

प्रदेशावर प्रेम करणे म्हणजे त्याच्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीला अतिशयोक्तीने मोठे करणे नव्हे, तर त्याच्या सत्य इतिहासाचा, त्याच्या खऱ्या परंपरांचा आदर करणे आहे. श्री. दत्ता नायक यांच्या लेखणीत केरळबद्दलचा जो जिव्हाळा दिसतो त्याचा आदर राखूनच ही विनंती आहे की, पुढच्या वेळी केरळचा फेरफटका मारताना तथ्यांकडेही लक्ष द्यावे.
दैनिक ‘गोमन्तक’मध्ये प्रकाशित झालेला दत्ता दामोदर नाईक यांचा ‘केरळचा फेरफटका’ हा लेख वाचला. केरळच्या (Kerala) हिरव्यागार निसर्गाबद्दल, तेथील समृद्ध सांस्कृतिक परंपरेबद्दल आणि लोकजीवनाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा लेखकाचा हेतू नक्कीच स्वागतार्ह आहे. पण जेव्हा आपण एखाद्या प्रदेशाचे कौतुक करतो, तेव्हा त्या प्रदेशाशी जोडलेल्या इतिहासाची, धर्माची आणि संस्कृतीची मांडणीही तितकीच अचूक असायला हवी. अन्यथा प्रेमापोटी केलेले कौतुकच त्या प्रदेशाच्या खऱ्या ओळखीला झाकोळून टाकते. याच भावनेतून काही गोष्टी स्पष्टपणे मांडाव्याशा वाटतात.
लेखाच्या सुरुवातीलाच आदि शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्या कथेचा उल्लेख येतो. त्यात मंडन मिश्र हे बौद्ध पंडित होते, त्यांनी शंकराचार्यांना वादात हरवले आणि त्यामुळे शंकराचार्यांना आत्महत्या करावी लागली, असा दावा केला आहे. हा संपूर्ण प्रसंगच इतिहासाच्या उलट्या बाजूने सांगितला गेला आहे. मंडन मिश्र हे बौद्ध नव्हते, तर ते पूर्व-मीमांसेचे एक महान आचार्य होते, कुमारिल भट्टांचे शिष्य होते आणि वैदिक कर्मकांडाला सर्वोच्च मानणारे विद्वान होते. त्यांच्यात आणि अवघ्या बत्तीस वर्षांचे तेजस्वी तरुण असलेल्या आदि शंकराचार्यांमध्ये जो प्रसिद्ध शास्त्रार्थ झाला, तो माहिष्मती नगरीत झाला. त्या वादाच्या परीक्षक म्हणून स्वतः मंडन मिश्रांची पत्नी, महाविदुषी उभय भारती बसल्या होत्या. अनेक दिवस चाललेल्या या बौद्धिक संघर्षाच्या शेवटी पराभव मंडन मिश्रांचा झाला, शंकराचार्यांचा नाही.
पराभवानंतर त्यांनी अहंकार न बाळगता संन्यास स्वीकारला आणि सुरेश्वराचार्य या नावाने ते शंकराचार्यांचे प्रमुख शिष्य बनले आणि आत्महत्येची कथा तर पूर्णपणे कपोलकल्पित आहे. कारण माहिष्मतीचा हा वाद जिंकल्यानंतरच शंकराचार्यांनी संपूर्ण भारताची पायी परिक्रमा केली, अद्वैत तत्त्वज्ञानाचा डंका वाजवला आणि आपल्या परंपरेनुसार भारताच्या चार कोपऱ्यात चार महान पीठांची स्थापना केली. कर्नाटकातील शृंगेरी मठ, गुजरातमधील द्वारका शारदा पीठ, ओडिशातील पुरी येथील गोवर्धन मठ आणि उत्तराखंडमधील बद्रीनाथ परिसरातील ज्योतिर्मठ. या चार मठांची स्थापना करणारा, शेकडो ग्रंथ आणि भाष्ये लिहिणारा आचार्य वाद हरून आत्महत्या करतो, हे कसे शक्य आहे?
याच लेखात पुढे जगद्विख्यात गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म केरळच्या भूमीत झाला असे म्हटले आहे. ही सुद्धा एक साधी चूक नाही. रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तमिळनाडूतील एरोड येथे झाला आणि त्यांचे बालपण कुंभकोणमच्या मंदिरांच्या सावलीत गेले. त्यांचे कार्य हे संपूर्ण मानवजातीचा अभिमान आहे, पण त्यांना केरळचे ठरवणे म्हणजे तमिळनाडूच्या सांस्कृतिक इतिहासावर अतिक्रमण करण्यासारखे आहे.
