

केदार साखरदांडे
घरचं साधं शाकाहारी जेवण असो, सत्यनारायण पूजेचं जेवण असो, समाराधना असो, कारणाचं जेवण असो, वनभोजन असो किंवा लग्नाचं जेवण; कापे आणि फोडींशिवाय पर्यायच नाही. लहानपणीची एक गंमत आजही आठवते. पानावर वाढायला सुरुवात झाली की आम्ही बालगोपाळ मंडळी आधी फोडी गट्टम करून टाकायचो. आणि मग, ‘आम्हाला फोडी वाढल्याच नाहीत बॉ!’ अशा मुद्रेचं तोंड करून बसायचो.
आमचं ते रडवेलं तोंड पाहून वडीलधारी मंडळी आपल्या पानातल्या फोडी बालकौतुक म्हणून आमच्या पानात अलगद सरकवायची. खरं तर, आपल्याकडचं दुसऱ्याला देण्यात जे सुख असतं, ते शब्दात सांगता येत नाही. आज तीच अनुभूती शेजारी पानावर बसलेल्या माझ्या मुलीसाठी आपल्या पानातल्या फोडी तिला देताना नव्यानं अनुभवतो आहे. पण ते असो!
कापे म्हटली की ती बटाट्याचीच आणि फोडी म्हटल्यावर त्या बटाटेतर, हा साधा, सहज, सोपा हिशोब आहे. जिन्नस मोजके, वेळ थोडका, पण चव अमर्याद.
मीठ, हळद, तिखट आणि भाजणीसाठी रवा किंवा तांदळाचं पीठ. आणि हो, खोबरेल तेल; इतकाच हा आटोपशीर संसार. वकिलीच्या अभ्यासक्रमात एक्झॉस्टिव्ह आणि इन्क्लुझिव्ह अशा दोन संज्ञा आहेत.
त्याच धर्तीवर सांगायचं तर- कापे म्हणजे बटाट्याची आणि फोडी म्हणजे इतर. या ‘इतरां’मध्ये फ्लॉवर, कारले, दोडकी, चिडकी, भेंडी, भोपळा, पडवळ, सुरण, मुळा, मस्का सांग, वांगी अशा दिसतील त्या आणि आठवतील त्या सगळ्या फळभाज्या येतात.
पालेभाज्या आणि कडधान्यं सोडली तर जवळजवळ कुठल्याही भाजीच्या फोडी होऊ शकतात. माझं वैयक्तिक मत विचाराल तर वांगी, कारली आणि फ्लॉवरच्या फोडी मला अफाट आवडतात. आणि ते मी वर्ल्ड ऍट लार्ज (पुन्हा एक वकिली परिभाषा!) ओरडून सांगायला तयार आहे.
आता तुम्ही म्हणाल, ही फोडी-कापे यांची वकिली फार झाली. काहीतरी वेगळं बोला. तर वेगळं हे की- ही फोडी-कापे मंडळी जेवणाच्या पानात अत्यंत शिस्तीत आपली आब राखून असतात.
तोंडाची चव वाढवणं, जठराग्नी प्रज्वलित करणं, यजमानाने दोन घास अधिक खावेत अशी इच्छा निर्माण करणं, ही सगळी लोकसेवा ही मंडळी प्रामाणिकपणे पार पाडतात. आणि पुढेही पार पाडत राहतील.
फोडी आणि कापे जेवणाच्या पानावर कधीच पंक्तिभेद करत नाहीत. वरणभात असो, तोयभात असो, आमटी असो, ताकभात असो, अगदी कढीभात असो, सगळ्यांशी जमवून घेण्याचं कौशल्य यांच्यापाशी आहे. आणि हे कौशल्य वादातीत आहे.
फोडी-कापे चुरचुरीत हव्यात, तर भाज्या बारीक चिराव्यात, कापांसाठी बटाट्यांच्या पातळ चकत्या कराव्यात; अशा की तेलात सोडताच चर्रर्र असा आवाज यायलाच हवा. आणि नरम, मुलायम फोडी-कापे हव्या असतील तर किंचित जाड कापून वाफेवर शिजवाव्यात.
कुणाला तशा आवडतात, कुणाला अशा. पण मुख्य मुद्दा हा, की आवडतात. कधी कधी गंमत अशी होते की जेवणाच्या मेनूत व्यंजनांची यादी ठरलेली असते, पण फोडी-कापांचा उल्लेख नसतो.
आणि तरीही- अचानक मंडळी वाढली, जेवण साधं आहे, किंवा कधीतरी अशीच, सहज म्हणून त्यांचा समावेश होतो आणि ती ‘स्टील द शो’ करतात. जसं ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’ घेतलेला स्पर्धक थेट किताब जिंकतो, तशीच ही गंमत असते. आणि ती खूप आनंददायी असते.
अग्नी, तेल आणि मीठ-मसाले ही उत्तम पाककलेची त्रिसूत्री आहे. तशीच कुटुंबात आईची स्निग्धता, वडिलांची प्रसंगी दाहकता आणि वडीलधाऱ्या भावंडांचा मीठ-मसाला असला की कुटुंब पूर्ण होतं. फोडी-कापांनी जेवण जसं पूर्ण होतं, तसंच.
शेवटी काय - आयुष्य असो की जेवण, चव उत्तम हवी!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.