

आमोद कुलकर्णी
पूर्वी लेखक दशकानुदशके स्वतःच्या लेखणीशी झुंज देत असे. आज काहींना स्वतःच्या पोस्टरशीच जास्त झुंज द्यावी लागते. पूर्वी साहित्य लिहिले जायचे; आता साहित्यिक प्रतिमा ‘व्यवस्थापित’ केली जाते. पूर्वी ग्रंथ बोलायचे; आता बॅनर बोलतात. पूर्वी वाचक लेखक घडवत होता; आज प्रचारयंत्रणा लेखक घडवण्याचा दावा करते.
भारतीय परंपरेतील आख्यायिका या केवळ मनोरंजनासाठी सांगितलेल्या कथा नाहीत; त्या काळाच्या पलीकडे जाऊन मानवी स्वभावाचे दर्शन घडवतात. महाकवी कालिदासाच्या गर्वहरणाची कथा ही त्यापैकीच एक. इतिहासाच्या दृष्टीने ती खरी की काल्पनिक, हा वाद महत्त्वाचा नाही; महत्त्वाचा आहे तिचा आशय. कारण ती सांगते की ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान नसतो, तर अहंकार असतो.
‘अभिज्ञानशाकुंतलम्’, ‘मेघदूत’ आणि ‘रघुवंश’ यांसारख्या अमर साहित्याचा सर्जक असलेला कालिदास एका प्रवासात तहानेने व्याकूळ होतो. एका वृद्ध स्त्रीकडे तो पाणी मागतो. ती त्याला काही प्रश्न विचारते. कालिदास आपल्या विद्वत्तेच्या जोरावर उत्तरे देत राहतो; पण ती प्रत्येक उत्तर सहज खोडून काढते. शेवटी ती सांगते; संकटात साथ देणारे धैर्य हेच खरे बल, व्यर्थ न बोलणारे मौन हेच खरे चातुर्य आणि अंतःकरणातील संतोष हाच खरा श्रीमंतपणा. त्या क्षणी कालिदासाला स्वतःच्या ज्ञानाचा नव्हे, तर अहंकाराचा पराभव झाल्याची जाणीव होते.
आजच्या साहित्यविश्वाने ही कथा पुन्हा एकदा ऐकण्याची गरज आहे. आज शब्दांची साधना कमी आणि प्रतिमेची साधना जास्त दिसते. लेखनापेक्षा लेखक मोठा झाला आहे. पुस्तकापेक्षा प्रकाशन समारंभ मोठा झाला आहे. साहित्यापेक्षा सत्कार, पुरस्कार आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट अधिक महत्त्वाच्या झाल्या आहेत. काही कविता लिहिल्या, दोन-चार कार्यक्रम गाजवले, काही पुरस्कार मिळाले की अनेकांना आपण साहित्याच्या शिखरावर पोहोचलो, असा भास होतो.
याहून मोठे दुर्दैव म्हणजे परस्पर स्तुतीची एक साखळीच तयार झाली आहे. मी तुझा गौरव करतो, तू माझा गौरव कर. मी तुला ‘महाकवी’ म्हणतो, तू मला ‘युगप्रवर्तक’ म्हण. समीक्षेऐवजी प्रशस्तीपत्रे आणि चिकित्सेऐवजी अभिनंदनपर लेख यांची चलती झाली आहे. अशा वातावरणात दर्जा नव्हे, तर गट महत्त्वाचा ठरतो. मग ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ ही म्हण सत्य ठरल्याशिवाय राहात नाही.
काही स्वयंघोषित साहित्यिक धुरीण तर उघडपणे सांगतात, ‘आम्ही शेकडो कवी घडवले. आम्ही शेकडो लेखक घडवले’ हा दावा ऐकला की हसू यावे की कीव करावी, हा प्रश्न पडतो. कवी घडवता येत नाही. लेखक तयार करता येत नाही. प्रतिभा ही कोणाच्या आशीर्वादाने वा व्यासपीठाच्या प्रमाणपत्राने मिळत नाही. ती उपजत असते आणि नंतर प्रदीर्घ वाचन, चिंतन, आत्मसंघर्ष आणि अखंड लेखनातून परिपक्व होत जाते. व्यासपीठ संधी देऊ शकते; पण प्रतिभेला जन्म देऊ शकत नाही.
