जाने वाले कभी नही आते, जाने वालों की याद आती है... केतन भाटीकरांची अनपेक्षित 'एक्झिट'

Dr Ketan Bhatikar: गेली काही वर्षे फोंडावासीयांच्या दैनंदिन जीवनाचा घटक बनलेल्या भाटीकरांची अचानक झालेली ही ’एक्झिट’ पचविणे तसे कठीणच जाणार असले तरी त्यांच्यासारखे वादळी, समाजसेवी व्यक्तिमत्त्व निर्माण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
Dr Ketan Bhatikar
Dr Ketan BhatikarDainiak Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

गेली काही वर्षे फोंडावासीयांच्या दैनंदिन जीवनाचा घटक बनलेल्या भाटीकरांची अचानक झालेली ही ’एक्झिट’ पचविणे तसे कठीणच जाणार असले तरी त्यांच्यासारखे वादळी, समाजसेवी व्यक्तिमत्त्व निर्माण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. फोंड्याचे एक वादळी व्यक्तिमत्त्व डॉ. केतन भाटीकर काल अनपेक्षितपणे हे जग सोडून गेले. गेल्या दीड वर्षात फोंड्याला बसलेला हा तिसरा राजकीय धक्का.

फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार, फोंड्याचे तत्कालीन आमदार तथा मंत्री रवि नाईक आणि आता फोंड्याच्या राजकीय विश्वावर पकड बसविलेले डॉ. केतन भाटीकर हे तीन मोहरे गेल्या दीड वर्षांत आकस्मिकपणे एका मागोमग एक असे गेल्यामुळे फोंड्याचे राजकीय क्षेत्र पोरके झाल्यासारखे वाटायला लागले आहे. तसे पाहायला गेल्यास भाटीकर हे एक आघाडीचे फिजीओथेरपिस्ट. पण त्यांची खरी ओळख होती ती एक समाजसेवक म्हणून. कोणीही कधीही हाक मारली की ते हजर व्हायचे.

Dr Ketan Bhatikar
Goa Politics: मनोजनंतर अजयकडूनही सोशल मीडियाद्वारे 'बाण'; 'आरजी'त 'उजो'; कार्यकर्त्यांच्‍या ब्रेनवॉशचा आरोप

कोविड काळात तर ते लोकांचे ’मसीहा’च बनले होते. स्वतःच्या हातानी रुग्णांना उचलून रुग्णवाहिकेमध्ये घालणारे भाटीकर त्या काळात देवदूत म्हणून ओळखले जाऊ लागले होते. भाटीकरांनी आपली राजकीय कारकीर्द ‘भाषा सुरक्षा मंच’तर्फे सुरू केली. पण २०१७साली पणजी मतदारसंघातून रिंगणात उतरलेल्या भाटीकरांना नगण्य मते प्राप्त झाल्यामुळे त्यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण २०१८साली झालेल्या फोंडा नगरपालिका निवडणुकीने भाटीकरांना मोठा ब्रेक दिला.

त्यावेळी मगोचे सर्वे सर्वा सुदिन ढवळीकर यांना फोंड्याची पालिका निवडणूक संचालित करण्याकरता एक उमदा चेहरा हवा होता. ती जबाबदारी भाटीकरांनी स्वीकारली आणि यशस्वीही करून दाखवली. ’रायझिंग फोंडा’या मगोप्रणीत पॅनलचे त्यावेळी पंधरापैकी सात नगरसेवक निवडून आले होते आणि हा पॅनल सर्वात मोठा पॅनल ठरला होता. भाजप पॅनलचे पाच व व रवि कॉंग्रेसचे आमदार असूनसुद्धा कॉंग्रेस पॅनलचे तीन नगरसेवक निवडून आल्यामुळे हे यश जास्तच अधोरेखित झाले होते. तिथून भाटीकरांनी फोंड्याच्या राजकीय क्षेत्रात भरारी घ्यायला सुरुवात केली.

Dr Ketan Bhatikar
Goa Politics: खरी कुजबुज; अमित पालेकर कोणता झेंडा घेणार?

