Marathi language: हरवलेली अमृताची रसाळ वाणी अन् मराठीची दशा

Marathi Language Preservation: ‘बंद’ आणि ‘आंदोलनां’च्या पलीकडे मराठीच्या संवर्धनासाठी ठोस काय केले? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो.
Marathi Language Preservation
Marathi languageDainik Gomantak
Published on
Updated on

आमोद कुलकर्णी

‘बंद’ आणि ‘आंदोलनां’च्या पलीकडे मराठीच्या संवर्धनासाठी ठोस काय केले? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. केवळ भाषणे ठोकून, आंदोलने करून किंवा रस्त्यावर उतरून भाषेचे संवर्धन होत नसते. नेत्यांच्या घोषणांनी आणि साहित्यिक मेळाव्यांच्या जेवणावळींनी भाषेचा श्वास टिकत नसतो. भाषेचे संवर्धन हे ‘नेतेगिरी’त नसून ते ‘नित्य कृती’त असते.

राठी भाषेच्या समृद्धीचा डंका आपण जगभर वाजवतो, पण वास्तवाच्या धगधगत्या जमिनीवर पाय ठेवला की, चित्र काहीसं वेगळं आणि काळजाला घरं पाडणारं दिसतं. आजच्या पिढीची ‘महिंग्लीश’ (मराठी, हिंदी, इंग्लिश) कडे झुकलेली ओढ आणि मराठीबद्दलची वाढती उदासीनता पाहता, आपली मायबोली कुठेतरी हरवत चालली आहे असं वाटतं. ‘अमृताशी पैज’ जिंकणारी ही भाषा आज स्वतःच्याच घरात उपरी झाली आहे की काय, असा प्रश्न पडतो.

Marathi Language Preservation
Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

भाषेचा प्रवास हा फक्त शब्दांचा नसतो, तर तो संस्कृतीचा असतो. आज घराघरातून ‘आई-बाबा’ जाऊन ''मॉम-डॅडी'' आले आहेत. हे केवळ शब्दांचे बदल नाहीत, तर त्या शब्दांमागचा जो ओलावा होता, जो अस्सल मराठी मातीचा गंध होता, तो कुठेतरी हरवला आहे. पूर्वीच्या पिढ्यांनी मराठीचा वारसा केवळ पुस्तकातून नाही, तर परंपरेतून जपला.

संध्याकाळच्या शुभंकरोतीचा तो नाद, सांजवातीने उजळणारा देव्हारा आणि त्यासोबत म्हटली जाणारी स्तोत्रे, मनाचे श्लोक यातून भाषेचा लहेजा मुलांच्या कानावर पडायचा. पाढे आणि गणिताचे आकडे ‘बे एके बे’ म्हणताना जो नाद असायचा, तो आता ‘टू वन झा टू’ च्या पाश्चात्य सुरात हरवून गेला आहे. रात्री झोपताना आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींतून छत्रपती शिवाजी महाराज आणि साने गुरुजी मुलांच्या मनात घर करायचे. भाषा ही तेव्हा केवळ संवादाचे माध्यम नव्हती, तर ती जगण्याची पद्धत होती.

Marathi Language Preservation
Goa Culture: थोरली चांदई विरुद्ध धाकटी चांदई! अवघ्या 17 घरांच्या वाड्यात दडलंय गोमंतकीय संस्कृतीचं मोठं गुपित; पर्यटकांना भुरळ घालणारं 'पीर्ण' गाव

सुधा मूर्ती यांनी एका ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या, डॉ. आर. एच. कुलकर्णी यांच्याबद्दल खूप सुंदर विधान केले आहे. त्या म्हणतात, ‘जग प्रगतीचे मोजमाप उपकरणांवरून आणि सुखसोयींच्या वस्तूंवरून करत होते, परंतु माझ्या वडिलांनी मात्र प्रगतीचे मोजमाप हे पुस्तके, शिस्त आणि शिक्षण यांच्या आधारे केले.’ आज आपण मात्र प्रगतीच्या चुकीच्या व्याख्यांच्या मागे धावत आहोत. रेल्वे स्टेशनवर असो वा विमानतळावर, हातात इंग्रजी पुस्तक असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. मराठी पुस्तक विकत घेऊन वाचणारा वर्ग दिवसेंदिवस रोडावत चालला आहे. आपण इंग्रजी वाचतो आणि आपल्या भाषेला मात्र मनातून कुठेतरी लाजतो, हीच खरी शोकांतिका आहे.

