Marathi Language: मराठीच्या विकासाला संस्थात्मक यादवीचा खोडा; भाषेचे रक्षकच बनले ऱ्हासाचे कारण!

Marathi Literature Institutions: मराठीला अखेर ‘अभिजात भाषे’चा राष्ट्रीय दर्जा मिळाला आणि शासकीय दरबारात अभिनंदनाचे ठराव मंजूर झाले.
Marathi Literature Institutions
Marathi LanguageDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

आमोद कुलकर्णी

ऐतिहासिक शंभरावे साहित्य संमेलन अवघ्या दोन महिन्यांवर उभे असताना, संमेलनाचे नियोजन आणि भाषेच्या विकासाची दिशा ठरवण्याऐवजी बैठकींमध्ये अंतर्गत यादवीचे घाणेरडे फड रंगवले जात आहेत. समोरासमोर बसून कार्यपद्धतीतील उणिवांवर रोखठोक संवाद साधण्याचे बौद्धिक धारिष्ट्य नाही.

मराठीला अखेर ‘अभिजात भाषे’चा राष्ट्रीय दर्जा मिळाला आणि शासकीय दरबारात अभिनंदनाचे ठराव मंजूर झाले. पेढे वाटून झाले, मंचावर हारतुरे चढले आणि दरबारी वर्तुळात ‘माय मराठी धन्य झाली’च्या टाळ्यांचा गजर झाला. पण या उत्सवी धुंदीत एक अत्यंत क्रूर आणि अस्वस्थ करणारे सत्य आपण जाणीवपूर्वक नाकारत आहोत. आपली भाषा हजारो वर्षांपूर्वी किती श्रेष्ठ होती, याचा केवळ अधिकृत दाखला मिळाल्याने आजच्या युगात ती अमर होत नाही. उलट, ज्या भाषेला वर्तमानकाळात स्वतःचे पाय रोवण्यासाठी भूतकाळाच्या प्रमाणपत्रांची आणि सरकारी अनुदानांची कुबडी लागते, तिचे भविष्य अंधकारमय असते.

Marathi Literature Institutions
Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

गेल्या काही दशकांत आपण मराठीला एका ‘सिक युनिट’सारखे (Sick Industry) वागवले आहे. एका डबघाईला आलेल्या कारखान्याला सरकारने बेल-आउट पॅकेज देऊन कागदावर चालू ठेवावे, तसा हा प्रकार आहे. कोट्यवधी रुपयांची संमेलने, शासकीय पुरस्कार आणि महामंडळांची अनुदाने म्हणजे भाषेला दिलेल्या सलाईनच्या बाटल्या आहेत. आता अभिजाततेच्या नावाखाली केंद्राकडून मिळणारा निधी म्हणजे आणखी एक मोठे आर्थिक अनुदान ठरेल. या अनुदानाच्या व्हेंटिलेटरने मराठीला जिवंत ठेवले नाही, तर तिला आळशी आणि परावलंबी बनवले. जर मराठी टिकवायची असेल, तर आधी तिला या अनुदानाच्या अतिदक्षता विभागातून बाहेर फेकून बाजाराच्या खुल्या आणि स्पर्धात्मक समुद्रात उतरावे लागेल.

वाचकांची भूक भागवू न शकणारे लेखक, प्रकाशक आणि संस्थांना बुडू द्या; जेव्हा संरक्षणाची भीक मिळणे बंद होईल, तेव्हाच पोटासाठी उपयुक्त, विकल्या जाणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने वाचल्या जाणाऱ्या मजकुराची निर्मिती सुरू होईल. या आर्थिक परावलंबनाला आता संस्थात्मक सत्तेच्या नग्न हव्यासाची जोड मिळाली आहे. ज्या संस्थांवर भाषेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली आहे, तिथे साहित्याची साधना उरलेली नसून केवळ खुर्च्या, पदे आणि वर्चस्वासाठी गलिच्छ लाथाळ्या सुरू आहेत. कारभारी बदलून सहा महिने उलटत नाहीत, तोच एकमेकांच्या उरावर बसून अविश्वासाचे कागद भिरकावले जातात. ऐतिहासिक शंभरावे संमेलन अवघ्या दोन महिन्यांवर उभे असताना, संमेलनाचे नियोजन आणि भाषेच्या विकासाची दिशा ठरवण्याऐवजी बैठकींमध्ये अंतर्गत यादवीचे घाणेरडे फड रंगवले जात आहेत.