धार्मिक परंपरांबाबत तर लेखात मोठा गोंधळ दिसतो. कार्तिकेयलाच केरळमध्ये अय्यप्पा म्हणतात, असे सांगितले आहे. वस्तुतः ही दोन पूर्णपणे स्वतंत्र दैवते आहेत. कार्तिकेय, ज्यांना तमिळनाडूत मुरुगन, स्कंद किंवा सुब्रह्मण्य म्हणतात, ते शिव आणि पार्वती यांचे पुत्र आहेत. तर केरळमधील अय्यप्पा हे शिव आणि विष्णूच्या मोहिनी अवताराचे पुत्र मानले जातात, म्हणूनच त्यांना हरिहरपुत्र म्हटले जाते. शबरीमला हे त्यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
इथेच स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाबाबतचा एक अत्यंत महत्त्वाचा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. अनेकांना वाटते की कार्तिकेय यांना स्त्रिया आवडत नाहीत किंवा ते स्त्रियांचा द्वेष करतात. हे पूर्णपणे असत्य आहे. भारतात आणि जगभरातील सर्व मुरुगन मंदिरांमध्ये स्त्रिया अत्यंत श्रद्धेने आणि मुक्तपणे दर्शन घेतात, पूजा करतात. हिंदू शास्त्रांमध्ये कार्तिकेय हे रक्षक, महान योद्धा आणि दैवी मार्गदर्शक म्हणून पूजनीय आहेत. उत्तर भारतातील काही विशिष्ट मंदिरांमध्ये त्यांच्या ब्रह्मचर्य व्रताच्या आख्यायिकेमुळे स्त्रियांना प्रवेश नाकारण्याची स्थानिक प्रथा कधीतरी होती, त्यातून हा गैरसमज पसरला. पण दक्षिण भारतात चित्र अगदी उलटे आहे. तिथे महिला चांगला जीवनसाथी मिळावा, वैवाहिक जीवन सुखी व्हावे आणि कुटुंबाचे कल्याण व्हावे यासाठी मोठ्या भक्तीने भगवान मुरुगनची आराधना करतात.
दुसरीकडे, केरळमधील शबरीमला मंदिरात दहा ते पन्नास वयोगटातील महिलांना प्रवेश नाकारण्याची जी परंपरा होती, ती भगवान अय्यप्पांच्या नैष्ठिक ब्रह्मचर्यामुळे आहे, कार्तिकेयामुळे नाही. त्यामुळे शबरीमलाचा नियम हा मुरुगन मंदिरांना लावणे हे दोन वेगळ्या परंपरांची सरमिसळ करण्यासारखे आहे.
याचप्रमाणे ‘रोजा’ चित्रपटाच्या अप्रतिम संगीताचा उल्लेख करून ए. आर. रहमान यांना केरळच्या कलासंपन्नतेचे उदाहरण म्हणून सादर केले आहे, ज्यामुळे ते केरळचे आहेत असा गैरसमज होऊ शकतो. ए. आर. रहमान यांचा जन्म चेन्नई येथे ए. एस. दिलीप कुमार म्हणून झाला. त्यांचे वडील आर. के. शेखर हे मल्याळम चित्रपटसृष्टीत नामवंत संगीतकार आणि कंडक्टर होते, त्यामुळे रहमान यांचे बालपण मल्याळम संगीताच्या स्टुडिओत गेले हे खरे आहे. पण त्यांची कर्मभूमी आणि ओळख ही तमिळ संगीत विश्वाची आहे. रोजा हा तमिळ चित्रपट आहे, केरळचा नाही. त्यांना केरळचे ठरवण्याची गरज नाही, कारण त्यांची प्रतिभा स्वतःच देशाच्या सीमा ओलांडून गेली आहे.
खरे तर केरळचा गौरव करण्यासाठी अशा चुकीच्या दंतकथांची अजिबात गरज नाही. केरळची खरी ओळख त्याच्या हिरवाईत नाही तर त्याच्या माणसांच्या कर्तृत्वात आहे. नारायण गुरुंसारख्या समाजसुधारकाने जातिभेदाच्या भिंती पाडल्या, तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने भारताला अंतराळात झेप घ्यायला शिकवले, पी. टी. उषा यांनी धावपट्टीवर देशाचे नाव रोशन केले, राजा रविवर्मा यांनी आपल्या कुंचल्याने देवांना मानवी रूप दिले. हीच केरळची खरी संपत्ती आहे.
प्रदेशावर प्रेम करणे म्हणजे त्याच्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीला अतिशयोक्तीने मोठे करणे नव्हे, तर त्याच्या सत्य इतिहासाचा, त्याच्या खऱ्या परंपरांचा आदर करणे आहे. श्री. दत्ता नायक यांच्या लेखणीत केरळबद्दलचा जो जिव्हाळा दिसतो त्याचा आदर राखूनच ही विनंती आहे की, पुढच्या वेळी केरळचा फेरफटका घालताना तथ्यांचाही फेरफटका घेतला जावा. कारण खोट्या गोष्टींवर उभा केलेला गौरव हा फार काळ टिकत नाही, पण सत्यावर उभा असलेला वारसा हा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.