

राजू नायक
लोकांना वाटते काँग्रेस पक्ष पर्याय निर्माण करण्यात असफल झालाय. पक्षात दोनवेळा फूट पडली, आता तिसऱ्यांदा ती पडणार नाही कशावरून? शिवाय इतर विरोधी, प्रादेशिक पक्षांबरोबर कॉंग्रेस युती करणार यात काही खरे नाही. या पार्श्वभूमीवर एकदमच नवी संकल्पना घेऊन नव्या पर्यायाचा शोध का घेऊ नये, असा विचार पुढे आला आहे. लोकदबावातून त्या शक्यतेचाही विचार का होऊ नये?
चतुर्थीचे वेध लागले आहेत. गोव्यात आम्ही ती धुमधडाक्यात साजरी करतो. घरोघरी गणपती बसतात. सार्वजनिक गणपती उत्सवांनी महाराष्ट्रालाही मागे टाकले आहे. लोक गावी जायची तयारी करू लागलेत. त्याची लगबग सुरू झालीय. त्यानिमित्ताने गाव जागे होतात. गेल्या २० वर्षांत लोकांनी गावांकडे पाठ फिरवलीय, ते शहरांमध्ये येऊन स्थायिक झालेत. परंतु वर्षातून एकदा तरी ते गावात येऊन राहतात. मुक्काम ठोकतात. गणपती हा त्यांच्या गावाकडचे नाते जोडणारा सण आहे. त्यामुळे नातेवाईक एकत्र येतात. बराच काळ न भेटणारे भाऊ भेटतात, बहिणी येतात. शेजारी-मित्रमंडळी एकत्र येतात, बागडतात. या काळात ही मंडळी केवळ आरत्या गात नाहीत, त्यांच्यात सुखदुःखाच्या गप्पा होतात. इकडचे तिकडचे विषय चर्चेत येतात. राजकारणावर ते बोलतातच!
किंबहुना राजकारण हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दोन गोवेकर, दोन मित्र, दोन बुद्धिवादी एकत्र येतात तेव्हा ते राजकारणावर बोलतात. पेपरात आलेले विषय त्यांना खाद्य पुरवितात. टीव्हीवरच्या मुलाखती, रिल्स त्यांना चघळण्यास पुरेसे होतात. मग या चतुर्थीतही घरी जाऊन राजकारणावरच बोलणार असतील तर त्यांनी आपला महत्त्वाचा वेळ गोव्याच्या राजकारणाला सुनिश्चित दिशा देण्यासाठी का वापरू नये? स्पष्टच सांगायचे तर गोव्याच्या राजकारणाचा ‘नरेटिव्ह’ तयार का करू नये? तसा समाजाने या निवडणुकीचा ‘नरेटिव्ह’ तयार करण्यासाठी यापूर्वीच पुढाकार घेतला आहे. ख्रिस्ती समाज सतत बोलतो आहे. त्यांचे बुद्धिवादी सुस्पष्ट बोलू लागले आहेत. गेल्या आठवड्यात आझाद मैदानावर एक आंदोलन सुरू असताना तेथे विरोधी नेते जमले तर एक इन्फ्ल्यूएन्सर कुठून तरी तेथे धडकला व त्याने अक्षरशः नेत्यांचे कान पकडले. तुमचे ‘इगो’ बाजूला ठेवा, एकत्र या. त्याशिवाय भाजपला हरवणे तुम्हाला साध्य होणार नाही. साऱ्या नेत्यांना त्याचे खडे बोल गुपचूप ऐकून घ्यावे लागले.
ख्रिस्ती समाजाने हा ‘नरेटिव्ह’ सुस्पष्ट तयार केलाय यात तथ्य आहे. त्या समाजाच्या भावभावनांमध्ये तथ्य आहे आणि प्रामाणिकपणाही आहे. या समाजाला राजकारणात पर्यात हवा आहे. याचा अर्थ कॉंग्रेस सत्तेवर येणे असा काहीजण घेतात, त्यात तथ्य नाही. किंबहुना दोनवेळा हा पक्ष फुटल्यावरही त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये सच्चाई नाही, हे लोकांच्या ध्यानात आले आहे. सच्चाई म्हणण्यापेक्षा कळवळा म्हणणे अधिक योग्य ठरेल. कारण आता निवडणुकीला केवळ सहा महिने शिल्लक असतानाही त्या पक्षाला सर्वांना बरोबर घेऊन जाणे शक्य झालेले नाही. त्या पक्षातच निवडणुकीपूर्वी फूट पडेल, अशी शक्यता आहे.
