

मधू य.ना. गावकर
जंगल हे प्रामुख्याने प्राणी जीवन असते. त्यात वावरणारे प्राणी स्वाभाविक प्रेरणेने जंगलात जगत असतात. जंगल पाहिले की आदिम जीवनाचे उग्र भीषण स्वरूप आणि विकसित मानवाच्या जीवनातील परस्पर विरोध प्रभावीपणे जाणवतो. मानवाने आपल्यातील पशुत्वापासून मानवतेपर्यंत किती दीर्घपल्ला गाठला, हे आदिम काळापासूनच्या जंगली जीवनाचे रहस्य उलगडल्यावर कळते. तो जीवनाचा आलेख आहे.
अरण्यात वावरणारा शेकरा ज्याप्रमाणे झाडाझुडपावर राहत अंतराळात चाललेला पहावयास मिळतो, हा शेकरा म्हणजे खारीचा दुसरा प्रकार. त्याचा देह खारीपेक्षा मोठा असतो. कैक प्रकारची फळे खाणे हे त्याचे आवडते काम; ते मिळवण्यासाठी अनेक झाडांवर त्याचा प्रवास असतो. त्याच्या साथीत असणाऱ्या वन्यप्राण्यांचे जीवन-रहस्य तो आपल्या बिटबिटणाऱ्या मोठ्या डोळ्यांनी पाहतो. त्याचा इतर प्राण्यांबरोबर सहवास असला तरी पलायनात तो चपळदार असतो. सगळ्या जंगली प्राण्यांचे जीवन येणाऱ्या वेगवेगळ्या ऋतुमानावर साकार होत असते.
जंगल फिरताना दिसणारे जैविक प्राणीविश्व टिपणाऱ्या लेखकाची ती नैसर्गिक कादंबरी म्हणावी लागेल. डोंगर, वनस्पती, वृक्षवेली, गवत, पाऊस, पाणी, धबधबे, नाले, झरे, पाणथळ जागा, झुडपे, अनेक प्रकारच्या रंगांचे वेगवेगळे पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, तृणभक्षक जनावरे, मांसभक्षक पशू पाहून संध्याकाळी आकाशात उमटणाऱ्या इंद्रधनुष्याचा नजारा डोळ्यांसमोर उभा राहतो. ते लिहिणाऱ्या लेखकाच्या कादंबरीचे मोल करता येणार नाही. ती लिहिलेली माहिती शिकून आत्मसात करण्याची निसर्गगुपिताची कादंबरी होय.
त्यातूनच मेघदूत, रामायण, महाभारत अशा महान काव्यांचा जन्म झाला. त्या कादंबरीच्या जिज्ञासावर्धक अनेक हालचाली जंगल फिरताना आठवण होत पहावयास मिळतात. त्याने माणसाच्या जीवनातील सगळे प्रश्न, समस्या, ताणतणावांचे भीषण नाट्य नकळत विरून जाते. ती निसर्गकादंबरी उघडी करून डोळ्यांना दिसू लागल्यावर पशू, पक्षी, कीटक, साप, पुष्प, फळे, हिरवई, ओझरणारे झरे, पिवळे गवत, टेकड्या, डोंगर, दऱ्या असे अनेक बारकावे पाहून विज्ञान समजणारा माणूस थक्क होऊन जातो.
कारण त्यात जैविक संपदेचे भक्ष, भक्षक, त्यांच्यातील क्रौर्यपणा, रौद्ररूप, निष्पापपणा, निरागसता पाहताना बुद्धिमान माणूस विचारमग्न होत असतो. मानवीय रूढी, नियम, कायदे, परंपरा, पाप-पुण्य, उच्च-नीच अशा बंदिस्त संस्कृतीत वावरणारा मानव किती सुशिक्षित, बरा-वाईट आणि सुसह्य आहे, अशी कल्पना आपल्यात सुखावह आहे का? याचा विचार मनात शिरतो.
अरण्य कादंबरीचा विषय घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंद्रधनुष्याचे विषरूप किती रौद्र आहे हे कळल्यावर मन हादरून जाते. विविध वृक्षलतिका, हवा, प्रकाश, आकाश, पृथ्वी, पाणी आणि जैवविविधतेच्या पैलूंचे स्वभाव वैचारिक मानवाच्या विचारांना विश्वाच्या पलीकडे घेऊन जातात. त्याने हुशार समजणारा मानव त्या विश्र्वरूपाच्या चक्रव्यूहात अडकून पडतो.
