Goa Crime: दोन्ही भाडोत्री मारेकरी अजून फरार; नायक गोळीबारप्रकरणी 24 तासांनंतरही धागेदोरे सापडेनात

Goa Srinivas Naik Firing Case: पर्वरी येथे शुक्रवारी रात्री श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार केलेले भाडोत्री गुंड पोलिसांना २४ तासांनंतरही सापडू शकलेले नाहीत.
Goa Srinivas Naik Firing Case
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्वरी येथे शुक्रवारी रात्री श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार केलेले भाडोत्री गुंड पोलिसांना २४ तासांनंतरही सापडू शकलेले नाहीत. त्यातील एक पणजीच्या दिशेने तर दुसरा विरुद्ध दिशेने पळाला, एवढीच माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या तपासावर पोलिसांच्या फौजफाट्याने आज दिवसभर लक्ष केंद्रीत करूनही हल्ल्यामागचा निश्चित उद्देश काय, हे पोलिसांना समजून आलेले नाही.

त्याचमुळे हल्लेखोर कोणी पाठवले असतील, याचा अंदाज लावणेही कठीण झाले आहे. ‘निओ मॅजेस्टीक’च्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असली तरी हल्लेखोरांचा नेमका चेहरा ओळखणे कठीण झाले आहे. पणजीत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सीसीटीव्ही बसविले असले तरी त्यांचाही काही उपयोग अशा वेळी होत नसल्याचे पोलिसांना दिसून आले आहे.

Goa Srinivas Naik Firing Case
Goa Environment: पर्यावरण रक्षणासाठी गोमंतकीयांचा लढा; चिपकोपासून कारापूरपर्यंत भूमी, जंगल आणि निसर्ग वाचविण्याची संघर्षगाथा

अज्ञातांवर गुन्हा

हॉटेल परिसरात झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची गंभीर दखल घेत पर्वरी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. ''भारतीय न्याय संहिता'' २०२३ मधील कलम १०९(१), १२५, ३(५) आणि शस्त्र कायद्याच्या कलम ३ व २७ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

‘या’ दिशेने पोलिसांचा तपास

या गोळीबारामागे प्रोटेक्शन मनी मागण्याचा उद्देश असावा का, त्यासाठी एका वजनदार व्यक्तीचा हात असावा का, या शक्यतेवरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केल्याचे सांगण्यात येत आहे. नायक यांना यापूर्वी सूचकपणे काही कळविण्यात आले होते का. त्यांनी त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले होते का, यादृष्टीनेही पोलिस तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही फुटांवरून पहिली गोळी: नायक यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी काही फुटांच्या अंतरावरून पिस्तुलाची पहिली गोळी झाडली, ती चुकली. क्षणार्धात ते कार मागे दडले. तेवढ्यात त्यांच्‍या अंगरक्षकाने जबाबी गोळीबार केला. त्याने नेम न धरता त्यांना घाबरविण्यासाठी हवेत गोळी झाडली. त्यामुळे हल्लेखोर मागे फिरले. पळतानाच त्यांनी आणखीन दोन गोळ्या झाडल्या. ते पळत असताना अंगरक्षकाने आणखीन दोन गोळ्या त्यांच्या दिशेने झाडल्या.

Goa Srinivas Naik Firing Case
Goa Special Railway: वालंकिणी यात्रेसाठी गोव्यातून विशेष रेल्वे रवाना; फातोर्डा, मडगाव, नावेली, कुडतरीतील भाविकांचा मोठा सहभाग

२५ तारखेपासून मारेकरी होते नायक यांच्‍या मागावर

१ मारेकरी हे चार दिवस नायक यांच्‍या मागावर होते, तसे सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये दिसले आहे.

२ दोन दिवसांपूर्वी हे मारेकरी रेकी करून गेले. तसेच नायक यांना खेटून गेले होते.

३ नायक यांना अलीकडे कोणाच्‍याही धमकीचा कॉल आला नव्‍हता. त्‍यांच्‍याकडून पैसे उकळण्‍याचा एका टोळीचा डाव असावा असा कयास आहे.

४ हे मारेकरी ‘निओ मॅजेस्‍टिक’मध्‍ये गोळीबार करून धावत रस्‍ता ओलांडून ‘आझाद भवन’च्‍या पुढील रस्‍त्‍यावरून पळून गेले. तोपर्यंत नायक यांच्‍या अंगरक्षकांनी पाठलाग केला. मग ते झोपडपट्टीच्‍या दिशेने पळाले.

५ गोव्‍यातील उद्योगपतींना घाबरवून त्‍यांच्‍याकडून पैसे उकळणारी टोळी कार्यरत असावी, असा निष्‍कर्ष यावरून काढता येतो.