आज आपण केवळ भाषाच नाही, तर संस्कृतीही विसरत चाललो आहोत. संस्कारांच्या या वेळेवर आता ‘डेली सोप’ आणि ‘टीव्ही सिरियल्स’नी अतिक्रमण केले आहे. पालक मालिकांमध्ये गुंतलेले असतात आणि मुले हातातल्या मोबाईलमध्ये. मराठी संस्कृती आणि भाषा जर खरोखरच जागवायची असेल, तर पालकांनी आपल्या पाल्यांना वेळ द्यायला हवा. भाषेचा गोडवा हा कानाला सवय लावल्याने निर्माण होतो. जेव्हा आईच्या अंगाईत किंवा बाबांनी सांगितलेल्या गोष्टीत मराठी शब्द येतील, तेव्हाच ती भाषा मुलांच्या रक्तात भिनणार आहे.

Marathi Language Preservation
Goa Culture: शणै गोंयबाब: गोमंतकीय नवजागरणाचे जनक

आजकाल अनेक साहित्यिक मंडळांच्या व्यासपीठांवरून जोशपूर्ण भाषणे होताना दिसतात. मराठीसाठी कशी आंदोलने केली, रस्ते कसे अडवले, आणि दैनंदिन व्यवहार कसे बंद पाडले, याचे पाढे मोठ्या अभिमानाने वाचले जातात. पण या ‘बंद’ आणि ‘आंदोलनां’च्या पलीकडे मराठीच्या संवर्धनासाठी ठोस काय केले? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. केवळ भाषणे ठोकून, आंदोलने करून किंवा रस्त्यावर उतरून भाषेचे संवर्धन होत नसते. नेत्यांच्या घोषणांनी आणि साहित्यिक मेळाव्यांच्या जेवणावळींनी भाषेचा श्वास टिकत नसतो. भाषेचे संवर्धन हे ‘नेतेगिरी’त नसून ते ‘नित्य कृती’त असते.

शासनाने कायद्याने दुकानांच्या पाट्या मराठीत केल्या, पण सक्तीने प्रेम निर्माण होत नाही. शिवरायांनी परकीयांना रोखून आपली संस्कृती आणि भाषा जगवली, पण आज आपण आपल्याच मुलखात तिची नागवणूक होताना उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. या सर्व परिस्थितीकडे पाहिलं की, सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या गाजलेल्या गझलेच्या धर्तीवर आजच्या वास्तवाला साजेशा या ओळी मनाला चटका लावून जातात.

Marathi Language Preservation
Goan Food Culture: 'कापे' म्हटली की ती बटाट्याचीच आणि 'फोडी' म्हटल्यावर त्या बटाटेतर...

मराठी बोलणारी वाचणारी माणसे गेली कुठे?

रसाळ वाणी अमृताची सांगा बरे गेली कुठे?

वारसा साहित्यिकांचा कपाटातच सजवला,

अक्षरांशी जोडणारी नाळ ती गेली कुठे?

भिंतीवरी पाट्यांमध्ये टांगली हो मायबोली,

ओठावरी ती नाचणारी ज्ञानेश्वरी गेली कुठे?

रोज अत्याचार होतो मराठीवरती आता,

मराठीला मानणारी माणसे गेली कुठे?

हे प्रश्न केवळ विचारण्यासाठी नसून ते अंतर्मुख होण्यासाठी आहेत. केवळ हळहळून किंवा सोशल मीडियावर संदेश पाठवून मायबोलीचे संवर्धन होणार नाही. भाषेचा हा वनवास संपवायचा असेल, तर आपल्याला आपल्या घरातूनच सुरुवात करावी लागेल. आपल्या पाल्यांच्या हातात मराठी गोष्टींची पुस्तके देणे, दैनंदिन स्वाक्षरी मराठीत करणे आणि आवर्जून मराठी नाटक-साहित्य अनुभवणे ही काळाची गरज आहे.

Marathi Language Preservation
Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

भाषा टिकली तरच आपली संस्कृती आणि अस्तित्व टिकेल. आपण भाषेचे केवळ ‘वापरकर्ते’ न राहता तिचे ‘रक्षक’ बनूया. अंगात मराठीचे रक्त असेल, तर कृतीतही मराठीचे तेज असायला हवे. ‘मराठी केवळ आपली भाषा नाही, तर ती आपली ओळख आहे; संतांच्या आणि शिवरायांच्या या भाषेला आपल्या कृतीतून पुन्हा एकदा ‘अमृताशी पैज’ जिंकण्याचे सामर्थ्य देऊया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com