सध्या तर अशी परिस्थिती आहे, की राजकारणाचा ‘रोडमॅप’ सत्ताधारी पक्षच निश्चित करू लागला आहे. विरोधक विखुरले आहेत, हे भाजपच्या पथ्यावर पडले आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास भाजपा पुन्हा तिसऱ्यांदा सलग सत्ता काबीज करेल, यात शंका वाटत नाही. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर या दिवसांत सतत विरोधी ऐक्याबाबत बोलतात. परंतु त्यांच्या मनात निश्चित चाललेय काय हे त्यांच्या निकटच्या मित्रांनाही सांगता येणार नाही. मी त्यांच्या काही जवळच्या मंडळींशी बोललो तेव्हा तेही बुचकळ्यात पडलेले दिसतात. त्यांच्या बरोबर युती करू इच्छितो, असे सांगणारे प्रादेशिक पक्षांचे नेतेही या गोंधळात सामील आहेत. खरोखरीच त्यांना तरी युती हवीय काय?
केजरीवालांबद्दल मी मागच्या एका लेखात विवेचन केले होते. जो नेता दिल्लीहून सतत पाच-पाच दिवसांसाठी गोव्यात येतो. त्यांनी माजी मुख्यमंत्री आतिशींना गोव्यात मुक्कामाला ठेवले आहे. ते काय कॉंग्रेसकडून तीन-चार जागाच पदरात पाडून घेण्यासाठी वावरतील काय? गेल्या दोन दिवसांत जे चर्वितचर्वण सुरू झाले, त्यावरून ‘आप’ नेत्यांना त्यांच्या बाणावली, वेळ्ळी जागांसाठीही कॉंग्रेसबरोबर काथ्याकूट करावा लागणार असे दिसते. ते ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत ‘आप’ नेते असतील? ‘आप’ नेत्यांना त्यांचे दोन आमदार कॉंग्रेस उचलून नेईल, अशीही भीती आहे. परंतु त्यांना घ्यायला कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस यांचा उघड विरोध आहे. कॉंग्रेसने त्या मतदारसंघात अनेक वर्षे जोपासलेले नेते आहेत. तेथे जि.पं. मध्येही कॉंग्रेसने चमकदार कामगिरी बजावली आहे.
‘रेव्होल्युशनरी’ पक्षाला पाच ते सहा जागा द्याव्या लागतील. शिरोडा, शिवोली, सांत आंद्रे, कुंभारजुवे, नुवे हे त्यांना खात्रीचे वाटणारे मतदारसंघ. शिवोली, शिरोडा येथे त्यांच्या उमेदवारांना जि.पं. निवडणुकीत पाच-सहा हजार मते मिळाली. या पाचही मतदारसंघांत गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांची मते कायम राहिली. नुवेमध्ये त्यांचा विधानसभा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, परंतु हे सर्व काँग्रेसचेही भूतपूर्व बालेकिल्ले. ते सोडून देणे काँग्रेसला परवडणारे आहे काय? गोवा फॉरवर्डने युतीची चर्चा तहकूब करून टाकली. वास्तविक विजय सरदेसाईंनी त्यांना वर्षभर आधी पक्ष विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला होता. त्याकडे काँग्रेस नेत्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. सध्या ते भाजपाचा गड असलेल्या कुशावती या जिल्ह्याला धडक देऊ पाहात आहेत.
या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यात नगरपालिका निवडणुका घेण्याचे आव्हान उच्च न्यायालयाच्या निकालामुळे उभे राहिलेले आहे, जी निवडणूक कोणत्याही पक्षाला मनातून हवी आहे का, प्रश्नच आहे. भाजपाचा निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव होता, परंतु आता कोणीही पालिका निवडणुकीच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे विधानसभा अधिवेशनात या अधिसूचनेवर चर्चा अपेक्षित आहे व सारे सदस्य संपूर्णतः त्याला विरोध करतील. राजकीय विषय आमचा अधिकार आहे, कोर्टाने त्यात लुडबूड करू नये, असेही बोलले जाईल. दुसऱ्या बाजूला सेन्सस (जनगणना) सुरू झालाय, जो निवडणुकीच्या तोंडावर घ्यावा लागतोय. त्याकडेही राजकीय पक्ष किती गांभीर्याने पाहतात, हे दिसून येईल. एकूणच साऱ्यांसाठी तो संवेदनशील विषय आहे.