२०२०साली झालेल्या कुर्टी झेडपी निवडणुकीत मगो बाजी मारू शकला तो त्यांच्यामुळेच. २०२२साली ते मगो पक्षातर्फे फोंडा मतदारसंघातून रिंगणात उतरले. पण भाजपच्या रवि नाईकांनी त्यांचा अवघ्या ७७ मतांनी पराभव केला. खरे तर हा भाटीकरांना बसलेला मोठा ‘सॅटबॅक’ होता. पण त्याने खचून न जाता त्यांनी आपली समाजसेवा सुरूच ठेवली. त्यानंतर पार पडलेल्या कुर्टी-खांडेपार पंचायतीत त्यांचे पाच पंच निवडून आले.

Dr Ketan Bhatikar
Goa Politics: 'गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्या'! LOP युरींचे प्रतिपादन; काँग्रेस आमदारांतर्फे राज्यपालांना निवेदन

भाटीकरांची खासियत म्हणजे त्यांचे ’फायटिंग स्पिरिट’. विपरीत परिस्थिती असली तरी खचून न जाता त्याला तोंड देणे यामुळेच भाटीकरांचा फोंड्यात एक ब्रँड तयार होऊ शकला. म्हणूनच तर २०१८साली त्यांच्याबरोबर कार्य करणारे अनेक कार्यकर्ते २०२६साल आला तरी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले. २०२३साली झालेल्या फोंडा नगरपालिका निवडणुकीत मगोची भाजपशी युती असल्यामुळे भाटीकरांना आपले स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरावावे लागले होते. आणि सरकारची सर्व ताकद विरोधात असूनसुद्धा भाटीकरांचे चार नगरसेवक निवडून आले होते.

तीच गोष्ट गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या झेडपी निवडणुकीची. यावेळी तर भाटीकरांनी मगो त्यागून आपला अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविला होता. आणि जवळजवळ पावणेसहा हजार मते प्राप्त करून आपली ताकदही दाखवली होती. नुकत्याच रद्द झालेल्या फोंडा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार असलेल्या भाटीकरांनी आपली जबरदस्त हवा निर्माण केली होती त्यामुळे भाजपच्या बड्या बड्या नेत्यांना फोंड्यात डेरा घालावा लागला होता. भाटीकर जिंकणार म्हणून निवडणूक रद्द करण्यात आली असेही बोलले जात होते आणि अजूनही जात आहे.

Dr Ketan Bhatikar
Goa Politics: "बापाला मुलांनी शिकवू नये!" मनोज परब यांच्या 'पोस्ट'ने पक्षात खळबळ; ‘आरजी’तील मतभेद चव्‍हाट्यावर!

यात तथ्य किती आहे याची खातरजमा करणे कठीण असले तरी भाटीकरांनी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते एवढे मात्र खरे. त्यांची समाजसेवा मात्र सुरूच होती. रुग्णांना रक्तपुरवठा करणे, ठिकठिकाणी ‘ब्लड कॅम्प’ घेणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अशा प्रकारची त्यांची समाजसेवा मागच्या पानावरून पुढे सुरूच होती. गोवा क्रिकेट असोसिएशनचे मानद वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे तिथेही ते युवकांच्या प्रतिभेला वाव देण्याचे काम करताना दिसत होते. पण आता सगळेच संपले आहे. त्यांचे आमदार होण्याचे स्वप्नही संपुष्टात आले आहे.

वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षीच ही गोवाभर तेवणारी ज्योत मालवली आहे. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या ग. दि. माडगूळकरांच्या काव्याची परत एकदा प्रचिती यायला लागली आहे. गेली काही वर्षे फोंडावासीयांच्या दैनंदिन जीवनाचा घटक बनलेल्या भाटीकरांची अचानक झालेली ही ’एक्झिट’ पचविणे तसे कठीणच जाणार असले तरी त्यांच्यासारखे वादळी, समाजसेवी व्यक्तिमत्त्व निर्माण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

जाने वाले कभी नही आते,

जाने वालों की याद आती है

हेच शेवटी खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com