शेकरा, ससा, सांबर, मेरूं, गवे, हत्ती हे प्राणी तृण, फळे भक्षक, निष्पाप, निरागस असून ते जंगल प्रवासात किती सुरक्षित असतात! तरी त्यांना भाग्यवान प्राणी म्हटले पाहिजे. त्यांचेच सोबती-संबंध असलेले क्रूर मांसभक्षक आपल्याच घरातील प्राण्यांवर ज्यावेळी झडप घालतात, त्यावेळी त्यांच्याकडे प्रतिकार करण्याची शक्ती नसते. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडे पळण्याची शक्ती असली, तरी ती जीव वाचवण्यास कमी पडते; त्याने ते जंगल कायद्याचा बळी ठरते. आपल्या मानवी जीवनात निष्पाप, निरागस, निरुपद्रवी हे गुण आहेत, पण ते सांभाळण्याचे काम मानवाकडे नक्कीच आहे. त्या मानवी गुणांना कुस्करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे सातत्याने मनात येते. मात्र जंगल कायद्यात निष्पाप-निरागसतेला कोणी त्याला रोखण्यास जाऊ शकत नाही.
जंगल कायदा हा निसर्गनिर्माण आहे. त्या कायद्यातून एखाद्या जनावराचा बळी गेल्यास त्यावेळी सारे जंगल कसे शांत स्मशान बनते; जणू काही घडलेच नाही! हे सारे पाहून जंगल फिरणाऱ्या माणसाचे मन सुन्न होते. तृणभक्षक प्राणी हेच खरे जंगल कादंबरीचे नायक ठरतात. त्यात अनेक हिंस्त्र प्राणी बळी घेण्याची भूमिका साकार करतात. निसर्गाचे हे क्रौर्य-नाट्य जंगल आणि मानवीय संस्कृतीच्या जीवनात सतत चालू असते. ही सतत चालू असणारी अव्वल दर्जाची कला, क्रीडा, कृती समजण्याचा मंत्र निसर्गाने फक्त मानवालाच दिला आहे.
असंख्य पारब्यांचा आधार घेत उंची न घेता चारी दिशांना कवेत घेऊ पाहणारा वटवृक्ष; उंच उभा जाऊन आकाशात सळसळत तालाचा नाद घुमवणारा पिंपळ; पाणी न घालता हिरवागार बनून वसंताची जाण देणारा लालभडक पुष्पवेष परिधान करणारा पळस; त्याच्या पावलावर पाऊल ठेवून लाल मखमलीने दर्शन देणारा पांगारा; नव्या नवरीप्रमाणे जंगलात सर्व अंगास हळद लावणारा बहावा; पाऊस लवकर हजर होणार याची जाण देणारी काटेसावरीची फुले अंगावर गुलालाची उधळण करतात. असे हे जंगलवृक्ष आपापल्या भूमिका साकारून जंगल कादंबरीचे नाट्यलेखन दर्जेदार बनवतात. त्याने जंगलाचा घनदाटपणा वाढतो व जंगल कादंबरीच्या सौंदर्यरूपात भर घालतो.
जरी हिवाळा सुरू होणार हे कोजागिरी पौर्णिमेने सांगितले, तरी नटलेल्या जंगलाच्या अंगावरील अलंकार खाली करण्यास उपाशी चकोर सांगतो. कारण त्याला चंद्राच्या चांदण्या प्रकाशाची आस लागल्याने दाट जंगलात येणारे चांदणे वृक्षछायेत न अडखळता आपल्यापर्यंत पोहोचलेले हवे असते. वृक्षवेली-जंगलाने वनदेवीची वस्त्रे खाली ठेवल्याने, ती भानावर येऊन लगेच ग्रीष्माला सांगावा पाठवून त्याच्याकडून मऊमुलायम नवीन वस्त्रे वृक्षवेलींकडे सोपवतात. ती वने जंगल-वसुंधरेला देऊन तिला अलंकारित करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.