एसटी आरक्षणाचा विषय विधानसभा निवडणुकीपूर्वी धसास लावण्यास भाजपाला अपयश आल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या तरी सरकारने कितीही योजले तरी हे आरक्षण मिळणे शक्य नाही, असेच वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाची तथाकथित शिस्त धाब्यावर बसवून हे एसटी नेते आपले शक्तिप्रदर्शन व धमक दाखवण्यात किती यशस्वी होतात याकडे त्या समाजाच्या तरुणांचे लक्ष आहे. चार प्रस्थापित नेत्यांच्या अस्तित्वाहून मोठे समाजाचे भविष्य, आशा आकांक्षा असतील तर त्यागावर आधारित राजकारण सुरू करावे लागेल. राज्यात संघर्षाचा नवा इतिहास रचावा लागणार आहे. हिंदू समाजात नऊ टक्के असलेल्या एसटींना राजकीय धुमारे फुटून समाजाचे अस्तित्व आणखी बलदंड करण्याची संधी हे प्रस्थापित नेते काही क्षणिक फायद्यासाठी गमावतील काय, हा खरा प्रश्न आहे. शिवाय एसटी आरक्षणाची राजकीय हवा भाजपानेच तयार केलेली असल्याने नेत्यांनी बंडाचा पवित्रा घेतल्यास त्यांना कोणी दोष देऊ शकणार नाही!
एसटी आरक्षणाचा विषय सगळ्यांसाठीच आव्हानात्मक बनणार आहे. त्या प्रश्नाची गत भाजपासाठी आंध्र प्रदेशसारखी होऊ नये. काँग्रेसने आंध्रातून कोरून तेलंगणा वेगळा केला व त्या राज्याने नवाच राजकीय सवतासुभा उभा केला. ते राज्य कायमचे दूर गेले. राजकीय लाभ मिळण्याचे प्रयत्न वाया गेले! एसटी आरक्षणातील असंतोष, भाजपाच्या उमेदवारीवरून नाराजी, काँग्रेस आमदारांच्या घाऊक आयातीमुळे कार्यकर्त्यांमधील चलबिचल व प्रचंड भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अनागोंदी यामुळे राज्यात कमालीची अस्वस्थता असूनही काँग्रेसला तो मुद्दा बनविता आलेला नाही. पर्रीकरांसारखा संपूर्ण गोव्यात प्रतिमा असलेला नेताच या पक्षात नाही, तरीही युरी आलेमाव यांना घेऊन तो पक्ष गोव्यात यात्रा सुरू करू पाहतोय! ही यात्रा उत्तर गोव्यात हजारभर तरी लोक गोळा करू शकेल काय? कार्यकर्त्यांचीच वानवा असल्याने फुटीर आमदारांविरोधात हा पक्ष जनक्षोभ निर्माण करू शकला नाही हे वास्तव आहे!
या पार्श्वभूमीवर जबरदस्त राजकीय ताकद निर्माण करण्याच्या हेतूने युती करण्यासाठी जी प्रखर इच्छाशक्ती लागते, त्याचाच काँग्रेसमध्ये अभाव आहे. तिसऱ्यांदा-यंदाही काँग्रेस पक्षातर्फे निवडून आलेले आमदार फुटून जातील, असा लोकांमध्ये असलेला समज दूर करणे अद्याप पक्षाला शक्य झालेले नाही. काँग्रेस पक्ष दोनदा फुटला, आता तिसऱ्यांदा तो फुटणार नाही कशावरून, असा प्रश्न जर लोकांनी यात्रेदरम्यान युरी आलेमावना केला तर त्यांच्याकडे काय उत्तर आहे? लोकांनी ज्यांच्यावर का विश्वास ठेवावा?
याच पार्श्वभूमीवर ‘गोवा काँग्रेस’ स्थापन झाली, तिला मान्यता मिळाली तर मग काय? गिरीश चोडणकर यांनी गेल्या तीन महिन्यांत काँग्रेस मतदारसंघांमध्ये फिरून लोकांना विश्वास द्यायला हवा होता. पहिला विश्वास म्हणजे, हा पक्ष यापुढे फुटणार नाही! दुसरा विश्वास ः आम्ही खात्रीने जिंकून येऊ! हा विश्वास ते देऊ शकले नाहीत, तर मग लोकांनी आणखी एक नवा पर्याय का तयार करू नये? भाजपा किंवा काँग्रेस, दोघांनाही बाजूला ठेवून एक नवा पर्याय, नवे राजकारण निर्माण करण्याचा पर्याय!
पुढच्या सहा महिन्यांत हे आश्वासक राजकारण तयार होऊ शकते?
चतुर्थीच्या काळात गावोगावी गेलेली मंडळी हा नवा नरेटिव्ह तयार करू शकतील काय? हा केवळ तिसरा पर्याय नसेल. लोकांमध्ये जर विरोधकांमध्ये बलदंड युती घडावी अशा भावना असतील, तर या निखाऱ्यांना फुंकर घालून त्याचे होमखंडात रूपांतर करण्याइतपत ज्वाळा त्यातून भडकल्या पाहिजेत. समाजातूनच ती शक्ती तयार होऊन आली पाहिजे. लोकांनीच आता राजकारणाला दिशा देण्याची वेळ येऊन ठेपली आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.