

सध्या राज्यात झेडपी निवडणुकांचे वातावरण आहे. या निवडणुकांकडे आगामी विधानसभा निवडणुकीची,’ रंगीत तालीम’ म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकरता विरोधी पक्ष एकत्र येतील अशी अपेक्षा होती. कमीत कमी कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजी यांची तरी युती होईल असे सर्वांना वाटत होते. मडगावला नरकासूर स्पर्धेप्रसंगी या तीन पक्षांचे नेते एकत्र आल्यामुळे युतीचे संकेत मिळायला लागले होते. पण हे संकेत या झेडपी निवडणुकीत खोटे ठरले आहेत. चर्चेचे गुर्हाळ बरेच दिवस चालूनसुद्धा युती होऊ शकली नाही. आता आम आदमीसारखेच आरजी पक्षानेही आपले वेगळे बिर्हाड थाटले आहे.
याला अतिआत्मविश्वास म्हणावा, की विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावे हेच समजत नाही. जो तो आपला इगो सांभाळायला लागला तर मग युती होणार तरी कशी? राजकारणात यश मिळवण्याकरता कधी कधी दोन पावले मागे घ्यावी लागतात, हे विसरता कामा नये. २०१२साली माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याचे प्रात्यक्षिक दाखविले होते.
त्यावेळी भाजपला फोंड्याची जागा हवी होती. तिथल्या भाजप कार्यकर्त्यांची तशी मागणीही होती. पण मगो पक्षही या जागेकरता आग्रही असल्यामुळे मगो-भाजप युती होते की काय याबद्दल शंका निर्माण झाली होती. पण पर्रीकरांनी फोंडा मगोला देऊन ही शंका मिटवून टाकली. आणि या युतीमुळेच भाजपला त्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळू शकले. यालाच म्हणतात राजकीय परिपक्वता. पण सध्या जे काही विरोधी आघाडीवर चालले आहे ते पाहता मागच्या दरवाजातून भाजपला सत्तेवर आणण्याचा हा डाव तर नव्हे ना, असे वाटायला लागले आहे.
वेगवेगळे संसार थाटून कोणताही विरोधी पक्ष यशस्वी होऊ शकणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि याचा प्रत्यय गेल्या विधानसभा निवडणुकीत आलाही आहे विरोधी पक्षांतील दुफळीमुळे केवळ ३४% मते मिळूनसुद्धा भाजप सत्तेवर येऊ शकला ही वस्तुस्थिती नजरेसमोर असतानासुद्धा जर विरोधी पक्ष एकत्र येणार नसतील तर देवच त्यांचे कल्याण करो, असे म्हणावे लागेल.
लक्षात घ्या जसे विरोधी पक्ष वेगळे लढून जिंकू शकत नाही तसेच विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपही जिंकू शकत नाही. तेवढी ताकद भाजपची नाही हे कधीच सिद्ध झाले आहे आणि हे विरोधी पक्षांनाही चांगलेच माहीत आहे. झोपलेल्या माणसाला उठविता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना उठविणार तरी कसे हो? अशी सध्या विरोधी पक्षांची स्थिती झाली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आप, कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड एकत्र आल्यामुळे दक्षिण गोव्यात भाजपला धूळ चारली गेली होती हे विरोधक विसरले असावेत किंवा विसरण्याचे नाटक करत असावेत असे त्यांच्या सध्याच्या रणनीतीवरून वाटायला लागले आहे. वास्तविक आज जनमत भाजपच्या विरोधात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
नुकतेच झालेले पूजा नाईक प्रकरण वा हडफड्याचे आग प्रकरण यामुळे जनतेचा रोष अधिकच वाढताना दिसायला लागला आहे. पण त्यांच्यासमोर योग्य पर्याय येत नसल्यामुळे ते हवालदिल झाल्यासारखे वाटत आहेत.
नुकताच आरजी नेते मनोज परब व आमदार वीरेश बोरकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर असलेला फोटो सोशल माध्यमावरून प्रसिद्ध झाल्यामुळे जनतेचा विरोधी पक्षाबाबतचा संशय अधिकच बळावला आहे. त्यामुळे जनतेची अवस्था ’आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना ’ अशी झाल्याचे दिसत आहे. याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या झेडपी निवडणुकीच्या प्रचारात उमटताना दिसायला लागले आहेत.
‘विरोधी पक्षांचे काही खरे नाही’ असे लोक सरळ सरळ बोलत आहेत. हेच चित्र जर, २०२७साली कायम राहिले तर निवडणुकीचा निकाल लावण्याची आणखी गरज भासणार नाही हे निश्चित!
- मिलिंद म्हाडगुत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.