Indian Constitution Day: 'संविधान हीच आमची शक्ती'; 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे मोदींचे आवाहन

Narendra Modi Constitution Day Message: देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष ओबीसींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांसाठी आरक्षण आणू इच्छित आहे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे.
Narendra Modi Constitution Day Message
Indian Constitution DayDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष ओबीसींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांसाठी आरक्षण आणू इच्छित आहे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे; आपले घटनाकार, विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात होते. आपली राज्यघटना साकार होण्यात ज्या महिलांची मदत झाली, त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची आवर्जून नोंद घेतल्याविना राज्यघटनेचा प्रवासाचा मागोवा अधुरा ठरेल.

घटनासभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला. आज आपण डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटनासभेतील प्रत्येकाचे स्मरण करत आहोत. आधुनिक राज्यघटनेची रचना करताना भारताच्या समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक विद्वत्तेचा व्यापकपणे आधार घेण्यात त्यांचे मोठेपण दडलेले आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात जिथे अगणित धर्म, भाषा, चालीरीती आणि विचारप्रणाली एकत्र नांदतात, अशा राष्ट्रासाठी राज्यघटनेचा प्रभाव केवळ संसद आणि न्यायालयांपुरता मर्यादित न राहता त्यापलीकडेही पोहोचणे महत्त्वाचे आहे. लोकांमध्ये विशेषतः युवावर्गामध्ये याविषयीची सामूहिक जाणीवजागृती निर्माण करुन राज्यघटनेचे नाते अधिक घट्ट करणे आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेली एकतेची भावना अधिक खोलवर नेणे हा आमचा प्रयत्न राहिला आहे. म्हणूनच, एक दशकापूर्वी आमच्या सरकारने २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

Narendra Modi Constitution Day Message
Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

माझ्यासह कोट्यवधी भारतीयांच्या जीवनप्रवासात भारतीय राज्यघटना ही अविभाज्य घटक आहे. जेव्हा जेव्हा मी माझ्या बालपणाच्या विश्वात डोकावतो, ज्या साध्या परिस्थितीमधून मी वाढलो, दैनंदिन आयुष्यातील संघर्ष आठवतो, तेव्हा मी राज्यघटनेप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेने भारावून जातो. एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या एखाद्या मुलावर, कोणत्याही सुविधा आणि जन्मजात मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागणाऱ्या बालकावर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची सेवा करण्याची जबाबदारी येते, ही बाब आपल्या राज्यघटनेचे असाधारण महत्त्व अधोरेखित करते. आपल्या राज्यघटनेमुळेच व्यक्तीचा जन्म कोणत्या परिस्थितीत झाला, यावर त्याच्या भविष्याच्या मर्यादा निश्चित होत नाहीत.

आम्ही आमच्या परीने, आमची राज्यघटना अधिक बळकट करून या कृतज्ञतेच्या ऋणाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रख्यात राज्यघटना अभ्यासक ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी आपल्या राज्यघटनेचे वर्णन ‘सर्वप्रथम आणि मुख्यतः एक सामाजिक दस्तऐवज’ असे केले आहे. सामाजिक आणि आर्थिक न्यायाची आकांक्षा आपल्या राज्यघटनेच्या प्रत्येक अंगात आणि प्रत्येक तरतुदीत खोलवर रुजलेली आहे. अशा परिस्थितीत, आपल्या राज्य घटनाकारांनी पाहिलेल्या या मौल्यवान स्वप्नाच्या पूर्ततेसाठी कार्य करण्यापेक्षा अधिक समाधानकारक गोष्ट कोणती असू शकते? जागतिक बँकेच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की ५० कोटी भारतीय दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत.

जेव्हा प्रधानमंत्री आवास योजना एखाद्या कुटुंबाला झोपडीऐवजी पक्क्या घरात राहण्याची संधी उपलब्ध करून देते, तेव्हा राज्यघटनेने दिलेल्या सन्मानाने जगण्याच्या हक्काला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त होते. जेव्हा उज्ज्वला योजनेमुळे एखाद्या आईला धुराने भरलेल्या स्वयंपाकघरातील त्रासातून मुक्ती मिळते, तेव्हा आपण समानतेच्या आणि कल्याणाच्या मूल्यांना पुढे नेतो. जेव्हा आयुष्मान भारत योजनेमुळे एखादे गरीब कुटुंब कर्जाच्या भीतीशिवाय दर्जेदार आरोग्यसेवा मिळवू शकते, तेव्हा सामाजिक न्याय प्रत्यक्षात साकार होतो. जेव्हा मुद्रा आणि पीएम-स्वनिधी योजनांच्या माध्यमातून लघुउद्योजकांना आणि पथविक्रेत्यांना तारणमुक्त कर्ज उपलब्ध होते तेव्हा आर्थिक न्यायाचे मूर्त स्वरूप साकार होते.