आज साहित्याचे मूल्यमापनही अनेकदा गुणवत्तेपेक्षा गणितांवर अवलंबून असल्याचे चित्र दिसते. कुणाच्या गटात आहात, कुणाच्या कार्यक्रमाला जाता, कुणाच्या पुस्तकावर प्रस्तावना लिहिता, कुणाच्या सत्काराला उपस्थित राहता, कुणाला पुरस्कारासाठी शिफारस करता, या समीकरणांमधून साहित्यिक प्रतिष्ठा ठरवली जात असल्याचा भास निर्माण होतो. पुरस्कारांचा एवढा सुळसुळाट झाला आहे की कधी कधी वाटते, पुरस्कारांचे महत्त्व वाढले नाही; उलट पुरस्कारच स्वस्त झाले.
पूर्वी लेखक दशकानुदशके स्वतःच्या लेखणीशी झुंज देत असे. आज काहींना स्वतःच्या पोस्टरशीच जास्त झुंज द्यावी लागते. पूर्वी साहित्य लिहिले जायचे; आता साहित्यिक प्रतिमा ‘व्यवस्थापित’ केली जाते. पूर्वी ग्रंथ बोलायचे; आता बॅनर बोलतात. पूर्वी वाचक लेखक घडवत होता; आज प्रचारयंत्रणा लेखक घडवण्याचा दावा करते. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे चिकित्सेची भीती. भाषेतील चूक दाखवली, वृत्तातील दोष निदर्शनास आणला किंवा आशयातील उथळपणा सांगितला की लगेच मत्सर, गटबाजी आणि कटकारस्थानाचे आरोप सुरू होतात. टीका स्वीकारण्याची क्षमता संपली की लेखकाचा विकासही संपतो. चाटुकारांच्या टाळ्या काही काळ सुखावतात; पण त्या साहित्य अमर करत नाहीत.
आज अनेक जण अभिमानाने सांगतात, ‘आम्ही कुणालाच वाचत नाही. आमची स्वतःची शैली आहे,’ ही भूमिका स्वतंत्रतेची नसून अभ्यासाच्या दारिद्र्याची आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, मोरोपंत, केशवसुत, कुसुमाग्रज, विंदा, ग्रेस यांनी परंपरा वाचली, जग वाचले, जीवन वाचले आणि मग स्वतःला लिहिले. वाचनाशिवाय लेखन म्हणजे पाया नसलेल्या इमारतीसारखे असते. आजचा खरा प्रश्न साहित्याचा नाही; साहित्यिक अहंकाराचा आहे. पूर्वी एखादा महाकवी गर्विष्ठ झाला, तर सरस्वतीने त्याचा गर्व उतरवला. आज प्रत्येक गल्लीत स्वतःला महाकवी समजणारे अनेक दिसतात; पण त्यांचा गर्व उतरवण्यासाठी सरस्वती पुन्हा पुन्हा अवतार घेणार का?
काळ हा सर्वात कठोर समीक्षक असतो. मंचावरील टाळ्या थांबतात, सत्कारांची फुले सुकतात, पुरस्कारांवर धूळ साचते, वर्तमानपत्रांच्या कात्रणांचा रंग फिका पडतो; पण खरे साहित्य मात्र काळाच्या प्रवाहात अधिक उजळत जाते. म्हणूनच साहित्य हे प्रसिद्धीचे नव्हे, तर साधनेचे क्षेत्र आहे. कालिदासाच्या गर्वहरणाची कथा आजही आपल्याला एकच धडा शिकवते, विद्वत्ता माणसाला मोठे बनवत नाही; नम्रता बनवते. पुरस्कार लेखकाला श्रेष्ठ बनवत नाहीत; त्याची लेखणी बनवते. आणि साहित्यिकाचे खरे स्मारक त्याचे सत्कार नसतात, तर त्याचे शब्द असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.