समजण्याची मानसिकता नियोजनकर्त्यांनी आता सोडली पाहिजे. शहराला अखेर मोकळा श्वास घेऊ द्यायची वेळ आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.