समोरासमोर बसून कार्यपद्धतीतील उणिवांवर रोखठोक संवाद साधण्याचे बौद्धिक धारिष्ट्य नाही; बैठक सुरू होताच ठराव वाचून अहंकारापोटी सभात्याग करायचा आणि संस्थेची लक्तरे वेशीवर टांगायची, हा निव्वळ पळपुटेपणा आहे. वारंवार विनंत्या करूनही पाठ फिरवणारे हे वर्तन लोकशाही मूल्यांचे नसून विकृत सत्तापिपासेचे द्योतक आहे. घटनेचे सोपस्कार आणि बहुमताच्या गणितांत ही मंडळी मग्न राहतील, पण साहित्य आणि संस्कृतीच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या विश्वासाची चाललेली ही विटंबना साहित्य चळवळीच्या तोंडाला काळे फासणारी आहे. ज्या मंचांवरून नव्या पिढीला दिशा मिळायला हवी होती, त्या व्यासपीठांचा वापर स्वतःच्या मग्रुरीचे राजकारण खेळण्यासाठी चालवला आहे.

अशा म्हाताऱ्या, सत्तालोलुप संस्थांच्या हातून भाषेचा विकास कसा होणार? मराठीच्या ऱ्हासाचे खापर आपण नेहमी ‘इंग्रजी माध्यमावर’ फोडतो; पण वस्तुस्थिती अशी आहे, की मराठीचा गळा इंग्रजीने नव्हे, तर तिच्या कथित ‘रक्षकांनी’ घोटला आहे. आपण ज्याला ‘प्रमाण मराठी’ म्हणतो, ते प्रत्यक्षात एका विशिष्ट सामाजिक वर्गाने स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी उभे केलेले ‘गेटकीपिंग’ आहे. ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार आणि काना-मात्रांचे असे भयंकर नियम लादले गेले, ज्याने ग्रामीण, बहुजन आणि नव्या पिढीच्या मनात भाषेविषयी प्रचंड न्यूनगंड भरवला. स्वतःच्याच मातृभाषेत बोलताना किंवा लिहिताना माणसाला अपराधी वाटावे, इतका भाषिक वर्गकलह आपण पोसला.

इंग्रजीने जग जिंकले कारण तिने स्थानिक उच्चार, बोली आणि लहेजे कोणताही अहंकार न बाळगता सामावून घेतले. आपण मात्र बोलीभाषांची ताकद नाकारून भाषेला व्याकरणाच्या तुरुंगात डांबले. त्याहून भयंकर म्हणजे, मराठी आज ‘म्हातारपणाच्या आजाराने’ ग्रस्त झाली आहे. प्रत्येक सांस्कृतिक व्यासपीठावरून तरुणांना केवळ उपदेशाचे डोस दिले जातात, ‘तुमच्यावर संस्कार राहिले नाहीत’, ‘तुम्ही वाचत नाही’, ‘तुमची भाषा भ्रष्ट झाली’. जोपर्यंत मराठी ही बंडखोरीची, स्वच्छंद रोमान्सची, संतापाची, गेमिंगची, कॉर्पोरेट गॉसिपची आणि रस्त्यावरच्या बेधडक जगण्याची अनफिल्टर्ड भाषा बनत नाही, तोपर्यंत ती तरुण होणार नाही. भाषेला देव्हाऱ्यातील पवित्रतेच्या आणि अभिजाततेच्या पिंजऱ्यातून बाहेर काढून मोकळे सोडण्याची गरज आहे.

आणखी एक मोठा गैरसमज म्हणजे, भाषेचे भवितव्य साहित्यिक, कवी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात असते. वास्तव हे आहे की आजच्या युगात या वर्तुळाचा प्रभाव समाजातील जेमतेम एक टक्क्यावर उरला आहे. भाषेचे खरे निर्माते आणि नियंत्रक आज लेखक नसून सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, यूआय/यूएक्स डिझायनर्स, प्रॉम्प्ट इंजिनिअर्स आणि अल्गोरिदम कोडर्स आहेत. पुढच्या पंचवीस वर्षांत भाषा जुन्या शिलालेखांवर किंवा पोथ्यांवर नव्हे, तर स्क्रीनवर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या डेटासेटमध्ये जगणार आहे.

Marathi Literature Institutions
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

जर मराठी मोबाईलच्या कीबोर्डवर एका बोटाने सहज टाईप करता येत नसेल, जर ती व्हॉईस-असिस्टंटला आणि सर्च इंजिनला वेगाने समजत नसेल, तर शिलालेख कितीही जुने असले तरी भाषा डिजिटल जगात ‘अदृश्य’ होईल. आपण भूतकाळात किती थोर होतो याचा ‘अभिजात’ ताम्रपट मिरवून वर्तमानातील भाषिक दिवाळखोरी लपवता येत नाही. एका बाजूला खुर्च्यांसाठी चाललेली लाथाळी आणि दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाच्या युगाकडे फिरवलेली पाठ, अशा कात्रीत मराठी सापडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.