Narendra Modi Constitution Day Message
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

जेव्हा डिजिटल तंत्रज्ञान आणि यूपीआयसारखे प्लॅटफॉर्म्स, सर्व प्रकारचे भेद ओलांडून, एकेकाळी ठराविक लोकांसाठीच उपलब्ध असलेल्या संधी प्रत्येक नागरिकाच्या आवाक्यात आणतात तेव्हा संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशकता आपण पुढे नेत असतो. या संविधानात्मक दृष्टीकोनाची अनेक रूपे आपल्याला साकार झालेली दिसतात. आपली राज्यघटना १९५० मध्ये लागू झाल्यानंतरही, १८६०च्या दशकातील वसाहतवादी काळातील दंड संहितेनुसारच आपण चालत होतो. भारतीय न्याय संहितेच्या माध्यमातून आपल्या फौजदारी न्यायव्यवस्थेत मूलभूत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आपण केला आहे.

राज्यघटनेतील कलमाची त्यामागील मूळ भावनेनुसार संपूर्ण भारतात शब्दशः अंमलबजावणी केली जाईल अशी आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांना अपेक्षा होती. परंतु, ७० वर्षांहून अधिक काळ कलम ३७० आणि ३५- ए मुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यघटना पूर्णपणे लागू करता येऊ शकली नाही; परिणामी, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी) आणि महिलांच्या अधिकारांवर गदा आली. इतिहासात झालेली ही चूक केवळ २०१९ मध्ये दुरुस्त करण्यात आली. देशाच्या अनेक भागांत, विशेषतः आदिवासी बहुल भागांमध्ये, नक्षलवाद्यांनी अनेक दशके बंदुकीच्या बळाचा वापर करून अतिशय गरीबीत जगणाऱ्या लोकांना, त्यांच्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवले होते.

यावर्षी नक्षलवादाचे यशस्वीरीत्या उच्चाटन झाले ही अत्यंत सुखावणारी बाब आहे. आता आपल्यापुढे केवळ आजच्या वास्तवापासून पूर्णपणे दूर असूनही, आपल्या विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने करत असलेल्या ‘दिमागी नक्षलीं’चे (वैचारिक नक्षलवादी) आव्हान शिल्लक आहे. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष ओबीसींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांसाठी आरक्षण आणू इच्छित आहे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे; आपले घटनाकार, विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात होते. आपली राज्यघटना साकार होण्यात ज्या महिलांची मदत झाली, त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची आवर्जून नोंद घेतल्याविना राज्यघटनेचा प्रवासाचा मागोवा अधुरा ठरेल. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला जे काही घडले, ते अत्यंत लज्जास्पद आहे.

Narendra Modi Constitution Day Message
Goa Politics: राणे-सावंत एकत्र; दोनापावल्यातील बैठकीत शिवप्रकाशही सहभागी, भोजनावर चर्चा

विधिमंडळांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने आणलेले विधेयक एका विरोधी पक्षाने मंजूर होऊ दिले नाही; यावरून पुन्हा एकदा घटनात्मक मूल्यांबद्दल त्यांना आदर नसल्याचे दिसून आले. तरीही भारतातील ‘नारी शक्ती’ला न्याय मिळवून देण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही, याची मी त्यांना खात्री देतो. भारत आज एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. आपण २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न करत असताना, आपल्या विचारात ‘भारत प्रथम’ आणि कृती करताना ‘कर्तव्य’ ही दोन साधी पण प्रभावी तत्त्वे आचरणात आणल्यास आपल्या सामूहिक प्रयत्नांना दिशा दाखवण्याचे काम करतील. हीच मार्गदर्शक तत्वे समजून आणि राज्यघटनेला आपल्या शक्तीचा स्रोत बनवून, आपण भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करू शकतो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.