‘देव होता म्हणून वाचलो’: ‘देव होता म्हणून वाचलो’ असे उद्‍गार श्रीनिवास नायक यांनी निकटवर्तीयांशी या घटनेनंतर बोलताना काढले. मॅजेस्टीक हॉटेल्स कंपनीच्या दोन्ही कॅसिनोंचे व्यवहार ते हाताळत असल्याने पैशांच्या देवघेवीवरून हा प्रकार घडला असावा, असे वाटले होते. मात्र, गोळीबाराविषयी नायक यांनीच अनभिज्ञता व्यक्त केल्याने पोलिसांना दिशा सापडलेली नाही.

तांत्रिक पुराव्यांवर भर: गोळीबारामागे वेगवेगळी कारणे गृहित धरून पोलिसांनी सहा पथके स्थापन करून तपास आरंभला आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी संशयितांना गजाआड करण्याचा पोलिसांवर दबाव आहे. प्रत्येक कारणागणिक संशयिताचे नाव बदलत आहे. त्यातच त्यातील काही व्यक्तींना सार्वजनिकरीत्या चौकशीसाठी बोलावणे शक्य नसल्याने पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांवर भर दिला आहे.

हल्ला खंडणीसाठी नाहीच ; महासंचालक आलोक कुमार

पणजी : श्रीनिवास नायक यांच्यावरील हल्ला खंडणीच्या कारणास्तव झाला असे प्राथमिकदृष्ट्या म्हणता येणार नाही, असा स्पष्ट दावा पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून यादरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी रात्री सुमारे ८.४७ च्या सुमारास श्रीनिवास नायक हे हॉटेल निओ मॅजेस्टिकमधून निघाले असता, दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर ३ फैऱ्या झाडल्या. अचानक झालेल्या गोळीबारामुळे हॉटेलच्या लॉबीमध्ये उपस्थित असलेले ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. नायक या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. नायक यांच्या अंगरक्षकाने तत्परता दाखवत तीन फैऱ्या झाडून हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिले. या घटनेनंतर दोन्ही हल्लेखोर महामार्गाच्या दिशेने पसार झाले.

Goa Srinivas Naik Firing Case
Goa Politics: हताश भाजप, विस्कळीत विरोधक... गोव्याच्या सत्ताकारणात 'गेम' कोण कोणाचा करतोय?

सीमा भागासह रेल्वे स्थानकांवर ‘अलर्ट’

१ श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणाला २४ तास उलटून गेले तरी हल्लेखोरांचा कोणताही ठोस सुगावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या हायप्रोफाईल प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोवा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. हल्लेखोरांच्या शोधासाठी काही विशेष तपास पथके तयार करून विविध भागांत रवाना केली आहेत.

२ स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रँच या मोहिमेत उतरली असून प्रमुख रस्त्यांवरील नाके, जंक्शन्स, गोवा-महाराष्ट्र आणि गोवा-कर्नाटक सीमेवरील तपासणी नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू आहे. हल्लेखोर पसार होऊ नयेत यासाठी त्यांची छायाचित्रे गोव्यातील सर्व पोलिस ठाण्यांसह शेजारील राज्यांतील पोलिस दल आणि रेल्वे स्थानकांना पाठविली आहेत.

गोळीबारासारख्या घटना खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री

पणजी : गोव्यात गोळीबारासारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिला. कॅसिनो मॅजेस्टिकचे संचालक श्रीनिवास नायक आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकावर झालेल्या गोळीबारातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या हल्ल्यामागील नेमके कारण तसेच हल्ल्याचे सूत्रधार कोण आहेत याचा उलगडा तपासातून होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, व्यावसायिकावर अशा प्रकारे हल्ला करणे गंभीर बाब असून या प्रकरणातील आरोपींना तातडीने पकडण्याचे निर्देश पोलिस महासंचालकांना दिले आहेत. लवकरच या हल्ल्यामागील व्यक्ती तसेच त्यांचा हेतू स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, की सरकार आणि पोलिसांकडून अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. गेल्या सुमारे आठ वर्षांतील गोव्यातील हा पहिला उघड गोळीबार असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे या घटनेकडे सरकारने गांभीर्याने पाहिले असून संशयितांना गजाआड करण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.

घटनेमागे सुपारी किलर

पोलिसांनी या घटनेचा तपास अधिक तीव्र केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे. हल्लेखोर गोव्याबाहेरील ‘सुपारी किलर’ असावेत, असा पोलिसांना संशय आहे. मात्र, त्यांची ओळख आणि सध्या ते नेमके कुठे आहेत, याचा अद्याप ठोस पुरावा मिळालेला नाही.

Goa Srinivas Naik Firing Case
Goa Government: उद्योग-सुलभतेसाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय! जुने कायदे, परवाने आणि नियमांची दरवर्षी छाननी; अनावश्यक परवानग्या कमी होणार

बेवारस मोटारीचा तपास

या प्रकरणाच्या तपासात गोव्यात नोंद झाल्याची नंबरप्लेट असलेली एक बेवारस मोटारही पोलिसांच्या हाती लागली असून तिचा हल्ल्याशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. हल्लेखोरांना शस्त्रे कोणी पुरविली, त्यांना गोव्यात आणण्यात कोणाचा सहभाग होता आणि या कटामागे नेमके कोण आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com